श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ५२ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- ताईच्या संसारात आता खऱ्या अर्थाने स्वास्थ आणि विसावा सुरू होईल असं वाटत असतानाच नेमक्या त्या क्षणी साऱ्या सुखाच्या स्वागतालाच आलेलं असावं तसं ताईचं हे कॅन्सरचं दुर्मुखलेलं आजारपण समोर उभं राहिलं होतं!
“तुला आणखी एक सांगायचंय” मला विचारांत पडलेलं पाहून माझी मोठी बहीण मला म्हणाली.
पण…. आहे त्या परिस्थितीत ती जे सांगेल ते फारसं उत्साहवर्धक नसणाराय असं एकीकडे वाटत होतं आणि ती जे सांगणार होती ते ऐकायला मी उतावीळही झालो होतो.)
“तुला सांगू? ऐकशील?” ती म्हणाली. मी होकारार्थी मान हलवली. “तू खरंच काळजी करू नकोस. मी तुझ्या लाडक्या ताईशीही बोललीय. “
” होय? काय सांगितलंस तिला? आणि ती काय म्हणाली?” मी उत्सुकतेनं विचारलं.
” ‘तू फक्त लवकरात लवकर बरी हो. बाकी कसलीही काळजी करू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. ‘ असं मी म्हटलं तेव्हा ती समाधानानं हसली होती. आणि ‘काळजी कसली गं? तुम्ही एवढी मायेची सगळी माझ्यासोबत असताना काळजी कसली?’ असंही म्हणाली. ”
मोठी बहिण बोलली ते ऐकून खूप बरं वाटलं खरं पण ते समाधान तात्पुरतंच ठरणार होतं.
तसं पाहिलं तर ताईनं खरंच सगळं शांतपणे स्वीकारलं होतं. पण मीच तिच्यात एवढा गुंतून गेलो होतो कीं मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अस्वस्थतेचं हे मनावरचं ओझं कांही झालं तरी मला उतरवायचं होतं. अनायसे दिवाळी जवळ आली होती. भाऊबीजेला नेहमीप्रमाणे तिच्याकडे जायचं हे तर ठरलेलंच होतं. पण यावेळी मी गेलो, ते हे मनावरचं ओझं उतरवूनच परत यायचं असं स्वतःशी ठरवूनच.
मी गेलो तेव्हा मला वाटलं ताई झोपलेली असेल. म्हणून मग आईलाच हांक मारत मी स्वयंपाकघरात डोकावलो. पाहिलं तर ताई देवासमोर बसलेली. खूप थकल्यासारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं सगळं तेज नाहीसंच झालं होतं जसंकांही. तिला पाहून मला कसंतरीच झालं. कांही न बोलता मी हातपाय धुवून आलो. आई मला ‘बैस’ म्हणाली पण माझं लक्ष मात्र ताईकडेच. तिने श्रद्धेने हातातली पोथी मिटून कपाळाला लावली आणि आपल्या थरथरत्या हाताने ती देवघरांत ठेवून दिली.
“हे काय गं ताई? तुला इतका वेळ एका जागी ताटकळत बसवतं तरी का गं आता? कशाला उगीच ओढ करतेयस?”
“इतका वेळ कुठे रे? विचार हवं तर आईला. रोज मी नेहमीसारखा संपूर्ण अध्याय नाही वाचू शकत. म्हणून मग थोड्याच ओव्या कशाबशा वाचते. बसवेनासं झालं कीं थांबते. होय कीं नाही गं आई?”
हे बोलत असतानाच तिने आईकडे पाहिलं. तिचा आधार घेण्यासाठी आपला थरथरता हात पुढे केला. आई तत्परतेने तिच्याजवळ गेली. तिला आधार देत उठवू लागली. ताई तोल सावरत कशीबशी उभी रहाताच माझ्याकडे पहात म्हणाली, “इथं आई आल्यापासून घरचं सगळं तीच बघते. एकाही कामाला मला हात लावून देत नाही. सारखं आपलं ‘तू झोप, ‘ ‘तू आराम कर’ म्हणत असते. कंटाळा येतो रे सारखं पडून पडून.. ” तिचं हे शेवटचं वाक्य इतकं केविलवाणं होतं कीं मला पुढं काय बोलावं सुचेचना. मी लगबगीने उठून पुढे झालो.
“आई.. , थांब. मी नेतो तिला.. ” म्हणत ताईला आधार देत मी हळूहळू तिला तिच्या काॅटपर्यंत घेऊन आलो. तिथं अलगद झोपवलं तशी माझ्याकडे पाहून म्लानसं हसली.
“बैस.. ” काॅटच्या काठावर हात ठेवत ती म्हणाली. मी तिथेच तिच्याजवळ टेकलो. तिच्या कपाळावरून अलगद हात फिरवत राहिलो. तिने अतीव समाधानाने शांतपणे डोळे मिटून घेतले. तिला थोडं थोपटून, ती झोपलीय असं वाटताच मी माझा हात हळूच बाजूला घेतला आणि उठलो.
“का रे ? बैस ना.. ” तिला माझी चाहूल लागलीच. ” जायची गडबड नाहीय ना रे? रहा आजचा दिवस तरी… ” ती आग्रहाने म्हणाली.
माझाही पाय निघणार नव्हताच. पण जाणं आवश्यक होतंच.
“मी नेहमीसारखं जेवल्या जेवल्या निघणार नाहीय, पण संध्याकाळी उशीरा तरी निघायलाच हवं गं. परत येईन ना मी… खरंच येईन. “
“कधी? एकदम पुढच्या भाऊबीजेलाच ना?” उदास हसत तिनं विचारलं.
“कां म्हणून? मुद्दाम रजा घेऊन येत राहीन. बघच तू. मी थोडावेळ आईशी बोलतो. चालेल?”
तिने होकारार्थी मान हलवली. आई न् मी स्वैपाकघरांत बोलत बसलो. तेवढ्यांत केशवराव, अजित, सुजित सगळे आपापली कामं आवरून घरी आले. दिवाळीचा उत्साह असा कुणाला नव्हताच, पण ताईनंच आग्रह केलान् म्हणून आईनं नेवैद्यापुरतं गोडधोड केलं होतं. जेवणं झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या, पण विषय मात्र सारखा ताईभोवतीच घुटमळत राहिला.
दुपार उलटली तसं आईनं चहाचं आधण स्टोव्हवर चढवलं. ते पाहून मी बॅग भरायला घेतली. ताईकडे भाऊबीजेला मुद्दाम येऊनही तिच्याकडून ओवाळून न घेता परत जायची अशी पहिलीच वेळ हे जाणवलं आणि मन कातर झालं. तेवढ्यांत..
“अहोs.. आत या बघू जरा.. ” ताईनं आतून आपल्या खोल गेलेल्या आवाजात केशवरावांना हांक मारली. ते लगबगीने उठले तसा तिचा पुन्हा तोच क्षीण रडवेला आवाज… “आईलाही घेऊन याs.. “
आईही केशवरावांच्या पाठोपाठ घाईघाईने आंत गेली. या अनपेक्षित कलाटणीने मी चरकलो. थोड्या वेळाने केशवराव बाहेर आले.
“क.. काय झालंय?.. ” मी घाबरून विचारलं.
” नाही अरे… कांही नाही.. काय झालंय ते तूच बघ आता.. ” केशवराव कसनुसं हसत म्हणाले.
तेवढ्यांत ताईला आधार देत आई तिला बाहेर घेऊन आली. भिंतीला हात टेकवत ताई जवळच्या खुर्चीवर कशीबशी टेकली. तेवढ्या श्रमानेही ती दमली होती. तिने आवर्जून नेसलेल्या जरीच्या साडीकडे लक्ष जाताच मी थक्क होऊन पहातच राहिलो. तिचा विस्कटलेला चेहरा, विरळ होत चाललेले केस आणि अशा अवस्थेत कशीबशी नेसलेली ही जरीची साडी.. !
“काय ग हे.. ?”
मी न समजून विचारलं. तिने न बोलता हळूच आईकडे पाहिलं.
“मी सांगते. ” आई म्हणाली, “मघाशी हिनं अजितच्या बाबांना आंत बोलावलं होतं ना ते मुद्दाम काॅट खालची ट्रंक बाहेर ओढायला. त्यातली ही साडी मागून घेतलीन्. आणि मला बोलावून माझ्याकडून नेसवून घेतलीयन. ” आई कोतुकाने म्हणाली.
” काय गं हे ताई? कशाला अशी ओढ करायची.. ?”
“कशाला काय? आज ओवाळायला हवं ना तुला, म्हणून रे. ” तिचं हे उसनं अवसान पाहून मलाच भरून आलं. घशाशी आलेला आवंढा मी कसाबसा गिळला आणि घट्ट मनानं सगळं हसून साजरं करायचं ठरवलं.
“वा वा.. चला.. मीही तयार होतो… ” म्हणत पटकन् उठलो. कपडे बदलून आलो. तोवर घाईघाईने ओवाळणीची तयारी करुन आई पाटाभोवती रांगोळीची रेघ ओढत होती.
इथे येताना मी जे मनात ठरवून आलो होतो ते हातून असंच निसटून जाणार असं वाटत असतानाच ताईनेच आवर्जून माझा तो हरवू पहाणारा आनंद असा जपलेला होता! मी हसतमुखाने पाटावर बसलो. निरांजनाच्या प्रकाशात ताईचा सुकलेला चेहराही मला उमलल्यासारखा वाटू लागला. अजित-सुजितनी तिला दोन्ही बाजूंनी आधार देत उभं केलं. आईने ताम्हण तिच्या हातात दिलं. दोन्ही मुलांच्या आधाराने कसंबसं ताम्हण धरून ती मला ओवाळू लागली. मी आवर्जून आणलेलं नव्या कोऱ्या नोटांचं मोठं पॅकेट व्यवस्थित ठेवलेलं एन्व्हलप पॅंटच्या खिशातून बाहेर काढलं… आणि.. ते पाहून ताई गंभीर झाली. ओवाळणारे तिचे थरथरते हात थबकले. ओवाळताना थोडी वाकलेली ती महत्प्रयासाने ताठ उभी राहिली.
” ए.. काय आहे हे? इतकी मोठी ओवाळणी मी घेणार नाही हं.. “
“आई, ऐकतेयस ना ही काय म्हणतेय ते? मी ओवाळणी काय घालायची हे ही कोण ठरवणार? ते भावानंच ठरवायचं असतं आणि घातलेली ओवाळणी बहिणीनं गोड मानून घ्यायची असते, हो कीं नाही गं?” आईला कानकोंडं होऊन गेलं आणि ताईने नकारार्थी मान हलवली.
“तू दरवर्षी घालतोस तेवढीच ओवाळणी घाल. ऐक माझं. मी तेवढीच घेईन. “
“कां पण?”
” हेच मी तुला विचारतेय. याच वर्षी एवढी मोठी भाऊबीज कां? कशासाठी?”
“अगं पण… एवढं तरी ऐक ना गं माझं… “
मी अजीजीने म्हणालो.
“मला सांग, आज सकाळी कोल्हापूरहून पुष्पाताईकडची भाऊबीज आवरून आलायस ना?”
“हो. “
“तिलाही एवढीच ओवाळणी घातलीयस कां?.. ” मी गप्प.
“मग? दोघींनाही नेहमीप्रमाणे सारखीच ओवाळणी घालायची. मी जास्त घेणार नाही. तू लहान आहेस माझ्यापेक्षा आणि माझं ऐकायचंयस.. “
मला यावर काय बोलावं तेच समजेना. सगळं बोलणंच खुंटलं होतं. मी गप्प बसलेलं पाहून तिलाच रहावेना…
“मला खूप ताटकळत उभं रहावत नाहीये रे… “
ती काकुळतीने म्हणाली. मी नाईलाजाने माझा हात मागं घेतला. माझा हट्ट संपला. मी ते एन्व्हलप बाजूला पाटावर ठेवलं. खिशातून दुसऱ्या नोटा काढून नेहमीएवढी ओवाळणी तिला घातली.
तिने अखेर तिचंच म्हणणं असं खरं केलं होतं. मी निघण्यापूर्वी कुणाचं लक्ष नाहीय असं बघून आईला बाजूला बोलावून घेतलं.
“आई, हे एन्व्हलप इथं तुझ्याजवळ ठेव. यात अकरा हजार रूपये आहेत. हे पैसे इथे या घरी लागतील तसे तिला न सांगता तू खर्च कर. “
ऐकलं आणि आईने डोळ्याला पदर लावलान्.
“अरे दोन महिने होऊन गेलेत मी इथे येऊन. माझे सगळे
पेन्शनचे पैसेही तस्सेच पडून आहेत माझ्याजवळ. देवदर्शनाला बाहेर गेल्यानंतर संपत आलेलं किरकोळ जरी माझ्या पैशातून कांही आणलं सवरलं तरी केशवरावांकडून हिशेबाने ते पैसे ती मला द्यायला लावते. एकदा मी तिला समजावलंसुध्दा.
‘अगं मी तर इथंच रहाते, जेवते, मग हक्काने थोडे पैसे खर्च केले तर बिघडलं कुठं? ‘ म्हटलं तर म्हणाली, ‘तुझे कष्ट आणि प्रेम हक्कानं घेतेच आहे ना गं आई मी? मग पुन्हा पैसे कशाला?’
मी एक दिवस हटूनच बसले, तेव्हा म्हणाली, ‘आई, मला माहिती आहे, तू माझ्या भावांकडे रहातेस तेव्हा ते कुणीच तुझे पेन्शनचे पैसे घरांत खर्चाला घेत नाहीत. अगं मग ते इथेच कशासाठी? इथे मला कुठं काय कमी आहे?’ याच्यापुढे काय बोलू मी? कसं समजावू तिला? हे बघ, नेहमीची गोष्ट वेगळी. आता तिला दुखवून नाही चालणार. तिच्या मनाप्रमाणे, ती म्हणेल तसंच वागायला हवं ना? हे पैसे तू परत घेऊन जा. वाईट वाटून घेऊ नको. तिच्या कलानं मी बोलीन, समजावीन तिला, तेव्हा दे हवंतर. ” आई म्हणाली.
मी नाईलाजाने ते पैसे खिशात ठेवले. पूर्वीपेक्षाही त्या पैशांचं ओझं मला आता जास्त जाणवू लागलं. हे ओझं हलकं केल्याशिवाय मला चैन पडणार नव्हती. मी सर्वांचा निरोप घेतला. जाताना केशवरावांना म्हणालो, “माझ्याबरोबर कोपऱ्यावरच्या रिक्षा स्टॉपपर्यंत चला ना प्लीज… ” ते लगेच तयार झाले. मी मनाशी ठाम निश्चय केला. मनातली गदगद आता थेट त्यांच्यापुढंच मोकळी करायची. अगदी मनाच्या तळातलं जे जे ते सगळं त्यांच्याशी बोलायचं असं ठरवूनच बाहेर पडलो खरा, पण ते सगळं बोलणंच नंतर पुढचं सगळं अतर्क्य घडायला निमित्त ठरणार होतं हे तेव्हा मला कुठं माहित होतं… ?
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈