श्रीमती अनुराधा फाटक
☆ विविधा ☆ दीप ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
दीप म्हणजेच दिवा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारे एक माध्यम, साधन! पृथ्वीच्या उत्पत्तीपासून जगाच्या नाशापर्यंत ज्याचे अस्तीत्व असणार आहे तो सूर्य मानवाच्या आयुष्यातला प्रथम दीप, दिवा ! काही दिवे अत्यंत दीप्तीमान असतात तर काही अत्यंत शांतपणे तेवणारे असतात.सूर्य हा असाच अत्यंत दीप्तीमान दिवा ज्याशिवाय आपले जगणे अशक्य!
मानवाच्या गरजेतून निर्माण झालेला पहिला दिवा! दिवा म्हणजे गारगोटीच्या घर्षणातून निर्माण झालेली ठिणगी. मानवाला लागलेला अग्नीचा शोध ही दिव्याची सुरवात होय. दिवटी, पणती, सम ई, कंदील, बत्ती आणि विद्युत अशी दीप, दिव्याची अनेक रुपे म.वि. कुलकर्णी यांच्या कवितेत आढळतात.
अंधार नष्ट करून प्रकाश देणे हे दिप, दिव्याचे काम असून त्या प्रकाशाने आपल्याला आनंद होतो. मग तो अंधार आसमंतातील असो वा मनातील !
सूर्य अस्ताला गेला की देवापुढे दिवा लावून ‘ शुभंकरोती कल्याणम्’ म्हणायचे संस्कार आपल्यावर लहानपणीच झालेले आहेत. त्यातील ‘दिव्या दिव्या दिपत्कार, कानी कुंडलं मोतीहार’ ही ओळ आपल्याला दीपज्योतीचे महत्व सांगते.देवघरात सम ईत तेवणारी दोन वातींची, दिव्यांची ज्योत म्हणजे देवाच्या कानातील प्रकाशमान कुंडल असावीत आणि त्या ज्योतीभोवती निर्माण झालेले तेजोवलय म्हणजे मोत्यांचा हारच वाटतो.ते तेजोवलय आपणआपल्या डोळयांत साठवितो. ही साठवण आपल्याला बरेच काही देऊन जातो.
आपल्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा दीप म्हणजे ज्ञानदीप आपल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे प्रकाशित होऊन आपले आयुष्य उजळून टाकतो.
काही वेळा बौध्दिक ज्ञानदीप प्रकाशित होणारा असूनही एखाद्याच्या आयुष्यात अंधारी रात्र येते त्यांमुळे त्याच्या स्वप्नांचे आशादीप मंदावतात तर कधी कधी नैराश्य आले असताना अचानक आशादीप प्रज्वलित झालेलेही पहावयास सापडतात.
पूर्वी वंश वृध्दीसाठी वंशदिप म्हणजे पुत्रजन्माला फार महत्व होते. आता काळ बदलत चालला असून दीपाचे दुसरे रूप पणती लोक आनंदाने स्वीकारू लागले आहेत.
दीप कोणताही असो तो समाजाला,मनाला प्रज्वलित करत असतो. अर्थात दीपाचे प्रज्वलित होणे त्याला मिळणाऱ्या तेलवातीवर अवलंबून असते हे विसरून चालणार नाही दीपावलीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या मनातला सर्व अंधकार संपून जावा, प्रत्येकाने आपला मनाचा दीप संस्कार, सत्कार्यासाठी प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करत सतत, ‘दिव्या दिव्या दीपत्काराचे स्मरण ठेवणे गरजेचे आहे आपली गरज सतत स्मरणात रहावी यासाठीच दीपांची आरास! दीपावली साजरी करावयाची !
© श्रीमती अनुराधा फाटक
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈