श्री अरविंद लिमये
☆ विविधा ☆ न फुटणारा आरसा… ☆ श्री अरविंद लिमये ☆
वाचणे’ हे दोन अर्थ असणारे क्रियापद.एक एखाद्या संकटापासून,अरिष्टापासून सुटका होणे आणि दुसरा लिखित वाङमय,पुस्तके,संहिता यांचे वाचन करणे.वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारी ‘वाचाल तर वाचाल ‘ ही टॅग लाईन ‘वाचणे’या क्रियापदाचे दोन्ही अर्थ सामावून घेत वाचन संस्कृती लयाला जात असताना तिला वाचवू पहातेय. वाचनाचे महत्त्व पटवून देण्यापेक्षाही न वाचाल,तर तुम्ही निर्माण होणाऱ्या संकटांपासून वाचूच शकणार नाही याचा पोटतिकडीने इशारा देते.
वाचनाची आवड जाणिवपूर्वक जोपासणारे त्याचं महत्त्व तर जाणतातच,आणि वाचनातून आनंदही मिळवतात. किंबहुना वाचनाची आवड असणारे आहेत म्हणूनच लिहणारे लिहिते राहू शकतात.
वाचनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी वाचनाकडे पहायचा दृष्टीकोन मात्र निकोप हवा.वाचन हे वेळ घालवायचे साथन नसावे. त्यापासून मिळणारे ज्ञान आत्मसात करण्याची दृष्टी महत्त्वाची.वाचन फक्त ज्ञानच देत नाही तर जगावे कसे हेही शिकवते.वाचनाची आवड नसणार्ऱ्यांचं जगणं या संस्कारांअभावी झापडबंद होत जातं.माणसांची मनं वाचण्याची कला वाचनाने समृध्द केलेल्या मनाला नकळतच अवगत होत असते.त्यामुळे माणसांना समजून घेणे,स्विकारणे सहजसुलभ घडत जाते.जगाकडे आणि जगण्याकडे पहाण्याचा निकोप दृष्टीकोन सकस वाचनानेच प्राप्त होत असतो.लेखनप्रतिभेची देन लाभलेल्या भाग्यवंतांनीही आपल्या लेखनाचा कस टिकवून ठेवण्यासाठी विविध विषयांवरील इतरांचे लेखन आवर्जून वाचायला हवे.तरच त्यांच्या लेखनातले वैविध्य न् ताजेपण टिकून राहील.
लेखकाला त्याचं अनुभव विश्व लिहिण्यास प्रेरणा देत असतं,तसंच मनाला स्पर्शून जाणारे लेखन वाचकालाही अनुभवसंपन्न करीत असते. लेखकाचं लेखन एक ‘न फुटणारा आरसा’च असतं. वाचणारा त्यात प्रतिबिंबित होणारं, एरवी दिसू न शकणारं स्वत:चं,स्वत:च्या जगण्याचं प्रतिबिंब अंतर्दृष्टीने पाहू शकतो.अर्थात त्यासाठी सजग दृष्टीने वाचनाची आवड लावून घेणे न् ती जोपासने हे महत्त्वाचे असते !
© श्री अरविंद लिमये
सांगली
मो ९८२३७३८२८८
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈