सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ ध्यान’ अंतर्बाह्य बदल घडविणारे अंग ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
(प्रथम पुरस्कार प्राप्त लेख)
योग शिबिर चालू होते. गुरुजींनी पहिलाच प्रश्न विचारला. आपण आनंदी समाधानी आहात का? दुसरा प्रश्न– पूर्वीचे लोक जास्त सुखी होते की, आताचे जास्त सुखी आहेत? विचार सुरू झाले. खरंच भौतिक प्रगती इतकी झाली. कष्ट कमी झाले. तरीही पूर्वीचा माणूस जास्त सुखी होता. अशी उत्तरे आली .का बरं असं असेल?
आज समाजाचं चित्र पाहिलं तर, अगदी लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत, प्रत्येक जण ताण-तणावात जगतोय असं दिसतं. नुसत्याच बाह्य उपचारांनी आणि पाश्चात्य वैद्यक शास्त्राच्या उपायांनी सुद्धा खरं आरोग्य राखता येत नाही. त्यासाठी आपली जीवनदृष्टी आणि जीवनशैली बदलायला हवी. ही गोष्ट आता पाश्चात्यांनाही कळून चुकली आहे. त्यामुळे ते लोक आता भारतीय अध्यात्म योग साधनेचा अभ्यास आणि अनुभव घेऊ लागले आहेत . मग ही योग साधना काय आहे बरं? उपनिषदांमध्ये तसेच भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात तर भगवंतांनी अर्जुनाला ‘ध्यान योग’ सांगितला आहे .पतंजलीनी आदर्श आणि निरामय जीवन कसे जगावे, याबद्दल शास्त्रीय दृष्ट्या योगदर्शन लिहिले आहे. मानवी मन आणि सत्याची त्यांना पुरेपूर माहिती होती त्यामुळेच त्यांनी योगशास्त्र लिहिले.
‘ योग ‘ म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध , अशी पतंजलीनी व्याख्या केली आहे. कसे जगावे? ती एक कला म्हणून कशी अंगी करावी? याबद्दल पतंजलीनी आपल्या ग्रंथात अत्यंत महत्त्वाचा असा अष्टांग योग सांगितला आहे . “ध्यान ” या अंगाचा विचार करत असताना, त्यापूर्वीची पाच अंगे, (बाह्यांगे )म्हणजे साधनपादाची थोडक्यात माहिती घ्यायला हवी. १) यम — (सत्य ,अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य ,अपरिग्रह ) २) नियम– ( शुद्धी , संतोष , तप , स्वाध्याय , ईश्वरप्रणिधान ) ३) आसन– शरीर निश्चल राहून सुख वाटते ती स्थिती . ४) प्राणायाम— प्राणाचे नियमन किंवा प्राणाला दिशा देणे. मन एकाग्र होऊन शारीरिक शक्ती वाढते . ५) प्रत्याहार — इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांची बाहेरची धाव बंद करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच प्रत्याहार. त्यासाठी खूप निग्रह करावा लागतो. पुढील तीन महत्त्वाची आंतर अंगे म्हणजे विभूतीपाद. ६) धारणा — एखाद्या गोष्टीवर मन स्थिर करणे म्हणजे धारणा. वरील सहा पायऱ्या चढून गेल्यानंतरची महत्त्वाची पायरी म्हणजे ” ध्यान”. ७) ध्यान — ध्यै — विचार करणे, हा धातू आहे .चिंतन किंवा विचार हे धारणे संबंधित असतील तरच त्याला ध्यान म्हणता येईल. नुसतेच अर्धा तास बसणे म्हणजे ध्यान नव्हे. चित्त धारणेच्या विषयावर स्थिरावल्यानंतर, त्यापासून जो प्रत्यय येत असतो, त्याच्याशी एकतानता साधणे या क्रियेलाच ध्यान म्हणतात. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट पाहतो त्यावेळी नेत्र पटलावर प्रतिबिंब उमटते. त्या तेजाने नसा चेतविल्या जाऊन ,संवेदना मेंदूकडे जातात. मेंदू कडून त्याचा अर्थ लावला की त्याचे ज्ञान होते. म्हणजेच प्रत्यय आला, असे आपण म्हणतो. ध्यानामध्ये एकाच विषयाचा विचार करण्याची सवय लागली की, निर्णय शक्ती चांगली प्राप्त होते. आणि एखादा प्रश्न चटकन सुटू शकतो. जप करणे हेही ध्यान होऊ शकते. कोणत्या ना कोणत्या मूर्त रूपाचा आधार घेऊन विचार करणे, हा आपला स्वभाव असतो. ईश्वराचे चिंतन करताना ,कोणते ना कोणते मूर्त रूप समोर येईल. कारण विचार आणि रूप अविच्छेद्य आहेत. पंचेंद्रिय आणि मन त्यावर गुंतून ठेवून ,स्थिर करून, ध्यानाच्या अभ्यासाने मनाची संपूर्ण एकाग्रता साध्य होते. जप नुसत्या जिभेवर न ठेवता मनातून केला पाहिजे . सुरुवातीला जप मोठ्याने करावा. म्हणजे तो ठसतो . जप करताना दुसरे विचार आले तरी ते विचार संपले की जप पुन्हा सुरू करावा. मन थकलेले असेल तर ध्यानामुळे बळकट होते .सोन्याची चीप असेल तर, ती धारणेचा विषय. आणि सोन्याची तार म्हणजे धारणा. ही तार कुठेही तुटता कामा नये, असे चिंतन म्हणजे ध्यान. झोपेत स्वतःचे अस्तित्व विसरतो .आवडी नावडी, गरीब श्रीमंती अशा भावनिक पातळ्या सोडल्या की शांत झोप लागते. ती निष्क्रियता हेच ध्यान. झोपेचे ज्ञान आपल्याला जागृती कडे किंवा सत्याकडे नेते.
ध्यान करताना काही गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवायला हव्यात. ध्यान करताना शांत जागा निवडावी. खूप भूक लागली असेल तर ध्यान लागणार नाही. तसेच पोट गच्च भरले असेल तर ध्यान न होता झोपच लागून जाईल. ध्यान करण्यापूर्वी घरातली कॉल बेल बंद करावी. तसेच घरातल्या प्राणिमात्रांना जवळ घेऊ नये. मनात सर्वात जास्त प्रलोभने डोळे निर्माण करतात, त्यामुळे ध्यान करताना डोळे बंद करून ,श्वासावर लक्ष केंद्रित करून ,नंतर दीर्घ श्वास घ्यावेत. त्यामुळे ताण कमी होतो. 90 दिवस सलग ध्यान केले तर, कुटुंबातील इतर व्यक्तींनाही सकारात्मक परिणाम दिसतो. अध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर, योग साधनेसाठी सूर्योदयापूर्वीची सर्वोत्तम वेळ. त्याचप्रमाणे संध्यासमयी ४–३० ते पाच नंतर. कारण त्यावेळी आपली मर्यादा ओलांडण्याची क्षमता उत्तम असते. पृथ्वीच्या ऊर्जा संक्रमणातून जात असतात. आणि शरीर प्रणातील संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी झालेला असतो. शारीरिक प्रणाली पृथ्वीच्या जीवनप्रणालीशी संलग्न झाली की ,आपोआप जाग येते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणात योगाचा विकास झाल्याने सगळे योगाभ्यास सकाळी किंवा संध्याकाळी करावेत.
ध्यानाचे फायदे किती सांगावे तितके कमीच ! वीस मिनिटाच्या ध्यानाने चार ते पाच तासांच्या झोपे इतकी विश्रांती मिळते. ध्यान मनाचा आणि मेंदूचा व्यायाम आहे. विश्रांती, जागरूकता आणि एकाग्रता येते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. ध्यानानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून येणारी ऊर्जा डोळ्याला स्पर्श करावी. व हळुवार डोळे उघडावे. जेव्हा शंभर लोक एकत्र ध्यान करतात, तेव्हा त्याच्या लहरी पाच कि.मी. पर्यंत पसरतात. आणि नकारात्मकता नष्ट करतात. हॉवर्ड येथील ‘ सारा लाझर ‘ हिच्या टीमला कळून आले की,, ” माईंड फुलनेस मेडिटेशन” खरोखरच मेंदूची रचना बदलू शकतो. आठ आठवडे माइंड फुलनेस आधारित “स्ट्रेस रिडक्शन हिप्पो कॅम्पस” मध्ये कॉर्टीकल जाडी वाढवते. जे शिकणे आणि स्मरणशक्ती नियंत्रित करते. .मेंदूच्या अभ्यासाने अहवाल दिला आहे की व्यक्तीनिष्ठ चिंता आणि नैराश्याच्या पातळीपासून मुक्त होण्यास एकूणच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. दर आठवड्यास नवीन अभ्यास समोर येत आहेत. काही प्राचीन फायदे जे आत्ताच एफ. एम .आर. आय .किंवा इ.ई.जी. सह पुष्टी होत आहे. खरोखरच ध्यान आपल्या सर्वात महत्त्वाच्या अवयवांमध्ये मोजता येण्याजोगे बदल घडवून आणते.ऐलिन लुडर्स यांनी आणखी एक संशोधन करून सांगितले की, ध्यानामुळे मेंदूतील करड्या द्रवामध्ये वाढ होते. जे विचारक्षमतेचे मुख्य स्रोत असते.एम्मा सेप्पाला या प्रसिद्ध वैज्ञानिक आणि कॅलिफोर्निया स्टॅनफोर्ड विश्वविद्यालय येथील संशोधिका यांनी सांगितले की, ध्यानाने स्मरणशक्तीत वाढ होते व बौद्धिक पातळी उंचावते. सृजनशीलता वाढते. मनाची साफसफाई होते याची शक्ती आपल्या गुलामी आणि प्रकृती यांचा प्रतिकार करण्यास समर्थ होऊन आनंदात पोहोचवते. भावनिक स्थिरता वाढते तसेच वैचारिक आणि भावनिक केंद्रशांत राहतात ध्यानाने अमिग्डालाचा आकार कमी होतो जो ताणतणावाने वाढतो.
अंधशाळेतले मुलं स्वतःमध्ये स्थिर राहून भजन किंवा कविता म्हणतात .योग साधना कोण करू शकतो? तर युवा, वृद्धो वा अतिवृद्धो वा, व्याधीतो दुर्बलोपिवा / अभ्यासात सिद्धि- माप्नोती , सर्व योगेष्वतंद्रितः//
अष्टांग योगातील पाच बाह्यंगे आणि धारणा ,ध्यान ही अंतरंगे साध्य झाली की, शेवटची समाधी या पायरी पर्यंत जाता येते. समाधीत ज्ञानग्रहण होते. अनेकांना सिद्धीही प्राप्त होतात. समर्थ रामदास ,ज्ञानेश्वर माऊली, आणि अनेक संतांना सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे तर ,पुणे येथील डॉक्टर प. वि. वर्तकांनी समाधी स्थितीत ‘ मंगळ ‘ ग्रहावरील वर्णन पाहिले. आणि तेथे लाख वर्षांपूर्वी पाणी आणि शेवाळ होते असे 1975 साली सांगितले .त्यानी सांगितलेले सर्व मुद्दे खरे असल्याच्या बातमी नुसार 1986 साली, त्यांचे विवेकज्ञान सत्य असल्याचे सायन्सच्या संशोधनानी सिद्ध झाले. नंतर त्यानी ‘ गुरु ‘ ग्रहाचेही वर्णन सांगितले. अमेरिकेतील डॉक्टर दीपक चोप्रा यांनी लिहिलेले “क्वांटम हीलिंग “
हे पुस्तक बेस्ट सेलर बुकच्या यादीत आलेले आहे. त्यात त्यांनी योगाचा अभ्यास वैद्यकीय उपचारांनाही कसा पूरक ठरतो,, तसेच ज्ञानाच्या माध्यमातून खोल मनापर्यंत पोचून, अडचणी समजून घेऊन ,मनातला गुंता सोडविता येतो . तसेच ध्यानाच्या माध्यमातून आजार बरे करण्यास कशी मदत होते, हे सविस्तर पुस्तकात सांगितले आहे.
श्री. श्री .रविशंकर यांच्या “आर्ट ऑफ लिविंग ” च्या ऍडव्हान्स मेडिटेशनच्या कोर्समध्ये आम्ही कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकलो. पंचकोष, ओरा, ओँकार, चंद्र, (पौर्णिमेचा), सूर्य ,शरीरातील षटचक्रांवरचे हरी ओम, असे कितीतरी ध्यानाचे प्रकार शिकून खूप आनंद मिळवला. दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये लोक हे ज्ञान आत्मसात करत आहेत. रामदेव बाबांचीही शिबिरे चालू आहेत. योगाचे अनेक शिक्षकही तयार झाले आहेत. शालेय पातळीपासून अभ्यास व्हायला हवा. जागोजागी स्पर्धा, ताण-तणाव दिसत आहेत .अशा वेळी स्वच्छ , निर्मळ, आणि निरामय आरोग्यासाठी योग साधनेचीच गरज आहे .आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 21 जून हा ‘जागतिक योग दिवस,’ आणि 21 मे हा ‘जागतिक ध्यान दिवस ‘ असे म्हणून अधिष्ठान दिले आहे. त्याचा परिणाम ही जाणवू लागला आहे .सर्वजण मिळून सर्वांसाठी प्रार्थना करूया.
//सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे संतु निरामयः//.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈