श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३0 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आठवड्यातून ठरलेले दोन दिवस बँकेत येतानाच ‘लिटिल् फ्लावर’ मधे जाऊन कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मी स्वतःच बँकेत घेऊन येऊ लागलो. कांही दिवस हे असं सुरू राहिलं पण अचानक एक दिवस या क्रमाला अतिशय अनपेक्षितपणे वेगळंच वळण लागलं आणि या सगळ्या चांगल्यात मिठाचा खडा पडला! मला मुळापासून हादरवून सोडणारी ती एक नाट्यपूर्ण कलाटणी मला पूर्णत: हतबल करून गेली होती! 

मला पुढे येऊ पहाणाऱ्या एका अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाची हीच तर पार्श्वभूमी ठरणार होती आणि सुरुवातसुद्धा.. !) इथून पुढे —- 

तो शुक्रवार होता. आमच्या रिजनल ऑफिसकडून आलेल्या फोनवर दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी ५. ३० वाजता अचानक ठरलेल्या ब्रॅंच मॅनेजर मिटिंगसाठी मला कोल्हापूरला येण्याचा निरोप मिळाला. योगायोग असा की मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पौर्णिमा होती आणि मीटिंग संपताच सांगलीला घरी मुक्कामाला जाऊन ति‌थून रविवारी माझ्या नेमानुसार पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जाणंही सुलभ होणार होतं.

पण हा निरोप मिळताच मीटिंगची आवश्यक ती माहिती गोळा करून फाईल तयार करायलाच खूप रात्र झाली. म्हणून मग रात्री उशिरा न निघता शनिवारी पहाटेच्या बसने निघायचं ठरवलं. रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि शनिवारी सकाळी ‘लिटिल् फ्लॉवर’ मधे जाऊन आपल्याला कॅश कलेक्ट करायचीय याची आठवण झाली. रिजनल ऑफिसच्या फोननंतर सुरू झालेल्या या सगळ्या गदारोळात शनिवारी कॅश कलेक्शनसाठी मला येता येणार नाहीय असा मिस् डिसोझांना निरोप देणं राहूनच गेलं होतं त्यामुळे कॅश कलेक्ट करणं क्रमप्राप्तच होतं.

शेवटी पहाटे उठून प्रवासाची तयारी करून मी बॅग घेऊन बाहेर पडलो ते नेहमीप्रमाणे आठ वाजताच. ‘लिटिल् फ्लाॅवर’ मधे जाऊन पैसे मोजून ताब्यात घेतले. बँकेत जाऊन पैसे व स्लीप सुजाताच्या ताब्यात दिली.

“कॅश नीट मोजून घे. मगच मी निघतो. ” मी गंमतीनं म्हटलं. ती हसली. समोर इतर कस्टमर्स थांबलेले होते म्हणून मग तिने मी दिलेली ती कॅश आणि स्लीप समोर बाजूला सरकवून ठेवली आणि…. “सर, असू दे. तुम्ही स्वत: कॅश मोजून आणलीय म्हणजे ती बरोबरच असणाराय. मी नंतर मोजते. तुम्हाला उशीर होईल. तुम्ही तेवढ्यांसाठी नका थांबू. ” ती मनापासून म्हणाली. ते खरंही होतंच. मला तातडीने स्टॅण्ड गाठणं आवश्यक होतंच. सर्वांचा निरोप घेऊन मी निघालो.

पुढचं सगळंच सुरळीत झालं. मीटिंग चांगली झाली. मला घरी रहाताही आलं. सर्वांना भेटता आलं. गप्पा झाल्या. आराम करता आला. रविवारी नृसिंहवाडीचं दत्तदर्शनही निर्विघ्नपणे पार पडलं. आणि मग नेहमीच्या चक्रात अडकण्यासाठी मी रविवारी रात्री उशिराची सोलापूर बस पकडली. पहाटे साडेपाचच्या सुमारास घरी पोचलो. थोडा आराम करायलासुध्दा वेळ नव्हताच. सगळं आवरून साडेआठला ब्रॅंच गाठली. रात्रभराच्या जागरणाचा शीण सोबत असल्याने उत्साह फारसा नव्हताच. पण जो होता तो उसना उत्साहही नाहीसा करणारं एक अशुभ आक्रित 

ब्रॅंचमधे माझी वाट पहात होतं!मी केबिनमधे जाऊन बसलोही नव्हतो तेवढ्यांत माझीच वाट पहात असल्यासारखे हेडकॅशिअर सुहास गर्दे माझ्या पाठोपाठ केबिनमधे आले.

“गुड मॉर्निंग सर”

“गुड मॉर्निंग. बसा. कांही विशेष?”

“विशेष असं नाही… पण एकदा तुमच्या कानावर घालावं असं वाटलं. तुम्ही परवा शनिवारी इथून गेल्यानंतर थोडा घोळच झाला होता… ” ते म्हणाले.

“घोळ ? म्हणजे.. ?”

“म्हणजे.. ‘लिटिल् फ्लॉवर’ च्या कॅशमधे साडेआठशे रुपये कमी होते सर… “

“काय? अहो, भलतंच काय? कसं शक्य आहे हे?.. “

“हो सर. पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी होत्या… “

एव्हाना प्रचंड दडपणाखाली असलेली सुजाता बोबडे केबिनबाहेर घुटमळत उभी होती, ती आत येऊन माझ्यासमोर खाली मान घालून उभी राहिली.

“सुजाताs. काय म्हणतायत हे?”

” ह.. हो सर. आठशे पन्नास रुपये.. शॉर्ट होते.. “

तिचा आवाज भीतीनं थरथरत होता. तिचे डोळे नेहमीप्रमाणे पाझरु लागले. ती उभीच्या उभी थरथरू लागली. टोकाच्या संतापाने माझं मन भरुन आलेलं असतानाही कांही न बोलता मी डोकं गच्च धरून क्षणभर तसाच बसून राहिलो. संतापाने भरलेल्या जळजळीत नजरेने सुजाताकडे पाहून तिला जायला सांगितलं. डोळे पुसत ती केबिनबाहेर गेली. मी व्यवस्थित पैसे मोजून हिच्याकडे दिलेले असताना आठशे पन्नास रुपये कमी येतीलच कसे? एखाद दुसरी नोट कमी असणंही शक्यच नव्हतं आणि पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी?शक्यच नाही. माझ्या मनातला संशयी विचार सुजाताच्या पाठमोऱ्या आकृतीचा पाठलाग करत राहिला. तिचे कौटुंबिक प्रश्न, थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण, आर्थिक ओढग्रस्तता.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देणारंच होतं. पण तो संशयाचा कांटा मनात रुतण्यापूर्वीच मी क्षणार्धात उपटून तो दूर भिरकावून दिला. नाही… सुजाता असं कांही करणं शक्य नाही… ! मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन कुरतडत राहिला.

“सुहास, इतर कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल.. काहीतरी गफलत असेल. त्या कॅशमधे चूक असणं शक्यच नाही… “

” सगळ्या रिसिटस् दोन दोनदा चेक करून खात्री करून घेतलीय सर. सगळं बरोबर होतं. त्यादिवशी सगळेजण खूप उशीरपर्यंत याच व्यापात होतो. पण आता काळजीचं कांही कारण नाहीय सर. त्या संध्याकाळी आम्ही प्राॅब्लेम साॅल्व्ह करुन मगच घरी गेलो सर. आता प्रॉब्लेम मिटलाय. पैसेही वसूल झालेत. “

मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.

“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत?म्हणजे?कसे?कुणी भरले?”

“मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलायत हेही सांगितलं. त्यांनी लगेच पैसे पाठवले सर. “

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला.

माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं, पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असंच वाटू लागलं. मी शांतपणे डोळे मिटून खुर्चीला डोकं टेकवून बसून राहिलो. पण स्वस्थता नव्हती.

माझ्या मिटल्या नजरेसमोर मला सगळं स्वच्छ दिसू लागलं होतं… ! हो. हे असंच घडणाराय.. !माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडे पहातायत असा मला भास झाला… न्.. मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो.

काहीतरी करायलाच हवं… पण काय? मन सून्न झालं होतं. काय करावं तेच सुचत नव्हतं. आणि.. आणि अचानक.. अस्वस्थ मनात अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक धूसर विचार सळसळत वर झेपावला… आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो… !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments