श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी नाईराजानं ते पैशाचं एन्व्हलप खिशात ठेवलं. पूर्वीपेक्षाही त्या पैशांचं ओझं मला आता जास्त जाणवू लागलं. ते ओझं हलकं केल्याशिवाय मलाच चैन पडणार नव्हती. मी सर्वांचा निरोप घेतला. जाताना केशवरावांना म्हणालो,

“माझ्याबरोबर कोपऱ्यावरच्या रिक्षा स्टॉपपर्यंत चला ना प्लीज”. ते तयार झाले. मी मनाशी निश्चय पक्का केला. अगदी मनाच्या तळ्यातलं जे जे ते सगळं त्यांच्याशी बोलायचं असं ठरवूनच टाकलं. पण ते माझं बोलणंच नंतर पुढचं सगळं अतर्क्य घडायला निमित्त ठरणार होतं याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती.)

केशवराव आणि मी घराबाहेर पडलो. चार पावलं चालून गेल्यावर वाटेतच एक सार्वजनिक बाग दिसली. मी घुटमळलो.

“काका, आपण इथं बागेत बसूया पाच मिनिटं? मला थोडं बोलायचंय. ” सगळा धीर एकवटून मी विचारलं. ते ‘बरं’ म्हणाले. आम्ही आत जाऊन बसलो. मला सुरुवात कशी करावी ते समजेचना.

“बोल. काय बोलणार आहेस.. ?”

‘तू लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस.. ‘ हे माझ्या मोठ्या बहिणीचे शब्द मला आठवले आणि आपलं कांही चुकत तर नाहीय ना असं वाटून माझं अवसानच गळून गेलं. मी मान खाली घातली. त्यांच्या नजरेला नजर मिळवण्याचं धाडस मला होईना.

“बोल ना अरे,.. तू गप्प कां? काय झालंय.. ?”

त्यांचे आपुलकीचे शब्द ऐकून मला थोडा धीर आला.

“घरी.. ताईपुढे.. हे सगळं बोलता आलं नसतं म्हणून तुम्हाला त्रास देतोय… ” मी कसंबसं बोलायला सुरूवात केली. आवाज भरून आला न् मी बोलायचं थांबलो. त्यांनी मला अलगद थोपटलं. त्या स्पर्शानेच माझे डोळे भरून आले. मी महत्प्रयासाने स्वतःला सावरलं.

“काका, थोडं स्पष्ट बोललो तर रागावणार नाही ना?”

“नाही रे बाबा,.. बोल तू. “

“काका, आमच्या ताईशी तुमचं लग्न झालं ती खूप नंतरची गोष्ट ना हो? त्याआधी ती आमचीच होती.. हो ना? आमच्या घरातली. आमच्याचसारखी. फक्त तिचं तुमच्याशी लग्न झालं म्हणून तिच्या सगळ्या सुखदुःखांवर फक्त तुमचाच अधिकार कसा?

त्यातला आमचा वाटा आम्हालाही द्या ना. तो तुम्ही दोघेही नाकारता कां आहात?.. ” माझा आवाज भरून आला. आवेग ओसरेनाच.

“अरे.. असं काय करतोयस वेड्यासारखं?” ते मला समजावू लागले.

“मग पुष्पाताई आणि काका दोघे इकडे आले, तेव्हा त्यांनी दिलेले पैसे घेतले कां नव्हते तुम्ही? ‘नको’ म्हणून नाकारलेत कां? आज माझी भाऊबीजही ताईने नाकारली. कां? मी फक्त वयानं लहान म्हणून कुणाला कांहीच विचारायचं नाही कां?… “

माझं बोलणं ऐकून ते मनातून थोडंसं हलले. निरूत्तर झाले. थोडावेळ शून्यांत पहात राहिले. आता स्पष्ट बोलायची हीच वेळ होती.

“काका, हे फक्त तुमच्यावर नाही, आपल्या सर्वांवर आलेलं संकट आहे हे लक्षात घ्या. तुम्ही एकटे नाही आहात. आपण आता मी सांगतो तशी कामं आपण वाटून घेऊया. नोकऱ्यांमधल्या दूरवरच्या पोस्टिंगमुळे मला न् दादाला इथे राहून ताईची काळजी घेता येत नाहीय याचं दोघांनाही वाईट वाटतंय. तेव्हा आईने ठरवलंय तसं ताई बरी होईपर्यंत आई इथे राहून सगळं घरकाम सांभाळू दे. तुम्ही आणि अजित-सुजित ताईच्या औषधांच्या वेळा, तिला हवं-नको सगळं बघताच आहात. अजितच्या काकूंची एरवीही सोबत असतेच शिवाय त्या

हॉस्पिटलायझेशन असते तेव्हा रात्रभर तिच्याजवळ थांबून तिला सांभाळतातही.. यातली कुठलीच जबाबदारी आम्हा भावंडांना मनात असूनही शेअर करता येत नाही. त्यामुळे आजपर्यंतचा आणि याच्या पुढचाही ताईच्या उपचारांचा सगळा खर्च आम्ही भावंडं एकत्रितपणे करणार आहोत. त्याला तुम्ही प्लीज नाही म्हणू नका.. “

मी बोलायचं थांबलो. माझ्या बोलण्यात नाकारण्यासारखं काही नव्हतंच. ऐकता ऐकता त्यांची नजर गढूळ झाली. नजरेतल्या ओलाव्याने त्यांचा आवाजही भिजून गेला.

“तुला माझ्या मनातलं, अगदी खरं सांगू कां?” ते म्हणाले, ” हे मी आत्तापर्यंत घरी कुणापाशीच बोलू शकलेलो नाहीये. कारण माझ्यासारखे घरातले आम्ही सगळेच तुझ्या ताईच्या विचारानेच अस्वस्थ आहोत. तुझ्या बोलण्यातली तळमळ मला समजतेय. तुम्हा सगळ्याच भावंडांच्या सदिच्छांचाच मला या अगतिकतेत खूप आधार वाटतोय. पण खरं सांगू? तुझी ताई आता थोड्याच दिवसांची सोबतीण आहे हे निदान मी तरी मनोमन स्वीकारलंय. पहिल्या दोन केमोजच्या रिअॅक्शन्स तिला खूप त्रासदायक ठरलेल्या आहेत. तिसरा डोस अजून साधारण महिन्यानंतर द्यायचाय. तो ती कसा सहन करेल याचंच मला दडपण वाटतंय. त्यानंतरच ऑपरेशनची गरज आहे कां नाही हे ठरेल. एखादा चमत्कार घडला तरच ऑपरेशन न करता ती बरी होईल हेच वास्तव आहे आणि मी ते स्वीकारलंय. म्हणूनच माझ्या मनातल्या या घालमेलीची तिला कल्पना येऊ न देता मी रोज हसतमुखाने तिला सामोरा जातोय. कसलेही अवास्तव हट्ट न करता अतिशय समाधानानं तिने मला आजवर साथ दिलेली आहे. मला तिचा उतराई व्हायचंय. म्हणूनच मी तिला समजावतो, धीर देतो, हेही दिवस जातील हा माझ्यापरीने तिला विश्वास देत रहातो. ‘तुला कांही हवंय कां?.. जे हवं असेल ते मोकळेपणाने सांग.. मी आणून देईन.. ‘ असं मी तिला नेहमी सांगत, विचारत रहातो. ती हसते. ‘काही नको.. मला सगळं मिळालंय’ म्हणते. खूप शांत आणि समजूतदार आहे ती. त्यामुळेच निदान बाकी कांही नाही तरी तिच्या औषधपाण्याचा खर्च माझ्या कष्टाच्या पैशातून झाल्याचं समाधान तरी मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. माझी ही भावना तू समजून घे. माझ्या नुकत्याच झालेल्या रिटायरमेंट नंतर हे संकट आलंय. यामागे ईश्वरी नियोजन असेलच ना कांहीतरी? म्हणून तर नेमक्या गरजेच्या वेळी माझ्या फंड ग्रॅच्युईटीचे आलेले साडेतीन लाख रुपये आज माझ्या हाताशी आहेत. माझ्या कष्टाच्या पैशातून तिच्या औषधपाण्याचा खर्च करायचं समाधान खूप महत्त्वाचं आहे रे माझ्यासाठी. असं असताना तुम्ही देताय म्हणून तुमच्याकडून पैसे घेणं योग्य आहे कां तूच सांग. तुम्ही सगळीच भावंडं मला कधीच परकी नाही आहात. माझ्याजवळचे हेही पैसे संपतील तेव्हा इतर कुणापुढेही हात न पसरता मी पहिला निरोप तुलाच पाठवीन. मग तर झालं?विश्वास ठेव माझ्यावर. “

मी भारावल्यासारखा त्यांचा प्रत्येक शब्द न् शब्द मनात साठवत होतो. ते बोलायचे थांबले तसा मी भानावर आलो.

“नक्की.. ?”

“हो.. नक्की. वयाने लहान असूनही तुम्ही प्रेमानं, आपुलकीनं, सगळं करू पहाताहात हे खरंच खूप आहे आमच्यासाठी.. ” ते मनापासून म्हणाले. मला खूप बरं वाटलं. मनातली रुखरूख विरुन तर गेलीच आणि केशवरावांबद्दलचा आदर अधिकच दुणावला. परतीच्या प्रवासात याच विचारांची मला सोबत होती. विचार करता करता खूप उशीरा माझ्या लक्षात आलं की वरवर ‘हो’ म्हणत केशवराव पैसे घ्यायला नाहीच म्हणाले होते! तरीही त्या मागचा त्यांचा विचार आणि भावना खूप प्रामाणिक आणि निखळ होत्या. ताईच्या घरातली ही ‘श्रीमंती’ हाच तिचा भक्कम आधार रहाणार होता!

ज्या क्षणी हे नेमकेपणानं जाणवलं आणि माझ्याकडून स्वीकारलं गेलं त्या क्षणीच ताईला मदतीच्या रूपात कांही द्यायचा माझ्या मनातला अट्टाहास संपला. आता एकच इच्छा मनात होती, या जीवघेण्या दुखण्यातून माझी ताई पूर्ण बरी होऊन पुन्हा ते घर पूर्वीसारखं हसतखेळत रहावं. त्या ‘आनंदाच्या झाडा’ची पानगळ संपून त्याला पुन्हा नवी पालवी फुटावी. ताईच्या मनात तरी यापेक्षा वेगळं काय असणार होतं? आणि शिवाय तिच्याही मनात वेगळ्या रूपातला कां असेना पण ‘तो’ आहेच की. तिची कसोटी पहाणारा आणि ताई कसोटीला खरी उतरेल तेव्हा तिला जे हवं ते भरभरून देणारा! ताई खरंतर प्राप्त परिस्थितीला तोंड देत, असह्य यातना सहन करीत, या कसोटीला उतरण्याचा जीवापाड प्रयत्न करते आहेच की. ते फलद्रूप होतील? व्हायलाच हवेत…. ‘ मी भानावर आलो. ताईच्या मनांत आत्ता याक्षणी असेच उलटसुलट विचार येत असतील? ती काय मागत असेल तिच्या मनातल्या

‘त्या’च्याकडे?… परतीच्या त्या संपूर्ण प्रवासात मनात असे भरून राहिले होते ते ताईचेच विचार…. !!

तो प्रवास संपला तरी तिची विवंचना आणि काळजी पुढे बरेच दिवस मनात ठाण मांडून माझं मन पोखरत राहिली होती…. ‘तुझी ताई आता थोड्या दिवसांचीच सोबतीण आहे हे मी मनोमन स्वीकारलंय’… हे केशवरावांचे शब्द पुढे कितीतरी दिवस मनात रुतून बसले होते. कितीही सकारात्मक विचार करायचा म्हटलं तरी त्यांचे ते शब्द मन बेचैन करत रहायचे.

ताईला केमोचा तिसरा डोस देऊन झाल्याचं समजलं तेव्हा वाटलं आता प्रतिक्षा संपली. आता कांही दिवसातच तिचा पुढचा चेकअप होईल आणि ऑपरेशन करावे लागेल की नाही याचा निर्णयही. आम्ही सर्वजण त्या निर्णयाचीच वाट पहात होतो. आॅपरेशन करायचं म्हटलं तरी ती ते सहन करू शकेल कां याबद्दलची साशंकता डाॅक्टरांनी पूर्वी व्यक्त केली होतीच.. आणि ती.. नाही सहन करू शकली तर.. ? केशवराव म्हणाले तसा खरोखरच एखादा चमत्कार घडून ऑपरेशनची गरज न भासताच ताई बरी होईल कां? असेच सगळे उलटसुलट विचार मनाला व्यापून रहायचे. थोडी जरी उसंत मिळाली तरी आम्ही भावंडं आपापल्या सवडीने ताईला भेटून येत असू. त्या भेटीत माझ्या आईच्या मनातली घालमेल, केशवरावांच्या बोलण्यातली अगतिकता, अजित-सुजित दोघांच्याही

नजरेमधे जाणवत रहाणारी व्याकुळता,.. हे सगळंच माझं मन अस्वस्थ करणारं होतं!

अखेर ताईच्या संपूर्ण चेकअपची तारीख ठरली… , ऑपरेशनची गरज निर्माण न होताच ती बरी व्हावी असं सर्वांनाच अगदी मनापासून वाटत होतं.. , याच अस्वस्थ अनिश्चिततेत चार दिवस

कापरासारखे उडून गेले.. !

आता प्रतिक्षा होती ती फक्त तिकडून येणाऱ्या फोनची… आणि त्यादिवशी फोनचा रिंगटोन वाजताच तिकडचाच फोन असणार ही खात्री असल्यासारखा मी फोनकडे धावलो…

फोन तिकडचाच होता…. !

“मामा… मी अजित बोलतोय…. “

त्याच्या उत्तेजित झालेल्या स्वरांनी माझा थरकाप उडाला… त्याच्या आवाजातली थरथर मला स्पष्ट जाणवली आणि मी थिजून गेलो… त्याला ‘बोल’ म्हणायचं भानही मी हरवून बसलो. थरथरत्या हातातला रिसिव्हर कसाबसा सावरत मी तसाच उभा होतो.. !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments