☆ विविधा ☆ दिनविशेष – २४-२५ डिसेंबर २०२० – ??नाताळ…. ??☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆
उद्या २५ डिसेंबर, ख्रिसमस म्हणजे नाताळचा सण. ख्रिश्चन समुदायाचा हा सर्वात मोठा सण आहे. प्रभू येशुंचा जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.२४ डिसेंबर च्या संध्याकाळी चर्चमधे इव्हिनिंग मास म्हणजे प्रार्थना होतात. २४ च्या मध्यरात्री मिडनाइट मास सुद्धा होतात,मेरीने मध्यरात्री येशू बाळाला जन्म दिला म्हणून.. ख्रिसमस म्हटलं की केक, सजवलेला ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजची भेटवस्तू, गिफ्ट या गोष्टी आठवतात. सांता क्लॉजचे गिफ्ट ही लहान मुलांच्या दृष्टीने या सणातील अगदी आनंददायी गोष्ट..
लाल रंगाचा डगला, लाल रंगाची गोंडेदार टोपी, पांढरीशुभ्र दाढी असं सांताचं रूप .
कोण बरे हा सांताक्लॉज?
आजपासून दीडहजार वर्षांपूर्वी जन्मलेले सेंट निकोलस यांना खरा सांता आणि सांताचे जनक मानले जाते. सेंट निकोलस म्हणजेच सांता, परंतु सेंट निकोलस आणि येशुंच्या जन्माचा काही संबंध नाही.
सेंट निकोलसचा जन्म तिसर्या शतकात, येशुंच्या मृत्युनंतर 280 वर्षांनंतर मायरा येथे झाला. ते एका श्रीमंत कुटुंबात जन्मले होते. ते लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. लहानपणापासूनच त्यांची प्रभू येशुंवर नितांत श्रद्धा होती. मोठे झाल्यानंतर ते ख्रिश्चन धर्माचे पादरी (पुजारी) आणि नंतर बिशप बनले. गरजूंना आणि लहान मुलांना भेटवस्तू देण्याची त्यांना आवड होती. या सर्व भेटवस्तू ते मध्यरात्रीच देत असत, कारण देताना कोणी आपल्याला पाहू नये अशी त्यांची इच्छा होती. स्वतःची ओळख ते कोणासमोरही आणू इच्छित नव्हते.
कुणालाही मदत करताना ती शक्यतो झाकल्या मुठीनं करावी उगीच त्याचा गाजावाजा करू नये हा किती छान विचार आहे नाही यात..
बायबलमधली गुड सामारिटनची गोष्ट खूप प्रसिद्ध आहे.. सामारिटन म्हणजे सामारिया प्रांतातले लोक. यांचे आणि ज्यू लोकांचे वैर होते. ज्यू लोक सामारिटनना खालच्या दर्जाचे मानत.. जेरुसलेम आणि जेरिको या दोन शहरा दरम्यान घडलेली ही गोष्ट. एकदा एका ज्यू प्रवाशाला या वाटेमध्ये लुटारूंनी लुटलं. त्याला बेदम मारहाण केली अगदी अर्धमेलं करून सोडलं. तो बिचारा विव्हळत रस्त्यावर पडला होता. थोड्या वेळाने त्या रस्त्यावरून एक ज्यू धर्मगुरू गेला. त्याने त्याच्याकडे पाहिलं. हळहळ व्यक्त करत तो आपल्या कामाला पुढे निघून गेला. नंतर अजून एक माणूस त्या रस्त्यावरून गेला. त्यानेही या विव्हळणाऱ्या प्रवाशाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर तिथे एक सामारिटन आला. त्या विव्हळणाऱ्या माणसाला पाहून तो अगदी कळवळला. तो त्या माणसाजवळ गेला, त्याने त्याच्या जखमा स्वच्छ केल्या.त्यावर थोडी आपल्याजवळची वाईन लावली आणि त्याला आपल्या घोड्यावर टाकून जवळच्या उपचार केंद्रात घेऊन गेला. एवढं करूनच तो माणूस थांबला नाही त्याने दुसऱ्या दिवशी त्या उपचार केंद्रातल्या माणसाजवळ काही पैसे देऊन ठेवले आणि त्यातून या माणसाचा उपचार पूर्णपणे करून त्याला बरे करण्यास विनंती केली.. ख्रिस्ताने याला गुड सामारिटन म्हटले..
‘Love thy neighbour’ हा ख्रिस्ताचा करूणेचा संदेश देणारी ही गोष्ट, अडचणीत, संकटात असलेल्या माणसाला, अगदी शत्रू असला तरी, मदत करावी असे सांगते.
यावरूनच निस्वार्थपणे लोकांच्या मदतीला धावून जाणार्या माणसास गुड सामारिटन म्हणण्याची प्रथा पडली आहे.
© सुश्री स्नेहा विनायक दामले
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈