श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- लिलाताईचा हा श्रीदत्तदर्शनाचा नित्यनेम पुढे प्रदीर्घ काळ उलटून गेल्यानंतर माझ्या संसारात अचानक निर्माण होणाऱ्या दुःखाच्या झंझावातात त्या दुःखावर हळुवार फुंकर घालणार आहे याची पुसटशी कल्पनाही मला तेव्हा नव्हती.)

आम्ही कोल्हापूरला रहात होतो तेव्हाची गोष्ट. १९७९ साल. आमच्या संसारात झालेलं समीरबाळाचं आगमन सुखाचं शिंपण करणारंच तर होतं. बाळाला घेऊन आरती माहेरहून घरी आली तेव्हाचं नजरेत साठवलेलं त्याचं रुप आजही माझ्या आठवणीत जिवंत आहे. समीरबाळाचं छान गोंडस बाळसं,.. लख्ख गोरा गुलाबी रंग.. काळेभोर टपोरे डोळे.. दाट जावळ.. एवढीशी लांबसडक बोटं.. सगळंच कसं सुंदर आणि लोभसवाणं!

समीर माझ्या सहवासात येऊन मोजके दिवसच झाले होते. माझ्या नजरेत नजर घालून ओळख पटल्याचं छानसं कोवळं हसू समीर अजून हसलाही नव्हता त्यापूर्वीच कधी कल्पनाही केली नव्हती अशा त्या अरिष्टाची सुरुवात झाली. समीरला ट्रिपलपोलिओचा डोस द्यायचा होता. डॉ. देवधर यांच्या हॉस्पिटलमधे मी न् आरती त्याला घेऊन गेलो तर तिथे ट्रिपलपोलिओसाठी आधीपासूनचीच लांबलचक रांग. दुसऱ्या मजल्यावरील हाॅस्पिटलपासून सुरू झालेली ती रांग दोन जिने उतरून महाद्वार रोडच्या एका बाजूने वाढत चाललेली. पावसाळ्याचे दिवस. आभाळ गच्च भरलेलं. कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होईल असं वातावरण. आम्ही रांगेत ताटकळत उभे. त्यात समीर किरकिरु लागलेला. काल रात्रीपासून हवापाण्याच्या बदलामुळं असेल त्याचं पोट थोडं बिघडलेलं होतं. रांग हलायची शक्यता दिसेना तसे पाऊस सुरु होण्यापूर्वी घरी जाऊ आणि नंतर कधीतरी आधी अपॉइंटमेंट घेऊन येऊ असं ठरवून आम्ही तिथून निघालो. आमचं घर जवळच्या ताराबाई रोडवरुन पुढं आलं की चालत दहा मिनिटांच्या अंतरावर. ताराबाई रोडवर येताच माझं लक्ष सहजच उजव्या बाजूच्या एका दवाखान्याच्या बोर्डकडे गेलं.

डाॅ. जी. एन्. जोशी. बालरोगतज्ञ बोर्ड वाचून मी थबकलो.

” इथं ट्रिपल पोलिओ डोस देतात कां विचारूया?” मी म्हंटलं. तिने नको म्हणायचा प्रश्नच नव्हता. आजच्या आज डोस देऊन होतोय हेच महत्त्वाचं होतं. आम्ही जिना चढून डॉ. जोशींच्या क्लिनिकमधे गेलो. मी स्वतःची ओळख करून दिली. आमच्या येण्याचं प्रयोजन सांगितलं. समीरचं किरकिरणं सुरूच होतं. त्यात त्याने दुपटं घाण केलं. डाॅ. नी नर्सला बोलावलं. आरती समीरला घेऊन तिच्याबरोबर आत गेली. त्याला स्वच्छ करून बाहेर घेऊन आली. ट्रिपल पोलिओचा डोस देऊन झाला. तेवढ्यांत त्याला पुन्हा लूज मोशन झाली. चिंताग्रस्त चेहऱ्याने डॉक्टर माझ्याकडेच पहात होते.

“बाळाचं पोट बिघडलंय कां? कधीपासून?” त्यांनी विचारलं.

“काल रात्री त्याला एक दोनदा त्रास झाला होता. आणि आज सकाळी इकडे येण्यापूर्वीसुध्दा एकदा. पाणी बदललंय म्हणून असेल कदाचित. पण तोवर छान मजेत असायचा. कधीच कांही तक्रार नव्हती त्याची. “

“ठीक आहे. एकदा तपासून बघतो. वाटलंच तसं तर औषध देतो. ” डॉक्टर म्हणाले.

त्यांनी समीरला तपासलं. त्याची नाडीही पाहिली. ते कांहीसे गंभीर झाले.

” बाळाला एक-दोन दिवसासाठी अॅडमिट करावं लागेल “

” अॅडमिट?कां? कशासाठी ?”

” तसं घाबरण्यासारखं काही नाहीय. पण इन्फेक्शन आटोक्यांत आणण्यासाठी तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. एक-दोन दिवस सलाईन लावावं लागेल. पुढे एखादा दिवस ऑब्झर्वेशनखाली राहील. “

घरी आम्ही दोघेच होतो. आई मोठ्या भावाकडे सातारला गेली होती. पुढच्या आठवड्यात आरतीची मॅटर्निटी लिव्ह संपणार होती. त्यापूर्वी आई येणार होतीच. आत्ता लगेच अॅडमिट करायचं तर तिला लगोलग इकडे बोलावून घेणे आवश्यक होऊन बसेल. मला ते योग्य वाटेना.

“डॉक्टर, घरी आम्ही दोघेच आहोत. आम्हा दोघांच्या पेरेंट्सना आम्ही आधी बोलावून घेतो. तोवर त्याला तात्पुरतं औषध द्याल का कांही? तरीही बरं वाटलं नाही तर मात्र वाट न बघता आम्ही त्याला अॅडमिट करू. “

“अॅज यू विश. मी औषध लिहून देतो. दिवसातून तीन वेळा एक एक चमचा त्याला द्या. तरीही मोशन्स थांबल्या नाहीत तर मात्र रिस्क न घेता ताबडतोब अॅडमिट करा.”

त्यांनी औषध लिहून दिलं. जवळच्याच मेडिकल स्टोअरमधून आम्ही ते घेतलं. यात बराच वेळ गेला होता. मला बँकेत पोहोचायला उशीरच होणार होता. मी समोरून येणारी रिक्षा थांबवली. दोघांना घरी पोचवलं. दोन घास कसेबसे खाऊन माझा डबा भरून घेतला आणि बँकेत जाण्यासाठी बाहेर आलो. आरती बाळाला मांडीवर घेऊन बसलेली होती.

“त्याला औषध दिलंयस कां?”

“पेंगुळला होता हो तो. आत्ताच डोळा लागलाय त्याचा. थोडा वेळ झोपू दे. तोवर मी पाणी गरम करून ठेवते. जागा झाला की लगेच देते. ” ती म्हणाली.

तो शनिवार होता.

“आज हाफ डे आहे. मी शक्यतो लवकर येतो. कांही लागलं तर मला बॅंकेत फोन कर लगेच. काळजी घे ” मी तिला धीर दिला न् घाईघाईने बाहेर पडलो.

त्याकाळी क्वचित एखाद्या घरीच फोन असायचा. त्यामुळे फोन करायचा म्हणजे तिला कोपऱ्यावरच्या पोस्टात जाऊनच करायला लागणार. बाळाला घेऊन कशी जाईल ती?

हाफ डे असला तरी बॅंकेतून बाहेर पडायला संध्याकाळ उलटून गेलीच. त्यात बाहेर धुवांधार पाऊस. घरी पोचेपर्यंत अंधारुन तर आलं होतंच शिवाय मी निम्माशिम्मा भिजलेलो. आत जाऊन कपडे बदलून आधी गरम चहा घ्यावा असं वाटलं पण तेवढीही उसंत मला मिळणार नव्हती. कारण बेल वाजवण्यापूर्वीच दार किलकिलं असल्याचं लक्षात आलं. दार ढकलताच अजून लाईट लावलेले नसल्यामुळे आत अंधारच होता. पण त्या अंधूक प्रकाशातही समोर भिंतीला टेकून आरती समीरला मांडीवर घेऊन थोपटत बसली असल्याचं दिसलं.

“अगं लाईट नाही कां लावायचे? अंधारात काय बसलीयस?” मी विचारलं आणि लाईटचं बटन ऑन केलं. समोरचं दृश्य बघून चरकलोच. समीर मलूल होऊन तिच्या मांडीवर केविलवाणा होऊन पडलेला. निस्तेज डोळे तसेच उघडे. ऐकू येईल न येईल अशी म्लान कुरकूर फक्त.

“काय झालं?अशी का बसलीयस?”

“सांगते. आधी तुम्ही पाय धुवून या न् याला घ्या बरं थोडावेळ. पाय खूप अवघडलेत हो माझे. “

मनातली चहाची तल्लफ विरुन गेली. मी पाय धुऊन घाईघाईने कपडे बदलले आणि समीरला उचलून मांडीवर घेऊन बसलो. त्याचा केविलवाणा चेहरा मला पहावेना.

“जा. तू फ्रेश होऊन ये, मग बोलू आपण. ” मी आरतीला म्हंटलं. पण ती आत न जाता तिथंच खुर्चीवर टेकली. तिचे डोळे भरुन आले एकदम.

“तुम्ही ऑफिसला गेल्यापासून फक्त एक दोन वेळाच दूध दिलंय त्याला पण तेही पोटात ठरत नाहीय हो. आत्तापर्यंत चार दुपटी बदललीयत. काय करावं तेच कळत नाहीय. किती उशीर केलात हो तुम्ही यायला.. “

“तू फोन करायचा नाहीस का? मी रोजची सगळी कामं आवरत बसलो. त्यात हा पाऊस. म्हणून उशीर झाला. तू औषध कां नाही दिलंस?”

“दिलंय तर. दोन डोस देऊन झालेत. तिसरा रात्री झोपताना द्यायचाय. पण औषध देऊनही त्रास थांबलाय कुठं? उलट जास्तच वाढलाय. मला काळजी वाटतेय खूsप. काय करायचं?”

डाॅ. जोशी म्हणालेच होते. त्रास वाढला तर रिस्क घेऊ नका म्हणून. आम्हा दोघानाही या कशाचाच अनुभव नव्हता. अॅडमिट करण्यावाचून पर्यायही नव्हता. कुणा डाॅक्टरांच्या ओळखी नव्हत्या. समीरला डाॅक्टरांकडे न नेता रात्रभर घरीच ठेवायचीही भीती वाटत होती. माझी मोठी बहिण आणि मेहुणे सुदैवाने कोल्हापुरातच रहात होते. त्यांना समक्ष भेटून त्यांच्याशी बोलणं आवश्यक होतं. मी कपडे बदलून जवळचे सगळे पैसे घेतले न् बाहेर आलो.

” कुठे निघालात?”

“ताईकडे. त्या दोघांना सांगतो सगळं. त्यांनाही सोबत घेऊ. तू आवरुन ठेव. मी रिक्षा घेऊनच येतो. जोशी डाॅक्टरांकडे अॅडमिट करायच्या तयारीनेच जाऊ. बघू काय म्हणतायत ते. “

मी ताईकडे गेलो. सगळं सांगितलं.

“जोशी डाॅक्टर? पार्वती टाॅकीजजवळ हाॅस्पिटल आहे तेच का?” मेव्हण्यांनी विचारलं.

मी सकाळी डाॅक्टरांनी आम्हाला दिलेलं त्यांचं व्हिजिटिंग कार्ड खिशातून काढलं. पाहिलं तर हाॅस्पिटलचा पत्ता तोच होता.

” हो. तेच. त्यांचं ताराबाई रोडवर क्लिनिक आहे आणि हॉस्पिटल पार्वती टॉकीजजवळ. तुमच्या माहितीतले आहेत कां?”

” नाही. पण नाव ऐकून होतो. तरीही कोल्हापुरात डॉ. देवधर हेच प्रसिद्ध पेडिट्रेशियन आहेत. आधी त्यांना दाखवू या का? “

 ” चालेल. पण असं ऐनवेळी जाऊन भेटतील कां ते?नाही भेट झाली तर? सकाळी खूप गर्दी होती आम्ही ट्रिपलपोलिओ डोससाठी गेलो तेव्हा, म्हणून म्हटलं”

” ठिकाय. तू म्हणतोस तेही बरोबरच आहे. चल. “

आम्ही रिक्षातूनच घरी गेलो. आरती दोघांचं आवरून आमचीच वाट पहात होती. पावसाचा जोर संध्याकाळपासून ओसरला नव्हताच. समीरबाळाचं डोकं काळजीपूर्वक झाकून घेत ती कशीबशी रिक्षात बसली. मी रिक्षावाल्याला पार्वती टाॅकीजजवळच्या डाॅ. जोशी हाॅस्पिटलला न्यायला सांगितलं. रिक्षा सुरु झाली न् माझा जीव भांड्यात पडला. आत्तापर्यंत ठरवल्याप्रमाणे सगळं सुरळीत सुरू होतं असं वाटलं खरं पण ते तसं नव्हतं यांचा प्रत्यय लगेचच आला. एकतर पावसामुळे रिक्षा सावकाश जात होती. रस्त्यात खड्डेही होतेच. आपण कुठून कसे जातोय हेही चटकन् समजत नव्हतं. तेवढ्यांत रिक्षा थांबली.

” चला. आलं हॉस्पिटल. ” रिक्षावाला म्हणाला. उतरतानाच माझ्या लक्षांत आलं की आपण महाद्वार रोडवरच आहोत. त्या अस्वस्थ मन:स्थितीत मला त्या रिक्षावाल्याची तिडीकच आली एकदम.

“मी पार्वती टॉकीजजवळ डॉ. जोशी असं सांगितलं होतं ना तुम्हाला? इथं उतरुन काय करू?”

 त्यांने चमकून माझ्याकडं पाहिलं. थोडासा वरमला. मी पुन्हा रिक्षात बसलो.

“इथं कोल्हापुरात लहान वयाच्या पेशंटना देवधर डाकतरकडंच आणत्यात समदी. रोज चारपाच फेऱ्या हुत्यात बघा माज्या रिक्षाच्या. सवयीने त्येंच्या दवाखान्याम्होरं थांबलो बगा.. ” तो चूक कबूल करत म्हणाला. पण….. ?

पण ती त्याची अनवधानाने झालेली चूक म्हणजे पुढील अरिष्टापासून समीरबाळाला वाचवण्याचा नियतीचाच एक केविलवाणा प्रयत्न होता हे सगळं हातातून निसटून गेल्यानंतर आमच्या लक्षात येणार होतं… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments