श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट करेपर्यंतचा साधारण एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. माझ्यापेक्षाही जास्त माझ्या बायकोसाठी. रोजचं कॉलेज, प्रॅक्टिकल्स, अभ्यास या सगळ्याचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि शिवाय लहान मुलाची जबाबदारी! आमच्या मुलाचा, सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने तिची राष्ट्रीयकृत बँकेतली नोकरी सोडली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे तिने ठरवले होते. त्यानुसार यावर्षी तिला सरकारी बीएड कॉलेजमधे ऍडमिशनही मिळाली होती. आणि या पार्श्वभूमीवरची माझी महाबळेश्वरला झालेली बदली! 

या सगळ्याचा आत्ता पुन्हा संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे)

त्याकाळी इंग्रजी हा मुख्य विषय घेऊन एम. ए. बी एड् झाल्यानंतर कोल्हापूरमधे शाळाच नव्हे तर कॉलेजमधेही सहज जॉब उपलब्ध होऊ शके. पण तिने पुढे काय करायचे याचा विचार त्या क्षणी तरी आमच्या मनात नव्हताच. त्यातच माझी महाबळेश्वरला बदली झाल्यामुळे एप्रिलमध्ये तिची परीक्षा संपताच कोल्हापूर सोडायचे हे गृहितच होते. कौटुंबिक स्वास्थ्य आणि मुलाचे संगोपन यालाच सुदैवाने तिचेही प्राधान्य होतेच. तरीही जिद्दीने एवढे शिकून आणि इच्छा असूनही तिला आवडीचे कांही करता आले नाही तर तिच्याइतकीच माझ्याही मनात रुखरुख रहाणार होतीच. पण ते स्विकारुन पुढे जायचे याशिवाय दुसरा पर्याय होताच कुठे? 

या पार्श्वभूमीवर भोवतालचा मिट्ट काळोख अचानक आलेल्या लख्ख प्रकाशझोताने उजळून निघावा अशी एक अनपेक्षित घटना घडली आणि आरतीच्या करिअरला आणि अर्थातच आमच्या संसाराला ध्यानीमनी नसताना अचानक प्रकाशवाटेकडे नेणारी दिशा मिळाली! हे सगळंच अनपेक्षित नव्हे तर अकल्पितच होतं. त्या क्षणापुरता कां होईना चमत्कार वाटावा असंच!

कोल्हापूर सोडून आम्ही सर्व घरसामान महाबळेश्वरला हलवलं. बी. एड्. चा रिझल्ट लागायला अजून कांही दिवस असूनही महाबळेश्वरला आरतीला हवी तशी एखादी चांगली नोकरी मिळण्याच्या कणभर शक्यतेचा विचार मनात आणणंही एरवी हास्यास्पदच ठरलं असतं, अशा परिस्थितीत महाबळेश्वरच्या घरी आल्यानंतरच्या चारपाच दिवसात लगेचच इंग्रजी विषयाची शिक्षिका म्हणून महाबळेश्वरच्या सरकारमान्य माध्यमिक शाळेत आरती कायमस्वरुपी रुजूही झाली!!

हा आमच्यासाठी अनपेक्षित असा सुखद धक्काच होता! यामागचा कार्यकारणभाव समजून घेतला तर ही घटनाच नव्हे तर त्या घटीतामागचं परमेश्वरी नियोजन त्याक्षणापुरतं तरी चमत्कारच वाटत राहिलं. ‘देता घेशील किती दोन कराने’ या शब्दांमधे लपलेल्या चमत्कृतीची ती प्रचिती खरंच थक्क व्हावं अशीच होती!

महाबळेश्वरस्थित ‘गिरिस्थान हायस्कूल’ आणि ‘माखरिया हायस्कूल’ या दोन्ही माध्यमिक शाळांकडून आरतीसाठी इंग्रजी शिक्षक म्हणून नवीन नोकरीच्या संधीची दारं अनपेक्षितपणे उघडली जाणं हेच मला अविश्वसनीय वाटलं होतं. बी एड् चा निकालही लागलेला नसताना, आरतीने अर्ज करणं सोडाच तिथे अशी एखादी व्हेकन्सी असल्याची पुसटशीही कल्पना नसतानाही या शाळांकडून परस्पर असाकांही प्रस्ताव येणं हे एरवीही कल्पनेच्या पलीकडचंच होतं.

या दोन्ही शाळांची मुख्य खाती स्टेट बँकेत असल्याने माझा बँक-मॅनेजर म्हणूनही त्या शाळांशी त्या अल्पकाळात ओझरताही संपर्क आलेला नव्हता. दोन्ही शाळांमधे बी. ए बी. एड् इंग्रजी शिक्षकाची एकेक जागा व्हेकेट होती आणि त्यासाठी दिलेल्या जाहिरातींना नवीन शालेय वर्ष सुरू व्हायची वेळ येऊनही कांहीच प्रतिसाद आलेला नव्हता. गिरिस्थान हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी त्यांना मिळालेल्या माहितीची शहानिशा करुन आमच्याशी संपर्क साधला आणि नोकरीसाठी लगेच अर्ज करायला सांगितलं. ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी ‘व्हेकन्सी बी. ए बी. एड्’ ची असल्याने त्या एम. ए. बी एड असल्या तरी स्केल मात्र मी बी. ए. बी. एड्चंच मिळेल याची पूर्वकल्पनाही दिली. अर्थात आमच्या दृष्टीने त्याक्षणी तरी तो महत्त्वाचा मुद्दा नव्हताच. आश्चर्य म्हणजे तिथे अर्ज करण्यापूर्वीच ‘माखरिया हायस्कूल’चे मुख्याध्यापक श्री. तोडकरसर यांनी आमच्याशी त्वरीत संपर्क साधून ‘एम. ए बी. एड्’ चं स्केल द्यायची तयारी दाखवली व तसा अर्जही घेतला आणि दुसऱ्या दिवसापासूनच नोकरीवर हजर व्हायची विनंती केली. अर्थात बी. एड्चा रिझल्ट लागेपर्यंत मस्टरवर सही न करता मुलांना त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मोफत शिकवण्याची त्यांची विनंती होती!

त्यांचं एकंदर मोकळं, प्रामाणिक, स्पष्ट न् आत्मविश्वासपूर्ण बोलणं आणि स्थानिक जनमानसात त्यांना असलेला आदर याचा विचार करून आम्ही त्यांचा प्रस्ताव मनापासून स्वीकारला आणि महाबळेश्वरला आल्यानंतर लगेचच आरतीचं माझ्याइतकंच बिझी शेड्यूल सुरुही झालं!

या सगळ्याच घडामोडींना स्वतः साक्षी असूनही मला हे सगळं स्वप्नवतच वाटत राहिलं होतं! 

पुढे पंधरा दिवसांनी जेव्हा बी. एड्चा रिझल्ट आला तेव्हा फर्स्ट-क्लास मिळाल्याच्या आनंदापेक्षाही इतक्या अकल्पितपणे शैक्षणिक क्षेत्रात कायमस्वरुपी कार्यरत रहायला मिळणार असल्याचा आनंद आरतीसाठी खूप मोठ्ठा होता!!

महाबळेश्वरला बदली झाल्याची आॅर्डर माझ्या हातात आली होती तो दिवस आणि मनाला कृतार्थतेचा स्पर्श झालेला हा दिवस या दोन दिवसांदरम्यानचा प्रत्येक क्षण न् क्षण पुन्हा जिवंत झाला माझ्या मनात! त्या त्या वेळचे कसोटी पहाणारे क्षण, वेळोवेळी तात्पुरता फायदा पाहून किंवा नाईलाजाने नव्हे तर अंत:प्रेरणेने आम्ही घेतलेले निर्णय, क्षणकाळापुरती कां असेना पण अनेकदा अनिश्चिततेपोटी मनात निर्माण झालेली अस्वस्थता,.. आणि नंतर ‘त्या’चा विचार मनात येताच मन भरुन राहिलेली निश्चिंतता सग्गळं सग्गळं याक्षणी मनात जिवंत झालं पुन्हा. या सगळ्याच घटीतांच्या रुपात प्रत्येकवेळी ‘मी आहे’ हा ‘तो’ देत असलेला दिलासा मला आश्वस्त करीत होता..!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments