सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ विविधा ☆ धनत्रयोदिशी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

? दिन दिन दिवाळी—३ ?

!! नरकचतुर्दशी !!

आज ‘नरक चतुर्दशी’.  आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो.

स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे.

आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या असूरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले.  त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले.  त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले.

मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने तसा वर दिला. म्हणूनच आज पहाटेच्यावेळी अभ्यंगस्नान करतात. आसूरी शक्तींचा, आसूरी महत्त्वाकांक्षेचा शेवटी नाशच होतो असा संदेश ही कथा देते. म्हणून प्रत्येकाने या दिवशी चांगले वागणे, चांगल्याची साथ देणे असा संकल्प केला पाहिजे.

स्त्री उध्दाराच्या या कामासाठी सत्यभामेने पुढाकार घेतलेला होता. नरकासूराच्या बंदीवासात राहिल्याने या राजकन्यांना कलंकित मानले जाऊ नये, त्यांचे सामाजिक स्थान हीन होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांशी विवाह केला अशीही कथा आहे.

स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. त्यांना आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे.  यासाठी कोणी श्रीकृष्ण धावून येईल असा चमत्कार होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच आपल्या मनात श्रीकृष्णाचे विचार जागृत करून स्त्री शक्तीचे रक्षण केले पाहिजे. यामधे स्त्रियांनी सुद्धा सहभागी व्हायला हवे. आपले रक्षण आपणच करण्यासाठी आवश्यक गोष्टी लहानपणापासून शिकायला हव्यात. मन कणखर बनून अंगी धिटाई येईल.  मुली स्वयंपूर्ण बनतील.  त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्रीचा आदर करायचा, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, कोणत्याही प्रसंगात त्रास द्यायचा नाही असेच संस्कार द्यायला हवेत. त्यामुळे मुला-मुलींची मानसिकता विवेकी, सुदृढ व निकोप बनून ते मोठेपणी सुजाण, जबाबदार नागरिक बनतील.

प्रत्येकाने आपल्या मनातल्या परमेश्वराचे स्मरण ठेवले ; तर हातून वाईट कृत्य घडणारच नाहीत. जीवनाला नरक बनवणाऱ्या अस्वच्छता, आळस, प्रमाद, वासनांधता, व्यसनाधीनता या गोष्टी नरकासूरच आहेत. त्यांना आज नष्ट करायचे. वाईटातून चांगल्याची, अंधारातून उजेडाची वाट धरायची. तेव्हा चांगल्याचे रक्षण व्हावे,  नाती जास्त जवळ यावीत यासाठी एकत्रितपणे पण नियम पाळत,  सामाजिक भान राखत श्रध्देने,  आनंदाने हा सण साजरा करू या.

शुभ दीपावली.  ?

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments