सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भारतीय रेल्वेची भूमिका काय वर्णावी ! भारतीय रेल्वे देशाच्या आर्थिक, सामाजिक, विकासात अग्रेसर आहे. कला, इतिहास ,साहित्य, रहाणीमान, यावर तिचा अदभुत प्रभाव पडला आहे. वेगवेगळ्या प्रांतातील विविधतेत एकता येत असल्याने, ती राष्ट्रीय अखंडतेचे प्रतिक मानायला काय हरकत आहे? दिवसाकाठी अब्जावधी लोक, सर्वात किफायतशीर अशा रेल्वेचा प्रवासासाठी उपयोग करतात. मला आठवतं १९६९–७०च्या सुमारास मिरज– विश्रामबाग आमचा  कॉलेजचा प्रवास तीन महिन्याच्या पासला चार रुपये असा होता .किती स्वस्त ना! मालवाहतूक ,कोळसा, खते ,शेती उत्पादने, पोलाद, खनिजतेल, इतकंच काय दुष्काळी भागात, पाणीसुद्धा पोचविण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे .शिवाय रेल्वे चा ७0 टक्के महसूल हा मालवाहतूक मिळतो .प्रवासी वाहतूकीतूनही  बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. अगदी साधी गोष्ट प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याने सुद्धा (२०१७ ते २०२०) रेल्वेला ९६ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. अलीकडेच पुणे विभागाने फुकटे प्रवासी पकडून आठ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे .उत्पन्नवाढीसाठी आता रेल्वेने संरक्षक भिंती, पूल, ओव्हर ब्रिज, यावर आता खाजगी जाहिराती लावायला सुरुवात केली आहे या इतक्या प्रचंड पसार्याचे व्यवस्थापन करताना रेल्वेलाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ए. सी. फस्ट क्लास, आणि विमान प्रवास यांच्या तिकिटात फारसा फरक नसल्याने कमी वेळेत पोचण्यासाठी प्रवासी विमान प्रवास  पसंत करतात . झुरळ, उंदीर ,घुशी, प्रवाशांनी केलेली अस्वच्छता यावरही बराच खर्च करावा लागतो. सध्या गणेशोत्सवामुळे चाकरमान्यांसाठी कोकणात जाण्यासाठी २२७  फेऱ्या (कोकण रेल्वेच्या) करण्याची मोदींनी तयारी दर्शविली आहे. जी मोदी एक्सप्रेस म्हणून धावत आहे. तसेच ‘ग्रीनफिल्ड,’ एक्सप्रेसचे सर्वेक्षण चालू आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग ती  सहा तासात पोचेल. त्यासाठी  ७०,०००कोटी खर्चाची योजना आहे .अखंड प्रगती चालूच आहे .सी लिंक रोड, प्रमाणेच चार पूल बांधून ,रेल्वे  मार्ग  बांधण्याचा विचारही चालू आहे. त्यासाठी ७५००० कोटी खर्च अपेक्षित आहे. दिवसेंदिवस रेल्वेचा विकास आणि प्रगती चालूच आहे. यापूर्वीचे रेल्वे मंत्री पियूष गोयल यानी उत्तम काम केले आहे. तसेच आताही अश्विनी वैष्णवसारखी अत्यंत कर्तबगार हुशार व्यक्ती रेल्वे मंत्री म्हणून काम करीत आहेत. जयप्रकाश व्यास युनिव्हर्सिटीमधून इंजिनीयर होऊन आय. आय .टी. कानपुरहून ते एम टेक झाले. पेन सिलवानिया मधून एम बी ए झाले.  आज ते एक मोठे आणि जबाबदारीचे पद यशस्वीरित्या भूषवित आहेत.

  अशा या झुक झुक गाडी कडे पाहिलं की मला तिची अनेक रूप दिसतात. लुटू-लुटू रांगते, अशी गोंडस  नँरोगेज गाडी. गुडू गुडू चालते ,अशी पॅसेंजर गाडी. जोरात जोरात धावते ,अशी एक्सप्रेस गाडी.  वायू सम तुफान पळते,अशी सुपरफास्ट गाडी. ताठ्यात, तोर्यात, झोकात चालते, ती वातानुकूलित गाडी. किती वर्णन करावीत तिची!. कवी वसंत बापटनाही शब्द सुचले, “दख्खनच्या राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिलेही  चालली खुषीत”.किती छान!पूर्वी आतुरतेने वाट पहात असताना घरी येणारी पत्र ही रेल्वेच आणून देत होती ना ! प्रत्येक माणसाच्या आयुष्याच्या प्रवासात, जसे अनेक लोक येत असतात .जात असतात .तसाच काहीसा हा रेल्वेचा प्रवास, समांतर रुळावरून चालणारा! सुरुवातीच्या स्टेशन पासूनचा प्रवास करताना, काही मधेच उतरून जातात .काहीजण बराच काळ सहज सोबत करतात. एखादा दोन-तीन स्टेशन पर्यंतच, पण स्मृतीत राहावी अशीच सोबत करतो. एखादा नोकरीसाठी जाणारा तरुण , एखादा मिलिटरी तला जवान, माहेर सोडून सासरी जाणारी नववधू, कोणी बारशाला ,कोणी लग्नाला, कोणी ट्रीपला ,अशा अनेक भावभावनांचे मिश्रण असलेल्यांना, स्वतःसह घेऊन जाणारी ही रेल्वे प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते. आवडते. आपुलकीची वाटते. तिचं किती कौतुक करावं बरं ! इंग्रजांनी बीजारोपण केलेलं रेल्वेचे रोपट, आज त्याचा अभिमान वाटावा असा सुंदर डेरेदार वृक्ष झाला आहे. अजूनही तो वाढतोच आहे. वाढतोच आहे. भारताची महान समृद्धी म्हणून मिरवतो आहे . चरैवेति चरैवेति.

 समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments