☆ विविधा ☆ पंख ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर ☆
माझ्या मनात एक विचार आला असे वाटले की आज मला जर पंख असते तर?? मी छान नभाची सैर करून आले असते. तोडल्या असत्या ह्या सगळया साखळ्या आणि उंच भरारी घेतली असती आकाशात.
ह्या माझ्या विचारांना खिजवायला की काय कोण जाणे माझ्या समोरून एक मस्त फुलपाखरू उडत गेल, आपल्याच दुनियेत जणू हरवले होते . रंगबिरंगी त्यांचे रंगीत पंख बघून अगदी हेवाच वाटला मला त्यांचा. असे वाटू लागते की आपल्याला पण हवे होते असे नाजूक सुंदर पंख. मग आपण ही जाऊ शकलो असतो कुठे ही क्षणभरात. मस्त फुलांच्या परागांवर बसुन मध चाखला असता आणि मनसोक्त बागडलो ही असतो हा विचार मनातून जात नाही तोवर,
पक्ष्यांचा थवा उंच नभात उडताना पहिला. अगदी छान आपल्याच धुंदीत मस्त उडत होते सारे. मग मला वाटले जर आपण पक्षी झालो असतो तर कित्ती छान झाले असते. आसमंतात निळ्या आकाशात उंच भरारी घेतली असती. वरती जाऊन हिरव्यागार शालू मधे, नटलेली धरती पहिली असती. मस्त डोंगरावर बसुन वाऱ्याशी हितगुज केले असते.छान झाडाच्या फांदी वर बसुन उंच झोके घेतले असते.
मनानी झोके घेतच होते की तो वर एकदम जोरात आवाज ऐकू आला, वर पाहिले तर भव्य वीमान दिसले. ते तर जवळ जवळ गगनाला भिडले होते. अस वाटले की हातच लावते आहे आकाशाला.
मग काय माझ्या मनात आले, आपण विमानच झालो असतो तर?? मनात येईल तेव्हा रात्रीच्या वेळी चंद्र चांदण्यांनांची भेट घेता येईल.
आता मात्र स्वतः वरच हसू आले असे वाटले की पंख नसताना पण आपले मन किती ठिकाणी उंच भरारी घेऊन आले.
फुलपाखरू होऊन फुलांमधला मध चाखला, तर पक्षी बनुन झाडावर बसुन उंच झोके घेतले, विमान बनून आकाशातले तारे ही तोडले.
आता मला सांगा नक्की उंच भरारी घेतली तरी कोणी??
फुलपाखरांनी, पक्ष्यांनी, विमानांनी, की माणसाच्या मनानी.
सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️
© सुश्री श्रेया सुनील दिवेकर
मो – 9423566278
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
कल्पनेच्या पंखांचे बळ वाढत जावो.
अभिनंदन आणि शुभेच्छा.