सुश्री मंजुषा सुनीत मुळे
विविधा
☆ दिन दिन दिवाळी – भाग-2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
दारावरती तोरण, अंगणी
ताजी सडा – रांगोळी
अवतीभवती लखलखती
सांगती पणत्यांच्या ओळी
आली, आली दिवाळी आली ——
——– दिवाळी आली आणि घरोघरी जराशी विसावली की मग ती दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते “ नरकचतुर्दशी “ या नावाने. या दिवशी नरकासुर या राक्षसाचा, कृष्ण, सत्यभामा, आणि काली यांनी वध केला, आणि त्याचा आनंद यादिवशी साजरा केला जाऊ लागला, अशी पुराणकथा तर सर्वश्रुतच आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी, म्हणजे चंद्रप्रकाशात , वाटलेले तीळ अंगाला चोळून मग अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे, आणि असे केल्याने, दारिद्र्य, दुर्दैव आणि अनपेक्षित अप्रिय घटना, यापासून संरक्षण होण्यास मदत होते, असेही मानले जाते. नंतर नरकासुराचे प्रतीक म्हणून
‘करट‘ नावाचे छोटे फळ पायाने चिरडणे, अशासारख्या प्रथाही आहेत. विचारांती असे जाणवते की या प्रथा-पद्धतींमागचा खरा आणि उदात्त हेतू हाच असावा की, ‘ आळस , वाईट विचार आणि त्यामुळे घडणारी वाईट कृत्ये यामुळे आयुष्यात नरकसदृश परिस्थिती निर्माण होते याची जाणीव सर्वच माणसांना व्हावी, आणि सर्वांच्याच आयुष्याला सज्ञानाचा, सत्प्रवृत्तींचा , आणि सत्कर्मांचा प्रकाश सदैव व्यापून रहावा.’
या दिवसाला — काळी चतुर्दशी, रूप चतुर्दशी, छोटी दिवाळी, भूत चतुर्दशी, काली चौरस, आणि नरक-निवारण चतुर्दशी– अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते.
हा दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो—
कालीमातेने नरकासुराचा वध केला होता असे मानून काही भागात यादिवशी महाकाली म्हणजे शक्तीचे पूजन केले जाते.
काही तमीळ कुटुंबांमध्ये या दिवसाला “ नोम्बू “ असे म्हणतात, आणि याच दिवशी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.
कर्नाटकात तसेच गोवा आणि तामिळनाडूमध्ये दिवाळी वसुबारसेला नाही, तर नरकचतुर्दशीला सुरु होते, असे मानतात.
राजस्थान-गुजरातमध्ये याला “ काली चौरस “ असे म्हणतात. दुष्ट आत्मे आणि दुष्ट माणसांची काळी- म्हणजे वाईट नजर कोणावर पडू नये म्हणून कुलदेवतेचे पूजन केले जाते. याच सुमारास शेतातले नवे धान्य घरात आलेले असते, त्यासाठी यादिवशी देवाचे आभार मानले जातात.
गोव्यात कागद-गवत आणि फटाके यापासून नरकासुराचा प्रतीकात्मक पुतळा बनवून, त्याचे दहन केले जाते. तिथेही ‘ करट ‘ हे कडू फळ पायाखाली चिरडून जणू नरकासुराला चिरडून मारतात.
पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेचा आदला दिवस “ भूत-चतुर्दशी “ म्हणून पाळला जातो. तिथे असा विश्वास बाळगला जातो की, या दिवशी आधीच्या चौदा पिढयांमधल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या कुटुंबातल्या हयात असलेल्या नातेवाईकांना भेटायला येतात. त्यावेळी त्यांना घराचा रस्ता कळण्यासाठी आणि घराभोवती घुटमळणाऱ्या दुष्ट आत्म्यांना आणि दुष्ट शक्तींना हुसकावून लावण्यासाठी घराभोवती चौदा दिवे लावले जातात. घरातले अंधारे कोपरे-कोनाडे प्रकाशाने उजळून टाकले जातात.
दक्षिण भारतातील काही भागात या दिवसाला “ दीपावली भोगी “ असे म्हटले जाते. म्हणजे दिवाळीचा आदला दिवस.
“विविधतेत एकता “ हे आपल्या देशाचे अनेक बाबतीत दिसणारे वैशिष्ट्य या दिवशीही प्रकर्षाने दिसून येते, कारण हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या चालीरीतींनुसार साजरा केला जात असला, तरी प्रत्येक ठिकाणी त्यामागील विचारात मात्र “संपूर्ण एकता “ आहे, असे निःशंकपणे म्हणायला हवे — आणि तो विचार म्हणजे– माणसाच्या मनातल्या विनाशकारक दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचार-आचार, घातक सवयी, आणि एकूणच आयुष्य दुःखदायक आणि नरकसदृश्य करणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा संपूर्ण विनाश व्हावा, आणि संपूर्ण मानवजातीलाच आनंदी- शांत- समाधानी, असे साफल्याने उजळलेले संपन्न आयुष्य जगता यावे. हाच विचार नरकासुरासारख्या इतर कितीतरी उदाहरणांचा प्रतीकात्मक उत्तम उपयोग करून, विविध सणांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ठसवण्याचा विचार ज्या ज्या कुणी इतका जाणीवपूर्वक आवर्जून केला असेल, त्या सर्व महान माणसांना यानिमित्ताने कृतज्ञतापूर्ण मनःपूर्वक नमस्कार.
यानंतरचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. दिवाळीतला हा महत्वाचा दिवस. या दिवशी श्रीविष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या बंदिवासातून मुक्त केले, ही पौराणिक कथा बहुतेकांना माहिती आहे. भारतीय संस्कृतीतील ही वैशिष्ट्यपूर्ण पूजा मानली जाते. कारण अमावस्या, एरवी इतर अकरा महिन्यांमध्ये अशुभ मानली जात असली, तरी अश्विन महिन्यातली ही अमावस्या मात्र अतिशय शुभ मानली जाते. अशी आख्यायिका आहे की, या अमावास्येच्या रात्री स्वतःला राहण्यासाठी योग्य असे स्थान शोधण्यासाठी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. आणि ज्या घरी चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, आणि क्षमाशील पुरुष, आणि गुणवती, पतिव्रता स्त्रिया राहतात, त्या घरी रहाणे तिला आवडते. आत्ताच्या काळात मात्र लक्ष्मीचे हे योग्य घर शोधण्यासाठीचे जे निकष आहेत, त्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव लक्ष्मीने तरी करू नये अशी तिला मनापासून विनंती करावीशी वाटते, कारण पतिव्रता या शब्दात अपेक्षित असलेला एकनिष्ठपणा, आणि गुणसंपन्नता ही दोघांमध्येही असली पाहिजे. तसेच वर उल्लेखलेले गुणही दोघांनी , किंबहुना घरात राहणाऱ्या सर्वांनीच अंगी बाळगले, तरच ते पूर्ण कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी-समाधानी, आनंदी आणि इतरांना — आणि अर्थात लक्ष्मीलाही हवेहवेसे वाटेल —- पण हा विचार, काही अपवाद वगळता, जनमानसात अजून तरी म्हणावा तसा रुजलेला दिसत नाही याचा खेद वाटतो . असो.
या दिवशी समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची संध्याकाळनंतर पूजा केली जाते. ही पूजा मुख्यतः धनलक्ष्मीची आणि कुबेराची केली जाते. पैसे, दागिने, व्यवसायाच्या वह्या, अशी चल आणि अचल लक्ष्मीची, थोडक्यात स्वतःकडे असणाऱ्या समृद्धीची ही पूजा असते. तिच्यामुळेच आपण शक्य तितके सुखाचे जीवन जगू शकत आहोत ही कृतज्ञतेची भावनाच यावेळी म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांमधून, प्रार्थनांमधून व्यक्त होतांना दिसते. लक्ष्मीबरोबर कुबेराची पूजा का ? तर कुबेर हा देवांच्या संपत्तीचा संग्राहक समजला जातो. आणि संपत्ती कशी राखावी याची शिकवण त्यांनी द्यावी अशी प्रार्थना त्यांच्याकडे केली जाते.
चुकीच्या मार्गाने मिळवलेली संपत्ती “ अलक्ष्मी “ समजली जाते, जिला अजिबातच पूजनीय म्हणता येत नाही, हे मात्र ही लक्ष्मीपूजा करतांना ध्यानात ठेवलेच पाहिजे. जिथे सर्वतोपरी पावित्र्य, शुद्धता, सत्यता, आणि भक्ती असते तिथेच लक्ष्मी निवास करते. अशा ठिकाणी धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी, आणि मुख्य म्हणजे गृहलक्ष्मीही समाधानी असणे गृहीत असते. घर स्वच्छ ठेवणाऱ्या केरसुणीचीही यादिवशी लक्ष्मी म्हणून पूजा करणारी आपली थोर संस्कृती आहे खरं तर. पण एरवी प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता, कितीतरी घरांमध्ये गृहलक्ष्मीला केरसुणीसमानच वागणूक दिली जात असल्याचे जाणवते. अशी घरे पाहतांना, “ यांच्याकडे लक्ष्मी म्हणजे केरसुणी “ असे उलटे समीकरण आहे की काय ? ” असा उपरोधिक प्रश्न आपसूकच पडतो. म्हणून लक्ष्मीपूजनाचे बाकीचे सोपस्कार आणि प्रार्थना करतांना, “ आता माझी गृहलक्ष्मीच या प्रश्नाचे योग्य उत्तर देण्याइतकी सक्षम आणि पुरेशी खंबीर होऊ दे गं लक्ष्मीमाते–कृपा कर. माझे आयुष्य- माझे घर तिच्याशिवाय समृद्ध होऊच शकणार नाही — “ ही प्रार्थनाही प्रत्येक विचारी माणसाने फक्त यादिवशीच नाही तर नेहेमीच करावी ही माफक अपेक्षा आहे.
ही आणि आयुष्यातली यापुढची प्रत्येकच दिवाळी सर्वांना अतिशय सुख-शांती देवो या हार्दिक शुभेच्छा.
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈