सौ. अर्चना सुरेश देशपांडे
विविधा
☆ नवरात्र उत्सव व त्याचे बदलते स्वरूप… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆
भक्ती, शक्ती ,बुद्धी आणि माया यांचा अनोखा संगम असलेल्या आदिशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव. भक्तिमय वातावरणात आणि तेवढ्याच उत्साहाने शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये साजरा केला जातो. रास, गरबा, श्री सूक्त, दांडिया बरोबरच इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल या दिवसात असते.
महिषासुरमर्दिनी, महिषासुर राक्षसाला मारणारी रणरागिनी! अनेक राक्षसांना मारणाऱ्या देवांची आपण पूजा करतो पण या राक्षसाला मारण्यासाठी देव का पुढे आले नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण उत्तर अगदी सोपे आहे.
कोमल मनाच्या, नाजूक शरीराच्या आत केवढी प्रचंड शक्ती सामावलेली असते ही समाजाला दाखवून द्यायचे होते.
नवरात्र सोहळा म्हणजे स्त्री शक्तीची ,स्त्रीने स्वतःला व समाजाला करून दिलेली आठवण आहे. एक जन्मदायिनी प्राण हरणी सुद्धा होऊ शकते हे जगाला दाखवून देण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.
आदिशक्तीचा जागर म्हणजे नवरात्रीचा सण रात्रीचाच साजरा करण्याची प्रथा आहे .याला धार्मिक व पौराणिक आधारही आहेत. या दिवसात देवीची भजने, गोंधळ, श्री सूक्त पठाण असे कार्यक्रम केले जातात . स्त्रियांचयासाठी तर मंतरलेले दिवस असतात.नवरात्रोत्सव आपला धार्मिक तसाच सांस्कृतिक ठेवा आहे
नवरात्र म्हणजे वास्तविक घरगुती धार्मिक सोहळा. देवीच्या मंदिरात पूजा, उपासना, भजन ,गोंधळ आधी माध्यमाद्वारे चालणारा सोहळा! देवतांची मनापासून उपासना हीच आपली खरी संस्कृती .आपल्या संतांनी विविध धार्मिक मार्गांनी आदिशक्तीचा जागर केलेली उदाहरणे आपल्या ऐकिवात आहेत. नवरात्राचे धार्मिक महत्त्व मोठे आहे.
अत्यंत पवित्र वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो. स्त्रिया घराची रंगरंगोटीकरून घरातली भांडी स्वच्छ घासून घेतात तसेच अंथरूण , पांघरूण धुतलीजातात. स्त्रिया नऊ दिवस उपास करतात ,गादीवर झोपत नाही एवढेच काय पायात चप्पल न घालता नऊ दिवस देवीच्या दर्शनाला जातात. घटस्थापने दिवशी घट बसवूनअखंड नंदलाल नंदादीप तेवत ठेवतात. देवीच्या जागराचा म्हणजेच स्त्री सन्मानाचा हा उत्सव आहे.
पण आता मात्र त्याचे स्वरूप बदलले आहे. गणेश मंडळाप्रमाणेच नवरात्रोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे., मंडळामध्ये स्पर्धा निर्माण झाल्या आहेत, मोठमोठ्या वर्गण्या सक्तीने वसूल केल्या जातात. रस्त्यावर मोठमोठे मांडव घातले जातात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. सगळीकडे झगमगाट करून कानठळ्या बसणारी गाणी लावली जातात एवढेच नव्हे तर रात्री उशिरापर्यंत दांडिया खेळला जातो. त्यावेळी रुग्ण, विद्यार्थी ,वृद्ध व्यक्ती यांचा विचार केला जात नाही .तरुण मुले मुली न शोभणारी वेशभूषा करूनहुललडबाजी करतात. दहा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक वापरावीत हा कायदा मोडून, पोलिसांना न जुमानता बेधुंदपणे गोंधळ सुरू असतो. हा प्रकार वाढत चालल्यामुळे उत्सव ही सामाजिक समस्या होत चालली आहे.
काही वेळा गणेशोत्सवाला घातलेला मंडप न काढता त्याच ठिकाणी दुर्गामातेचे प्रतिष्ठापना केली जाते. परंतु अनंत चतुर्दशीनंतर पितृपंधरवडा येतो व त्यानंतर नवरात्राला सुरुवात होते त्यामुळे जवळजवळ एक महिना रस्त्यावरील जागा अडवून ठेवली जाते ,वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे थकल्या भागलेल्यांना दूरच्या रस्त्याने घरी पोहोचावे लागते ..काही वेळा कार्यक्रम सुरू असेल तर आहे त्यावेळी तिकडची वाहतूक दुसरीकडून वळवली जाते त्यावेळी घरी परतणाऱ्या व्यक्तिंना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
काही मंडळे तिसरी माळ पाचवी माळ सातवी माळ….. असा मुहूर्त पाहून तोरणाची मिरवणूक करतात .रस्त्याचा बराच भाग व्यापत ही मिरवणूक मंद गतीने पुढे सरकत राहते .त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो .नाचण्यात दंग असलेल्या कार्यकर्त्यांना याची जाणीव नसते .बँडचा ताफा, ध्वनिवर्धक भिंती ढोल ताशांचा मोठा आवाज यामुळे कोलाहल माजतो.त्यावेळीइमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होतो याचा विचार होत नाही तसेच अशा मिरवणूकीत दंगा होऊ नये म्हणून पोलिसांवर येणारा ताण वेगळा!
आपला समाज उत्सवप्रिय आहे मान्य पण नियमांचे पालन केले गेले तर विविध सणाद्वारे आणि उत्सवा द्वारे समाजात चैतन्य निर्माण होईल, आणि आनंद द्विगुणीत होईल असे मला वाटते.
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈