श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
विविधा
☆ दिवाळी कालची व आजची ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆
प्रकाश कुलकर्णी सरांनी यंदाच्या ‘नवरत्न’दिवाळी अंकाचा ‘दिवाळी कालची व आजची’हा विषय कळल्यानंतर मला माझं बालपण आठवल.
आम्ही लहान होतो तेव्हाची दिवाळी मला अजूनही आठवते. सहामाही परीक्षा संपली की आम्हाला दिवाळीची सुट्टी लागायची. त्याअगोदरच आम्ही आईबाबांच्या मागे लागायचो.चुलत भावडांना,मामाला भेटण्याची ओढ लागलेली असायची. माझ्या बाबांना तीनही भाऊच.अत्त्या नाही. चौघे चार ठिकाणी असल्याने चारही भाऊ मुलांच्या शाळेच्या सुट्टीत एकत्र जमून कुठेही एकिकडे आम्ही दिवाळी साजरी करायचो.आम्ही सर्व सख्खी चुलत भावंडे एकत्र जमायचो.मोठी धमाल असायची. आम्ही खूप गमतीजमती करायचो.रोज दुपारी पत्ते खेळायचो. कुठलेच। काकाकाकू आम्हा भावंडामधे भेदभाव करत नव्हते. सर्वांना समान न्याय होता.
दिवाळी म्हटली की अजूनही आठवतं ते गारगार कडक थंडीत दात कडकड वाजत असतानाचं कुडकुडत पहाटे उठणं.घड्याळात रात्री झोपताना पहाटे साडेतीन/चारचा गजर लावलेला असायचा. तो झाला हळूच उठायचं आणि बाबांच्या किंवा मोठ्या बहीणभावाच्या सोबतीने अंधारात अंगणात लावलेल्या व पणत्यांच्या उजेडात घाबरत घाबरत जाऊन पहीला फटका लावायचा. तेव्हा आतासारखे गँसचे किंवा लाईट वरचे गिझर नव्हते. कोकणात तर सगळीकडेच नारळीपोफळीची झाडे खूप असतात. त्यामुळे त्यांच्या वाळलेल्या झावळी पडल्यावर त्या गोळा करून त्याच्याच तटक्या विणून त्यांनी शाकारलेल्या खोपीत उन्हाळ्यात लाकडे व झावळी तोडून लहान लहान तुकडे गोळा करून ठेवलेले असायचे. घराच्या मागच्या अंगणात एका कोपऱ्यात चुल बाराही महीने कायमच असायची. त्याजवळच पाण्याचा हौद व त्यालगतच मोठी न्हाणी असायची. चुलीवरच्या हंड्यात पाणी तापत असायच. प्रत्येक वेळी हंड्यात भर घालायची. चुलीत नीट विस्तव करायचा. तेल उटणं लावयचं आणि कुडकुडत पटापटा अंघोळी करायच्या एकमेकांच्या अंघोळीच्या वेळी प्रत्येकाने फटाके उडवायचे.आम्ही बहीणी पुढच्या अंगणात केलेल्या किल्ल्यावर मावळे मांडायचो. त्यापुढे शेणाने सारवलेल्या अंगणात ठिपक्यांच्या कागदाच्या मदतीने ठिपके काढून रांगोळी काढायचो.त्यात रंग भरायचे. तोपर्यंत उजाडायला लागायचे. मग फराळ करायचा. त्याबरोबरच दहीपोहेही असायचे.
हळूहळू काळ बदलला. मानवाच्या प्रगतीबरोबर जंगले,थंडी कमी झाली. आता पुर्वीसारखी थंडी पडत नाही. पहाटे उठणंही कमी झालं.ठिपक्यांची रांगोळी जाऊन संस्कारभारतीच्या रांगोळ्या आल्या. नोकरीच्या बदलेल्या स्वरुपामुळे रजा मिळणे कठीण झाले. त्यामुळे एकत्र येऊन सण साजरे केले जात नाहीत. पुर्वी एकमेकांना दिवाळीची भेटकार्ड पाठवली जायची. ती.बंद झाली. बायका दिवाळीचा फराळ करायला एकमेकांच्या घरी जमायच्या.एकमेकांना फराळाचे डबे ,ताटं द्यायच्या.फराळ ,भाऊबीजेची एकत्र जेवणं सगळंच कमी झालं माणसातलं प्रेम कमी झालं. बाजारात साचेबद्ध किल्ले मिळतात. अपार्टमेंट झाल्याने प्रत्येकाचा वेगळा आकाशकंदील आणि लाईटच्या माळा त्यामुळे इमारती झगमगतात.सर्व अपार्टमेंटची अंगणं गाड्यांच्या पार्किंगने भरून गेलेली असतात रांगोळीला जागाच नसते. फ्ल्याटच्या दाराशी काळ्या फर्शीवर छोटीशी रांगोळी काढली जाते. त्यातही तयार रांगोळ्याहि अनेक प्रकारच्या बाजारात मिळतात.
एकुण काय पुर्वीच्या दिवाळीची मजा कमी झाली हेच खरं. आणि या दोन-तीन वर्षात पावसाळी पुर त्याबरोबरच आताचा हा कोरोना या नैसर्गिक संकटांमळे सगळं बदलून गेलं.या कोरोनामुळे तर सगळीकडेच वाहतूक व दुकाने बंद आहेत.घरातून बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.
आठवणी जागतात
मन मोहून जातात
बदलत्या जगासवे
लागते बदलावे
© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈