☆ विविधा ☆ पहिल्या सुखांच्या सरी ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
तो मातीचा दरवळणारा सुवास अत्तरा पेक्षाही भारी वाटून जातो. मनातली मरगळ कशी लांब पळवून नेहतो. मन कसे प्रसन्न टवटवीत करून सोडतो.
ते टपोरे थेंब पाहताना नेत्र कसे सुखावून जातात आणि ती रिमझिम सर जेव्हा अंगावर पडते तेव्हा सारी काया सुखावते. पानं आनंदानी डोलू लागतात तर फुलपाखरू शांत फुलावर बसुन पावसाची रिमझिम पाहत राहते.
प्रत्येकाला हा अनुभव नक्की आला असेल नाही का?
तो पहिला पाऊस, तो आला की कसे सारे सुखावतात अगदी लहान मुलांपासून आजी आजोबा पर्यंत. प्रत्येकाच्या आठवणी ताज्या टवटवीत होऊन जातात.
काहीजण आपल्या जुन्या आठवणीत रमतो, तर काहींच्या मनाची तगमग शांत होऊ पाहत असते, कुणाचे नेत्र चोरून वाहत असतात तर कोण पावसात मनमुराद भिजत असतो. तर कोणाला गरम गरम चहा भजीची हुक्की आलेली असते.
अगदी रांगणारे मुल सुद्धा पावसात भिजण्यासाठी धडपडत असते. तीच थोडी मोठी मुल आईची नजर चुकवून मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद घेतात.
मला ना माझ्या लहानपणी चि एक गंमत आठवते. पावसाळ्यात आई अगदी आठवणीने रेनकोट द्यायची वर बजावून सांगायची पावसात भिजायचे नाही. आईच्या समाधानासाठी तो आम्ही घेऊन जात होतो हे खरे पण जर शाळा सुटल्यावर पाऊस आला तर घर जवळ येईपर्यंत हा बिचारा रेनकोट दप्तरातून बाहेर येतच नव्हता. घर जवळ आले की हळूच तो अंगावर चढवला जायचा. आई विचारायचीच रेनकोट होता ना मग कसे भिजला? उत्तर तयारच असायचे अग दप्तरातुन काढे पर्यंत मोठी सर आली आणि भिजलो. पण शेवटी आईच ती बरोबर ओळखायची कधी एखादी चापटी मिळायची, नाही तर कधी ती पण आमच्याबरोबर मनमुराद हसायची. कदाचित् तिनेही तेच केले असेल नाही का तिच्या बालपणी.
अरे हा पाऊस तर मला बालपणात घेऊन गेला की, मला खात्री आहे तुम्हाला ही घेऊन गेला असेल बालपणात. हो ना?
हळू हळू सार्या आठवणी कश्या मनाच्या कोपऱ्यातून डोकावू लागतात नाही का ? त्या केलेल्या छोट्या छोट्या होड्या त्या पाण्यात सोडून कोणाची किती लांब जाते ह्यावर लावलेली पैज, तो कॉलेजचा कट्टा, ते कॅन्टीन तो कटींग चहा आणि आपला तो ग्रुप. वाटले ना परत जावे कॉलेज मधे आणि परत पडावा मुसळधार पाऊस.
अरे आपणच नाही काही अगदी आपले आजी आजोबा सुद्धा रमून जातात पावसात ते ही सैर करून येतात भूत काळात. काहीना आठवणीने डोळ्यात पाणी येते तर काही ते पावसांच्या सरित लपवतात.
आपल्या प्रमाणेच निसर्ग कसा सुखावून जातो. त्यानी नेसलेला हा हिरवागार शालू पाहताना त्याचे हे सौंदर्य पाहताना कसं मन प्रसन्न होऊन जाते. पक्षी ही झाडाच्या फांदीवर बसुन झोके घेत आनंद लुटत असतात. तर ही धरती शांत शीतल होत असते.
सहज मनाच्या कोपऱ्यातून
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
09.8.2020
मो 9423566278
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈