श्री सुनील देशपांडे
विविधा
☆ प्रिय मित्र प्रदीप… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
प्रिय मित्र प्रदीप,
कालपासून फक्त डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात आहेत. गळा गदगदून आला आहे. तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती. तू तिकडे साता समुद्रा पार! कुणास ठाऊक रात्र आहे की दिवस आहे आणि माझ्याही तोंडातून शब्द निघणे अशक्य होते आहे. टीव्हीवर वर्तमानातील सत्य पाहिल्यानंतर भूतकाळाचा इतिहास नजरेसमोरून सरकत आहे. ऊर अभिमानाने भरून आला आहे. आपण आज जिवंत आहोत हे केवढे मोठे भाग्य !
या क्षणी आपले मित्र जे आज हयात नाहीत पण आपल्याबरोबर होते, अशांच्या सुद्धा आठवणी मनात दाटून येत आहेत. बालपणापासून आपल्या परिस्थितीच्या आठवणी येत आहेत, अर्थात आपली परिस्थिती ही देशाच्या आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून असणार. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता लहानपणी अमेरिकेच्या मदतीचा रेशनवर तासंतास उभे राहून मिळवलेला निकृष्ट प्रतीचा गहू, मिलो, मका असे पदार्थ खाण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर सुद्धा आली होती. या परिस्थितीतून आपला देश आजच्या परिस्थितीवर आला आहे. लहानपणी दिवाळीसाठी प्रत्येकी ४०० ग्रॅम जादा साखर मिळेल अशी बातमी आज मुलांना, नातवंडांना सांगितली तर त्यांना हसू येते. पण ती वस्तुस्थिती आपण विसरू शकत नाही. या सर्व परिस्थितीतून आपल्या आई-वडिलांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या सोयी व संधी आपल्या स्वतंत्र देशामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या हे आपले केवढे मोठे भाग्य !
महाविद्यालयीन शिक्षणानंतर तू इस्रो मध्ये जॉईन झाल्याचे ऐकल्यानंतर आणि आर्यभट्ट च्या शास्त्रज्ञांच्या टीम मध्ये तुझी निवड झाल्याचे समजल्यानंतर सर्वप्रथम आमचा उर अभिमानाने भरून आला होता. आता तुला परत बाळू म्हणून हाक मारून मिठी घालता येईल का हा प्रश्न आम्हाला पडला होता. परंतु त्यानंतरच्या कित्येक वर्षानंतर झालेल्या भेटीने तू त्याचे उत्तर दिलेस. परंतु सुरुवातीच्या काळात पेपरमध्ये आलेल्या बातम्या पाहून मन व्यथित होत होते. तसेच अभिमानाने भरूनही येत होते. थुंबा स्पेस सेंटर मध्ये सुरुवातीच्या काळात रॉकेटचे पार्ट असेंब्ली साठी सायकल आणि बैलगाडी मधून नेत असलेले फोटो बघून मन व्यथितही होत असे आणि अभिमानाने भरूनही येत असे. अशा परिस्थितीतून आपण मंगळ आणि चंद्र यांच्या यशस्वी मोहिमा आणि तेही एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटाच्या बजेट पेक्षा कमी बजेटमध्ये यशस्वी करून दाखवल्या ही आपल्या देशाला आपण ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीने दिलेली देणगी आहे असे नाही का वाटत ?
हे सर्व आठवून, आठवून डोळ्यातून निघणारे पाणी अजूनही थांबत नाही. मी प्रचंड भावुक झालो आहे. तुला कशा परिस्थितीतून इस्रो वर आली हे जास्त चांगले माहित आहे. आम्ही फक्त पेपरमधून वाचलेल्या बातम्यांवर मत बनवणारी माणसं. पण तरीही या सर्व शास्त्रज्ञांनी शून्यातूनच नव्हे तर शून्यापेक्षाही खालून या सर्व गोष्टींना जो उठाव मिळवून दिला त्याबद्दल त्यांना किती वंदन करू हेच समजत नाही. तुम्ही सर्व सुरुवातीच्या टीममध्ये होतात तुम्ही पायवाट निर्माण केली. आता त्याचा राजमार्ग झाला. नव्हे अंतराळ मार्ग झाला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगामध्ये पहिल्यांदाच पंधरा-वीस मिनिटे का होईना सैर करणारा माणूस हा शिवकर बापूजी तळपदे हा भारतीय होता हे आठवल्याशिवाय राहत नाही. त्याच्या आयुष्यावर ‘हवाईजादा’ नावाचा एक चित्रपट निर्माण झालेला आहे. तो युट्युब वर उपलब्ध आहे. परंतु तोही किती जणांनी पाहिला आहे कुणास ठाऊक ? ही काल्पनिक गोष्ट नव्हे तर त्याकाळची वस्तुस्थिती आहे, हे सुद्धा कित्येक जणांना माहीत नाही. ब्रिटिश गॅझेट मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या काळच्या केसरीमध्ये त्याबाबतच्या बातम्या आहेत. त्यामुळे हे सत्य नाकारता येत नाही.
राइट बंधूंच्या आधी अधांतरी सफर करणारा पहिला भारतीय आज आठवतो आहे. त्यांनी जे विमान ‘मरुत्सखा’ नावाने बनवले होते ते सोलर पॉवर वर चालले होते हे सुद्धा विशेष! कारण आज या अंतराळ मोहिमेत सोलर पॉवर चा खूप मोठा उपयोग केला गेला आहे.
या सगळ्या स्मृती एकत्र दाटून येत आहेत. खरं म्हणजे मला माझ्या भावना नीट पणाने मांडताच येत नाहीत. मनात खूप दाटून आले आहे. खूप बोलायचं आहे. खूप व्यक्त करायचं आहे. परंतु कसं करावं समजत नाही. एखाद्या वेळेस हे ॲब्सर्ड वाटत असेल. पण काय करू ? व्यक्त झाल्याशिवाय राहवतही नाही. भावना समजून घ्याव्यात. अर्थात हे तुला वैयक्तिक नव्हे तर हे जाहीर पत्र आहे. माझ्या सगळ्या मित्रांना सगळ्या ओळखीच्यांना या सगळ्या भावना समजाव्यात म्हणून हे तुझे पत्र मी सगळ्यांनाच पाठवीत आहे. परंतु तुझ्या त्याकाळच्या किंवा इसरोमधील शास्त्रज्ञ मित्रांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात ही विनंती. कालच मी यावर एकच पोस्ट टाकली होती ती अशी
इस्रोच्या सर्व आजी-माजी शास्त्रज्ञ वैज्ञानिक इंजिनियर्स जे जे कोणी सर्व तांत्रिक गोष्टी शून्यातून उभे करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्या सर्वांना माझे साष्टांग नमस्कार. मनापासून वंदन, वंदन, वंदन.
एकच शब्द माझ्या तोंडून फुटत होता या सर्वांसाठी…
!! नम….. नमस्तुभ्यम ! नमस्तुभ्यमस्तुभ्यम !!!
या क्षणी वसंत बापटांची एक कविता आठवते आहे त्याचा उल्लेख करतो,
*
गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥
*
ही वडीलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥
*
देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥
*
शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥
*
दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥
*
गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥
जुन्या पिढीला वंदन आणि नव्या पिढीला सलाम !
कालच्या चंद्रयान मोहिमेवर बऱ्याचशा राजकीय टिपण्या आज वाचल्या आणि वाईट वाटले. विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हे राजकारणाचे विषय नाहीत हे जोपर्यंत आपल्या लोकांना समजणार नाही तोपर्यंत आपल्या दुर्दैवाचे फेरे थांबतील का? असा प्रश्न पडतो. तुमचे राजकीय मत काही असेल तरीसुद्धा वैज्ञानिक मत एकच असते आणि तेच असले पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यवहारांमध्ये राजकारण न आणता जगू शकत नाही का ? अत्यंत वाईट वाटते आणि या राजकीय गोष्टींचा कंटाळाच येऊ लागतो. असो वस्तुस्थितीला आपला इलाज नाही आणि आपल्या मताशी इतर माणसे सहमत असतीलच असेही नाही. त्यामुळे जे असेल ते स्वीकारत, परंतु या यशस्वितेच्या आनंदात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या या अत्युच्च क्षणाचा साक्षीदार झाल्याच्या आनंदात, भविष्यात केव्हाही आता मृत्यू आला तरी आनंदाने सामोरे जावसं वाटेल यात शंका नाही.
जय हिंद! भारत माता की जय !!
तुझा प्रिय मित्र,
सुनील
(माझा तिसरीपासून ते कॉलेज पर्यंतचा वर्गमित्र प्रदीप शिंदे, जो पूर्वी इस्रो या संस्थेमध्ये नोकरी करीत होता. भारताच्या यशस्वी चंद्र मोहीमेनंतर त्यास पाठवलेले हे पत्र. मुद्दाम सर्वांच्या माहितीसाठी प्रकट करीत आहे)
© श्री सुनील देशपांडे
पुणे, मो – 9657709640 ईमेल : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈