सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(चरैवेति चरैवेति)
[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]
भारतीय रेल्वेची मालकी, रेल्वे मंत्रालयाद्वारे भारत सरकारकडे आहे. सोळा विभागांनी शिवाय भारतीय रेल्वेचे सहा उत्पादन केंद्राचे अधिकारीही , रेल्वे बोर्डाला जबाबदार असतात . रेल्वेचे अंदाज पत्रक दर वर्षी वाढतच आहे .आधुनिकीकरण आणि विकास करण्याचा त्यात प्रस्ताव असतो .प्रवासी आणि मालवाहतुकीचे भाडे ठरविण्यात येते. तसेच लोकसभेत साध्या बहुमताने संमत असावे लागते. रेल्वेलाही लेखा परीक्षेचे नियम लागू असतात. महसुली खर्च भांडवली तुटवडा भारत सरकार भरून काढते. किंवा इंडियन रेल्वे फायनान्स कडून उसने घेतले जातात. २०२० सालचे ७० हजार कोटींचे अंदाजपत्रक आहे. त्यामध्ये अत्यंत उपयुक्त अशा अनेक तरतुदी आहेत.
रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूच्या मोकळ्या जागा सौर ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जातील. दीडशे प्रवासी गाड्या प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर देण्याचा विचार असून प्रमुख पर्यटन स्थळे, तेजस सारख्या गाड्यांनी जोडण्याची योजना आहे. परदेशी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा सुविधांसह प्रवास उपलब्ध करून देण्याची योजना आहे. चोऱ्या आणि आतंकी हमला पासून सुरक्षिततेसाठी स्टेशन मध्ये क्लोज सर्किट कॅमेरे बसवले आहेत. घर बसल्या मोबाईल वर आपण तिकीट काढू शकतो. सर्व डब्यांमध्ये जैव शौचालये आहेत. गाडीतच जेवण मागविता येते. फलाटावर आपला डबा कोठे येणार ,याची बिनचूक माहिती कळू लागली आहे. कोकण रेल्वेने सुरक्षेसाठी, जगातील पहिलेच उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण सिग्नलिंग प्रणाली आणि इंटरलॉकिंग प्रणालीशी जोडले गेल्यामुळे दुर्घटना कमी झाल्या. नॉर्थ ईस्ट फ्रांटियर रेल्वे मधे हे उपकरण यशस्वीरित्या काम करत आहे. मोठमोठ्या मेट्रो सिटी मध्ये, आता मेट्रो धावायला लागली आहे . २००२ला दिल्ली मेट्रो ट्रेन सुरू झाली. भारतातील प्रख्यात सिव्हिल इंजिनियर श्रीधरन १९९५ ते २०१२ पर्यंत दिल्ली मेट्रोचे निदेशक होते. ते भारताचे मेट्रोमॅन ठरले. त्यांचा पद्म आणि पद्मविभूषण देऊन सत्कार केला .मुंबई ,गुरुग्राम, हैदराबाद, कोची ,लखनऊ अनेक ठिकाणी, मेट्रोचा लाभ लोक घेत आहेत. कमीत कमी खर्चात जास्त सुविधा, आरामदायी ,आणि सुरक्षितता, तसेच रस्त्यांवरील गर्दीही कमी झाली .आज १६ लाख कर्मचारी भारतीय रेल्वेत काम करतात. त्यामुळे रोजगारही वाढला .दर दिवशी ,१४000 गाड्या धावतात. पण तरीही प्रवाशांची मागणी पूर्ण होत नाही .सण, उत्सवांच्या वेळी आरक्षण मिळत नाही. आज महिलांना ही रोजगार मिळायला लागला आहे .कौतुकाची गोष्ट म्हणजे आशियातील पहिली महिला इंजिन ड्रायव्हर सुरेखा यादव ,सिव्हिल सर्विस मधील रेल्वे सुरक्षा अधिकारी सुचिता चटर्जी, पहिली सहाय्यक स्टेशन मास्तर रिंकू सिन्हा राँय या उत्तम काम करीत आहेत.
भारतीय रेल्वेचा पसारा सांगायचा तर ,अरे बापरे केवढा अवाढव्य! भारतीय रेल्वे ही भारताची खूप मोठी समृद्धी आहे. भारतातील रेल्वेचे नेटवर्क, अशियात प्रथम क्रमांकाचे आणि जगात दुसऱ्या क्रमांकाचे आहे.ही सर्वात मोठी सरकारी संस्था आहे.६५०००पेक्षा जास्त इंजिन्स, डबे, वाघिणी, कार्यरत आहेत. ५५०००कि.मि.ब्राँडगेज(७५ ) ८०००कि.मि.मिटरगेज(२१
आणि साधारण २५००कि.मि. नँरोगेज असा हा पसारा आहे. नँरोगेज मुख्यतः डोंगरी भागात चालतात.भारतीयांनी अभिमानाने आणि ताठ मानेने सांगाव्यात अशा रेल्वेच्या आणखीही काही गोष्टी सांगता येतील. दार्जीलिंग हिमालयीन रेल्वे मार्गावरील ,’धूम’ हे ठिकाण २१३४मि.उंच आहे. मुंबईचे जी. एस .टी .स्थानक, निलगिरी पर्वत रांगां मधून जाणारी निलगिरी माउंटन रेल्वे, यांनी आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळविले आहे. जम्मू कश्मीर — बारामुल्ला दरम्यानचा ‘पीर पंजाल ‘बोगदा,(११कि.मि.) भारतातील सर्वात मोठा बोगदा आहे त्याचप्रमाणे सर्वात मोठे रेल्वे मार्ग म्हणजे कन्याकुमारी ते जम्मू तावी पुढे ती बारामुल्ला पर्यंत (३७४५कि मि.) ,विवेक एक्स्प्रेस दिब्रुगड ते कन्याकुमारी (४२३३ कि.मि.) तिरुअनंतपुरम ते सिलचर(३९३२ कि.मि.) तिरूनेलवे्ल्ली ते जम्मू(३६३१कि.मि ) सर्वात मोठा फलाट खरगपूर (२७३३ फूट). सर्वात व्यस्त स्टेशन लखनौ. सिक्कीम आणि मेघालय येथे रेल्वेचे जाळे नाही. फेअरी क्वीन हे जगातील सर्वात जुने( १८५५ मधले ) अजून चालू आहे. आणखी अभिमानाने सांगता येईल अशी गोष्ट म्हणजे चेन्नई येथील कोच फॅक्टरी(i, c, f,) ही जगातील सर्वात मोठी कोच निर्माण करणारी, फॅक्टरी आहे एप्रिल २०१८ पासून फेब्रुवारी२०१९ पर्यंत या कंपनीने, २९१९ कोच तयार केले. याच कंपनीने देशातील पहिली हायस्पीड रेल्वे,” वंदे भारत एक्सप्रेस ” सुरू केली. ती नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर
धावते. या कंपनीने शंभर कोटी मध्ये ती तयार केली .ज्याला बाहेर दोनशे ते तीनशे कोटी खर्च आला असता. या गाडीने एक वर्षात, चार लाख किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून ,शंभर कोटी उत्पन्न मिळविले .इतकंच काय पण श्रीलंकेलाही (D.E.M.U) डिझेल मल्टिपल युनिट्स ट्रेन निर्यात केली आहे. तसेच (E.M.U)इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेल्वे तयार केली आहे.अशी पहिलीच गाडी ,ज्याचे पंखे आणि लाईट ,सौर उर्जेवर चालतील. छतावर सोलर पॅनेल बसविलेले आहेत. रेल्वे बाबत आणखी एक मजेशीर गोष्ट सांगायची म्हणजे देशातील जवळ जवळ पंधरा हजार रेल्वे गाड्यांद्वारे कापले जाणारे अंतर, पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या साडेतीन पट आहे.
क्रमशः….
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈