सुश्री संगीता कुलकर्णी
☆ विविधा ☆ !! दिवाळी !! ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
आकाशाचा निळा गाभारा सजला
चंदेरी चांदण्यांनी
थंडीचा अत्तर स्पर्श मऊ- मुलायम
बनवला उन्हालाही
केला दूर अंधकार केसरी- पिवळसर
प्रकाश दिव्यांनी
प्रसन्न उत्सव प्रकाशाचा
दीपावलीचा
चैतन्याच्या पहाटेचा… !!
काळानुरुप प्रत्येक गोष्टीत बदल होणे अपरिहार्य आहे. तसाच बदल मुंबईत साजरा होणा-या दिवाळीत झाला आहे… दिवाळी ही धनश्रीमंतांचे इमलेही उजळते व मन श्रीमंतांचे दरवाजेही उघडते..मुंबईची दिवाळी म्हणजे फटाक्यांचा दणदणाट, आतषबाजी, चमचमीत फराळ, सुगंधी उटणे, दिव्यांची रोषणाई असे बरेच काही असते..
दिव्यांची रोषणाई म्हणजे फक्त दिवे लावून अंगण उजळणं एवढचं नाही तर या दिव्यांनी मनाचा गाभारा भरला पाहिजे उजळला पाहिजे. आज माणसांचं मन अंधारात चाचपडतयं त्याला स्वतःचा उजेड मिळेनासा झालाय त्यासाठी त्यानं स्वतःच स्वतःचा दिवा लावायला पाहिजे. दिव्यांचे प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलसं करून समसमान प्रकाश देते ना अगदी तसच्चं…
मोबाईलच्या जमान्याने शुभेच्छा पत्र, मेसेजेस कालबाह्य झाली आणि आपली मन बँकवर्ड झालीत.
एकमेकांच्या संवादाचे सूर धुसर झालेले दिसतात. दिवाळीच्या निमित्ताने ख-या अर्थाने प्रत्यक्ष जगण्यातचं स्वतःला झोकून द्यावं . चारचौघांबरोबर, समाजाबरोबर संवादाच्या भिंती बांधाव्यात त्यामुळे जीवनात नवचैतन्य निर्माण होईल.
सामाजिक बांधिलकी जोपासण्याचाही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करायला हवा तसेच या कालावधीतही वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा, स्पर्धा, कविता पाठांतर, गायन कथा-कथन अश्या स्पर्धांचे आयोजन करावे त्यामुळे आपण एकत्र येतो व एकत्रित संवादही साधला जातो.
दिवाळी पहाट ही संकल्पना तर अतिशय सुंदर… सांस्कृतिक क्षेत्रातून केला गेलेला एक अनोखा कार्यक्रम.. दिवाळी पहाट संगीतमय व्हावी हा हेतू विविध कला असलेले कलाकार एकत्र येऊन कलेचे सादरीकरण घरघुती स्वरूपात करत होते. कालांतराने त्याचे सार्वजनिक स्वरूप झाले.आता तसे न करता ” दिवाळी पहाट ” ही घरघुती स्वरूपाचीच असावी त्यामुळे सर्वांना अगदी सर्वांनाच त्याचा लाभ घेता येईल व आनंदही लुटता येईल.
खरी ” दिवाळी पहाट ” झाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येईल.
आपल्या समाजात असेही काही उपेक्षित लोक आहेत जे या सगळ्या आनंदा पासून वंचित आहेत या आनंदाला मुकले आहेत. अश्या लोकांबरोबर जर दिवाळी साजरी केली तर आपल्या बरोबरच सर्वांची दिवाळी सुखाची जाईल आणि सर्वांच्याच चेह-यावर आनंद दिसेल.
अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक अशांसाठी कामे करणा-या संस्थांना देणग्या द्याव्यात. त्यांच्या बरोबर जर आपण दिवाळी साजरी केली तर त्यांच्या चेह-यावरचे हसू आनंद आपल्या मनाला आत्मिक समाधान देऊन जातं ख-या अर्थाने दिवाळी साजरी होईल असे मी मनापासून नमूद करीन.. या सणामागचा उदात्त हेतू असा की कृतज्ञतापूर्वक माणुसकी जोपासून परोपकार करावा. सर्वांना आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे. तसेच विश्वाचं पालन करणा-या महाशक्तीलाही विसरू नये..
© सुश्री संगीता कुलकर्णी
ठाणे
9870451020
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈