सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ धनत्रयोदशी – – – ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
वसुबारस ला दिवाळीची सुरुवात तर झालीच, पण आजचा धनत्रयोदशीचा दिवस हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे! या दिवसाच्या नावातच धनाचे महत्त्व कळते! पौराणिक द्रुष्ट्या या दिवसाच्या वेगवेगळ्या कथा तर आहेतच, पण वैद्य किंवा डॉक्टर म्हणून या दिवसाचे महत्त्व मला लग्नानंतर अधिक जाणवले. ह्यांचा वैद्यकीय पेशा असल्यामुळे या दिवशी संध्याकाळी आम्ही धन्वंतरीची पूजा करत असू. धन्वंतरीच्या फोटो समोर ह्यांची रोजच्या वापरातील शस्त्रे म्हणजे स्टेथोस्कोप, सीझर वगैरे ठेवून पूजा केली जाई. धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आरती करत असू. आपल्या हातून रोग्यांची चांगली सेवा व्हावी यासाठी प्रार्थना करत असू.
वैद्यकीय काम हे व्यवसाय नसून सेवा आहे ही भावना कायम मनात ठेवलेली होती. पैसा ही गोष्ट त्याकाळी थोडी दुय्यम होती.
यावरून एक दोन आठवणीत राहिलेल्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक वर्षी धनत्रयोदशी आणि नरक चतुर्दशी एका च दिवशी होती बहुतेक! आम्ही सकाळी फराळाला बसलो असताना धावत पळत एक जण आले, त्यांच्या मुलाने फटाके उडवताना हात भाजून घेतला होता. फराळाच्या ताटावरून उठून डॉक्टर तसेच पेशंट बघायला आधी गेले. सण-वार काहीही असले तरी आपला वैद्यकीय पेशा महत्त्वाचा समजून नेहमी पेशंट्सना प्राधान्य दिले जाई. कधीकधी अगदी चिडचिड होत असे, की काय हा डॉक्टरचा व्यवसाय! पण स्वेच्छेने पत्करलेला असल्यामुळे तो राग तात्पुरता च असे. दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होणार्या छोट्या छोट्या अपघातांना बरेच वेळा तोंड द्यावे लागत असे. पण
धन्वंतरी च्या कृपेने यांच्या व्यवसायात नेहमी यश मिळत गेले हे मात्र खरे!
अशीच एक आठवण ! सिविल हॉस्पिटल मध्ये R. M. O. म्हणून काम करत असताना ह्यांची दिवाळी बरीचशी दवाखान्यातच साजरी होत असे! एके वर्षी सासूबाई आजारी असताना दिवाळीपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत्या, तेव्हा त्यांच्याजवळ मी थांबत असे. हॉस्पिटल मधील धनत्रयोदशी अनुभवायला मिळाली. तेथील सर्व स्टाफ रात्रीच्या ड्युटीवर असताना आकाश कंदील लावणे, पताका लावणे, मेणबत्त्या, पणत्या लावणे, रांगोळ्या काढणे हे सर्व घरी जसे उत्साहाने साजरे करतो तसेच तिथे साजरे करत होते. आजारी माणसांना आनंद मिळावा म्हणून हे सर्व लोक झटत होते. ते पाहून खरोखरच मन भारावून गेले. संध्याकाळी तिथे धन्वंतरी ची प्रतिमा उभी करून पूजा करण्यात आली. बऱ्याच जणांनी पेशंट साठी फराळाचे वाटप केले होते. एकंदरच आपल्या हिंदू समाजामध्ये कोणत्याही सणाचा, उत्सवाचा आनंद सर्वांसोबत घेतला जातो, ही गोष्ट खूपच छान वाटली!
आरोग्य आणि धन या दोन्ही गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी आपले आरोग्य जपण्याबरोबरच धनाची पूजा करून परमेश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण
आनंदाने साजरा करू या!
….. दिवाळी सारख्या मोठ्या सणाचे स्वागत करून अमंगल ते सर्व जाऊ दे अशी धन्वंतरीची प्रार्थना करू या!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈