सुश्री सुलभा तेरणीकर
विविधा
☆ निर्मळ उदकाचं तळं… सुवर्णाची कमळं… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆
शहरातल्या मुलींचा पंचमीचा सण फांद्यांवर बांधलेल्या हिंदोळ्याविना सुना-सुना जातो, तसा आमचाही गेला खरा; पण ती उणीव भरून निघाली श्रावणातल्या श्रवणीय कहाण्यांनी, श्रावणातल्या एकेक दिवसाला संस्मरणीय करण्याच्या घरातल्या श्रध्दामय संस्कृतीनं, स्वरातल्या हृदय कारुण्यानं !
‘पहिल्या आदितवारी मौनानं उठावं, सचैल स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी… ‘
आजीनं कहाणी वाचायला बसवल्यानंतर मी ती एका सपाट्यात वाचून काढत असे; पण त्यातलं काही समजत नसे. मात्र, पुढे ऐकताना व स्वतः वाचताना त्या आवडू लागल्या. त्या सर्व कळेपर्यंत श्रावण संपून जाई; मग पुन्हा पुढच्या वर्षी श्रावणाच्या कहाण्यांना सुरुवात होई.
दिव्याच्या अवसेच्या कहाणीतले दिवे अदृश्यपणे झाडांवर येऊन बसत. एकमेकांत बोलत. शुक्रवारच्या कहाणीतली बहीण दागिन्यांना जेवू घालत असे. पाटमधावराणी, चिमादेवीरांणी, सोमा परटीण, गरिबांना मदत करणारे शंकर-पार्वती जवळचे वाटत. घावनघाटल्याचा, खीर-पोळीचा, लाडवांचा नैवेद्य… साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण करण्याचं आश्वासन, हे सर्व फार आवडे. कहाणी ऐकणं, सांगणं, त्यातली उत्कंठा, चित्रमयता, ओघवत्या भाषेचा डौल, लय, छोट्या तात्पर्यातलं जीवनसूत्र… माझ्या गोष्टीवेल्हाळ मनाला रिझवून जात असे. कहाणी संपल्यावर हुरहूर वाटे.
आता तर कहाण्या सरल्या. त्याबद्दल वाटणारं सुनेपणही उरलं नाही. खूप खोलवर हृदयात मात्र कहाण्यांचे शब्द नांदतात. निर्मळ उदकाचं तळ, सुवर्णाची कमळं कधीतरी थरथरतात. त्यांना कहाणी सांगून मीच जोजवलं आहे. नागचवथीनंतर पंचमी, शिळा सप्तमी, नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, श्रावणी सोमवार, जिवतीचे शुक्रवार… श्रावणातले एकेक दिवस भराभर येत आणि जात; पण घरातल्या माहेरवाशिणींच्या, नव्या सुनांच्या पहिल्या मंगळागौरीचा आठव येतो, तेव्हा श्रावण घमघमतो. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातला आनंद ओसंडून वाहत असे. पूजेचं साहित्य, फुलपात्री, फराळाची तयारी, मुलींची बोलावणी… याची घाई उडत असे. त्यांचे लग्नातले शालू सळसळत असत. समवयस्क नवविवाहित मैत्रिणींचे हास्यविनोद, दबत्या आवाजातलं काही बोलणं… दोन-चार वर्षांपूर्वी निरोप दिलेल्या शाळेच्या आठवणी… पूजेची सामग्री सावरण्याची घाई… आरती, फराळ, जागरण, खेळ… माझ्या डोळ्यांवर झोप अनावर होई… त्यांच्या सौख्याचा गंध प्राजक्ताच्या फुलांतून, केवड्यातून ओसंडत असे. पतीचं नाव घेताना झक्क लाजणाऱ्या मुलींचे चेहरे घेऊन आलेला श्रावण आता लोपला. मंगळागौर पूजणाऱ्या त्या स्त्रियांचे संसार… त्यातले चढ-उतार पाहिले. त्यांनी धीरानं सोसलेली दुःखंही पाहिली… जीवनकहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी त्यांनी मंगळागौरीला मागितलेलं वरदान किती खरं ठरलं… बालकवींच्या ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ कवितेतल्या श्रावण महिन्याचं गीत ज्यांच्या चेहऱ्यावरून वाचून घ्यावं, अशा ‘ललना’ मी पाहिलेल्या आहेत… माझ्याच घरातल्या स्त्रियांनी श्रावणमासाचं सुरेल गाणं मला ऐकवलं आहे.
चित्रपटगीतांचा, भावगीतांचा पाऊस बरसत राहिला अन मी त्यातला श्रावण अलगद झेलला.
सावन-भादोची लयलूट असे गाण्यांतून. प्रियकरावाचून श्रावण म्हणजे भर पावसात जणू अग्नी तापतो आहे, श्रावणझडीसारखे डोळे झरत आहेत… अशा अर्थाच्या गीतांनी बहरलेल्या चित्रसृष्टीच्या गाण्यांतून माझ्या हाती पडलेल्या एक-दोन गाण्यांनी माझा श्रावण सजलेला आहे. सैगलच्या ‘देवदास’ मधल्या अजरामर गाण्यातली एक ओळ मला भिडते अन् त्यातल्या कारुण्यानं श्रावण भिजवून जाते……
‘सावन आया तुम ना आये… ‘
आजवर ऐकलेल्या श्रावणातल्या विरहगीतांतूनही ओळ नेमकी ओंजळीत येते.
‘बालम आये बसो मोरे मनमें ‘
या गीतातून सहा-सात दशकांचं अंतर पार होतं. ते जणू माझं सांत्वन करण्यासाठीच घडतं.
‘बंदिनी’तल्या शैलेंद्रच्या गाण्यातूनही मी श्रावण ऐकते.
‘अब के बरस भेज, भैय्या को बाबुल,
सावन में ली जो बुलाय के… ‘
लखनौकडे गायल्या जाणाऱ्या पारंपरिक चालीत बांधलेल्या गाण्यात आशाचा स्वर एका ओळीत रुद्ध होतो.
‘बैरन जवानीने छीने खिलौने
और मेरी गुडिया चुरायी
बाबुलजी मैं तेरे नाजोंकी पाली,
फिर क्यों हुई मैं परायी… ‘
सासर-माहेरमध्ये झुलणाऱ्या स्त्रीमनासाठी हिंदोळा नकोच. डोळे भिजायला पंचमीचा सण तरी कशाला हवा ! भातुकलीचा खेळ संपून खरा-खरा डाव हाती आला तरी ही हुरहूर का?
‘ क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे… ‘
… सारखा हा लपंडाव कशासाठी? श्रावण महिन्याची गीतं वाचायला ही आयुष्यं समजायला हवीत— की ती समजण्यासाठी श्रावण अनुभवायला हवा? मरगळलेल्या मनाला मात्र आता दूर रानात न्यायला हवं — बगळ्यांची माळ उडताना पाहायची आहे ना !
© सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈