श्री अमोल अनंत केळकर
विविधा
☆ प्रिय डिसेंबर… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
प्रिय डिसेंबर महिना,
कितीरे वाट पहायला लावतोस
अगदी वर्षाच्या शेवटी येतोस बघ..
बारा भावंडातील शेंडेफळ ना. म्हणून सर्वांचा लाडका..
हिरव्यागार निसर्गाच्या पायघड्यांवरून धुक्याची शाल लपेटून गुलाबी थंडी पसरवत एखाद्या रूपगर्वितेसारखा दिमाखात येतोस,
सर्वांना भरभरुन चैतन्य व उत्साह देतोस अगदी हातचे काही न राखता…
भरपूर खा… प्या… व्यायाम करा असा संदेश घेऊन तू येतोस त्यामुळे दिवाळी नंतर आलेली मरगळ झटकून गृहिणी परत लगबगीने खाद्य पदार्थ करायला लागतात
सुरुवात होते ती डिंकाच्या लाडवाने बाजरीचा भात वांग्याचे भरीत मिरचीचा ठेचा त्याबरोबर गरम गरम भाकरी हुलग्याचे शिंगोळे वेगवेगळ्या चटण्या यामुळे रसना तृप्त होते
हा स्वर्गिय आनंद फक्त तूच देऊ शकतोस
हुरडा पार्टी तर तुझ्या शिवाय होतच नाही आणि पतंगोत्सव तो तुला मानाचा शिरपेच देऊन जातो
रात्री शेकोटीच्या भोवती बसून मारलेल्या गप्पा गाणी यांचा आनंद केवळ अवर्णनीय…
अश्या सर्व उत्साहवर्धक वातावरणातच तुझ्या मुळे दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री दत्तगुरुंचे कृपाशिर्वाद आम्हाला मिळतात
नाताळ हा सण जायच्या आधी तू आम्हाला तो भेट म्हणून देतोस. तुझ्यावरच्या प्रेमाने आम्ही तो स्वीकारतो आणि सांताक्लाँजच्या प्रेमात पडून नाताळचा आनंद घेतो
तू आम्हाला खूप जवळचा वाटतोस… वर्षभरातील सर्व गुपिते उघड करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे तू…
वर्षभरातील केलेल्या घटनांची तसेच चुकांची कबुली व नवीन संकल्प तुझ्याच साक्षीने होतात
चांगल्या वाईट गोष्टींचा पाढा तुझ्या समोरच वाचला जातो
पण सर्व माफ करुन नवीन उमेद तूच देतोस. आणि येतो तो तुला निरोप देण्याचा दिवस…
तुझ्या मुळेच आम्हाला नवीन वर्ष चुका सुधारण्याची संधी नवी स्वप्ने साकारण्याची जिद्द मिळते..
आम्ही धूमधडाक्यात तुला निरोप देतो. या कृतज्ञता सोहळ्यात गुंग असतानाच तू हुलकावणी देऊन निघून जातोस… हुरहुर लावून… मन हळवे करुन…
सदैव तुझ्या प्रेमात,
🌹🌹
लेखक : अज्ञात
संग्राहक :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈