श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ देव,अल्ला,गाॅड वगैरे… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

मानवी जीवनाची कूस बदलवून टाकणारा तो शब्द …अवघ्या चारपाचशे वर्षात पृथ्वीच्या रंगमंचावर दाखल झाला आणि बघता बघता संपूर्ण मानवी आयुष्य व्यापून टाकले. तो शब्द केवळ शब्द नसून मानवी जीवनाची गुरुकिल्ली म्हणावी इतपत तो महत्त्वाचा बनला आहे. त्या शब्दाचे फायदे अगणित आहेत आणि काही तोटे देखील आहेत.   हा शब्द मानवी जीवनात तंत्रज्ञान म्हणून सत्ता गाजवतो मात्र या शब्दाला मानवी जीवनात जेव्हा “मुल्यात्मक” वजन प्राप्त होईल तेव्हा मानवी जीवनाचा संपूर्ण हितवर्धक कायापालट होईल याची नक्कीच खात्री देता येते. संपूर्ण जगाला खेडे बनवण्याची किमया याच शब्दाच्या प्रभावाने घडवून आणली आणि दुसऱ्या टोकावर संपूर्ण जगाचा विनाश करण्याची ताकद देखील याच शब्दाच्या विकृत वापराने मनुष्याच्या वाट्याला आली आहे.हा शब्द आणि त्याच्या योग्य जाणीवा समजून घेऊन मानवी जीवन फुलवले पाहिजे .

विज्ञान …..एक जादुई शब्द आहे. जादुई याकरिता म्हटले की, जादूची कांडी फिरवल्याचा जो परिणाम कल्पनेत दिसून येतो त्याहून अधिक जादुई परिणाम या शब्दाच्या वापराने मानवी सृष्टीत झाला आहे. अवघ्या चारपाचशे वर्षापूर्वी विज्ञान सर्वार्थाने मानवी नजरेत भरले आणि जगाचे स्वरूप आरपार बदलले. मनुष्याच्या प्रगतीच्या वाटा विज्ञानानेच मोकळ्या केल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याची कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणून दाखवली. तंत्रज्ञान ही विज्ञानरुपी नाण्याची एक बाजू आहे. या बाजूने आता मानवी जीवनाचा कोपरा न् कोपरा व्यापलेला आहे. मनुष्याने या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाचा अतोनात फायदा उपटला आहे. याचबरोबर या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाची घातक बाजू म्हणून अण्वस्त्ररुपी विनाशकी हत्यारे निर्माण झाली आणि पृथ्वी विनाशाच्या टोकावर उभी राहीली हे देखील काळे सत्य आहे. विज्ञानाची सृष्टी जेवढी मोहक आहे , उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व बहुपयोगी आहे विज्ञानाची दृष्टी. ही दृष्टी मानवी वर्तनात व्यवहारात आली की … अंधश्रध्दा, कर्मकांडे, धर्मांधता, जातीयता , भयता , प्रांतीयता , वंशवादता , अलैंगिकता अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. विज्ञानाची दृष्टी म्हणजे विज्ञानाला ” मुल्यात्मक जाणीवेने ” मानवी जीवनात प्रतिष्ठीत करणे. विज्ञानाची नेमकी जाणीव म्हणजे विज्ञान तुमच्या मनांत असंख्य प्रश्न उभे करते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मार्ग देखील ” वैज्ञानिक दृष्टिकोन ” ठेवून मिळवता येतो ही सकारात्मक विधायक भावना रुजवते. विज्ञानाची नेमकी जाणीव हीच की , मनुष्याचे पृथ्वीवरील क्षुद्रत्व समोर ठेवते आणि पुन्हा मनुष्याच्या बुध्दीला उत्तेजना देऊन त्याचे प्राणी सृष्टीहूनचे अधिकचे महत्त्व ठळकपणे समोर आणते. विज्ञानाची जाणीव म्हणजे जादूची कांडी फिरवायला देखील योग्य ध्यास व ध्येय असावे ही भावना प्रबळ करून मनुष्यच पृथ्वी जगवू शकतो असा ठाम आत्मविश्वास मानवी मनांत निर्माण करते. विज्ञानाची ठळक जाणीव म्हणजे जोवर विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तोवरच माणसाला शक्तीशाली बनण्याची संधी आहे , आव्हान आहे  आणि त्याचबरोबर समस्त सृष्टीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे भानं देखील उपलब्ध आहे. विज्ञान हा शब्द वगळून मानवी जीवनाचा भूतकाळ नाही …वर्तमानकाळ नाही …अन् भविष्यकाळ अजिबात नाही.

विज्ञानाचा नैतिक दबदबा इतका की, धर्म नावाच्या संघटीत क्षेत्राला बाजूला करण्याची हिंमत बाळगून आहे. धर्माला योग्य पर्याय म्हणून विज्ञानवादी असणे ही एक वैचारिक भुमिका मांडली जात आहे. विज्ञानाएवढा ताकदीचा आणि संपूर्ण मानवी समाज व्यापणारा दुसरा शब्दच उपलब्ध नाही . विज्ञानाची ही किमया अफाट आहे, जादूई आहे, प्रगतीशील आहे. फक्त जाणीव हीच राखली पाहिजे की, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच विज्ञानाची दृष्टी मानवी समाजात अधिक फैलावली पाहिजे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments