सौ. सुनिता गद्रे
☆ विविधा ☆ बिचारी आजी – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे☆
नातवंडांच्या शाळेत ग्रँड पेरेंट्स डे होता. त्यामुळे आजी- आजोबा मोठ्या उत्साहानं मुलाकडं जायला निघाले होते. सगळ्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ ,नातवंडांसाठी कपडे, खेळणी, पुस्तके, इतर सटरफटर वस्तू… आजोबांच्या सूचना डावलून आजीबाई सामान वाढवतच चालल्या होत्या. गाडी सुरु झाली तशी आजोबांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मुलाच्या घरी पोहोचता क्षणीच ,”आजी- आजोबा” म्हणत चार बाल हातांनी त्यांच्या कमरेला विळखा घातला.’सुख- सुख म्हणजे वेगळं काय असतं!’ विचारानं दोघेही गहिवरली. नवे- नवे कपडे, खेळणी यात गुरफटलेल्या नातवंडांना इकडे तिकडे बघायला फुरसतच नव्हती .
दुसऱ्या दिवशी नातवंडांच्या कार्यक्रम बघून त्यांना खूप धन्यता वाटली. डान्स ,गाणी, फनी गेम्स स्पर्धा त्यांनी सगळं खूप एन्जॉय केलं.
” छान ,अगदी दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम होता नाही? किती स्मार्ट असतात हल्लीची मुलं, नाही तर आपल्या वयाच्या लोकांचं बालपण….” आजी म्हणाल्या. आजीच्या म्हणण्याला आजोबांनी ही दुजोरा दिला.
पुढच्या दिवशी मुलांचे आई बाबा गेले ऑफिसला. मुलांना गॅदरिंग संपल्याची सुट्टी होती आणि आजी आजोबा घरी असल्याने लालन-पालनमधे… (पाळणा घराचे नाव)… जायचा पण प्रश्न नव्हता. आजोबा पेपरात डोकं घालून बसले आणि आजींचा आवडता टाइमपास सुरू झाला…. टीव्ही सिरीयल बघण्याचा…, ‘नवऱ्याची बायको’ चालू होतं! शनायाशी गुरुचं लग्न लागत होतंआणि राधिकाचं रडणं सुरू होतं. थोरला नातू जवळ येऊन बसला होता. “आजी ती गर्ल का रडतेय ?ती त्या अंकलची वाईफ आहे का? मग तो दुसऱ्या गर्लशी लग्न का करतोय ?..म्हणजे तो गुरु अंकल बॅड बॉय आहे का?”प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.
” हो रे बाबा, “आजी टीव्ही वर टिकवलेली नजर न काढता उत्तरली… ‘ठाय्-ठाय’ टी.व्हीवर खोट्या खोट्या गोळ्या झाडत तो पळून गेला.
मुलगा सुनेला कामापुढे टीव्ही बघायला वेळच नसायचा. आणि नातवंडांना लालन पालन मधे फक्त बेबी टीव्ही, किंवा छोटा भीम या सारख्या मालिकाच दाखवायचे ,ते पण थोडाच वेळ !
रात्री आजीने कोणती तरी राजा राणी ची मालिका लावली होती. थोरला- धाकटा दोघंही बघायला बसले… आणि त्यांचे प्रश्न सुरु झाले ,”आजी हाअंकल कोण आहे ?” ..”राजा चंद्रसेन.”..” ती क्वीन आहे का..?”..”हो .”आणि ती दुसरी गर्ल?..ओह! ती पण क्वीन ?..”एक किंगच्या दोन-दोन क्विन ?”नातवंडांचे प्रश्न !
“अरे पौराणिक ,ऐतिहासिक अशा पूर्वीच्या काळात एका राजाच्या दहा दहा पण क्विन्स असायच्या. “आजोबांनी नको तेव्हा नाही ती माहिती पुरवली. “ओ माय गॉड!” दोघं एक सुरात ओरडली, “आजी म्हणजे तो चंद्रसेन किंग,तो पण बॅड बॉय आहे का त्या गुरुसारखा?”
बिचाऱ्या आजीला उत्तर सुचले नाही. तेवढ्यात थोरला म्हणाला , “आजी हे नको बघायला. त्यापेक्षा क्रिकेट लावूया.” चॅनल बदलून क्रिकेट, न्यूज वगैरे बघण्यात नातवंडं आणि त्यांचे आई-बाबा गुंग झाले.
क्रमशः….
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈