सौ. सुनिता गद्रे
☆ विविधा ☆ बिचारी आजी – भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे☆
पुढेही असेच अनुभव आल्याने नातवंडांच्या सोबत टीव्ही बघणं आजीनं सोडूनच दिलं .
“या आपल्या चार अन् सहा वर्षाच्या छोट्यांमध्ये क्युरिआसिटी फार आहे नाही.. .! त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची म्हणजे…. आजी भयभीत झाल्यासारख्या बोलल्या.”हो ही नवी जनरेशन अतिशय स्मार्ट आहे .आपल्या मुलांच्या पेक्षाही” आजोबांनी दुजोरा दिला.
” ही दोघं मुलं बाहेर तर इंग्रजी बोलतातच…आणि घरात पण ..घरात तरी चांगलं मराठी बोलायला हवं नाही का…!” आजीबाई आजोबांचे मत घेत होत्या.
“अगं त्यांची तरी यात काय चूक आहे.. ?त्यांच्या लालन -पालनमधेही … मी मागच्या दोन तीन वेळा पाहिलंय नं सगळे किडस् इंग्लिश मध्येच बोलतात. त्यातनं ह्यांच्या बाबाची सारखी ट्रान्सफर होते. कधी चेन्नई तर कधी बेंगलोर तर कधी हैदराबाद.. मुलं सारख्या नव्या लॅंग्वेज कशा शिकू शकतील? इथल्या सगळ्याच लहान मुलांची कॉमन लैंग्वेज आहे इंग्लिश.शाळेत पण इंग्लिश बोलणे कंपल्सरी ..घरात त्यांच्याशी चांगलं मराठी बोलायला वेळ कोणाकडे आहे? त्यामुळे घरात इंग्रजी, मराठीची खिचडी लैंग्वेज ती दोघं बोलतात.”हे बोलताना आजोबाही खिचडी भाषाच शिजवत होते.
आता संध्याकाळी हात-पाय धुऊन देवाची स्तोत्रं ,परवचा म्हणून झाल्या की त्यांना गोष्टी सांगायचा उपक्रम आजीने सुरू केला.मुलगा-सून खुश झाली.
“अरे आजीकडून सगळं शिकून घ्या बरं… संस्कृत स्तोत्रेपण…आम्ही पण लहानपणी संस्कृत श्लोक म्हणायचो. संस्कृत पाठांतराने वाणी कशी शुद्ध होते.” मुलगा म्हणाला. ” मग बाबा तू का नाही आम्हाला शिकवलंस?” धाकट्याच्या प्रश्नाकडे अर्थात् त्यानं कानाडोळा केला. तोपर्यंत थोरला विचारता झाला,” वाणी म्हणजे?… संस्कृत म्हणजे?… शुद्ध म्हणजे ?”
“आजीबाई या प्रश्नांच्या एके फोर्टी सेवनला तुम्हीच तोंड द्या इथे असेपर्यंत .”म्हणत,हसत हसत मुलगा तिथून निघून गेला.
मुलगा सुनेचा हाय प्रोफाईल जॉब .त्यांना नव्हता जादा वेळ मुलांसाठी द्यायला. ‘ ‘लालन-पालन’च त्यांच्यावर जे संस्कार करायचे ते करायचा. पण सध्या आजी-आजोबा आल्यामुळे तेही बंद केले होते. आजोबांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कॅरम क्लब मध्ये रमायला सुरुवात केली. त्यामुळे बिचारीआजीच ” का ?कोण? कसं? केव्हा? किती?” यासारख्या प्रश्नांच्या बाराखडीत अडकून पडली गेली.
पण आजीही डोकेबाज होती. नातवंडांसाठी गोष्टी सिलेक्ट करताना जास्त प्रश्नांच्या तावडीत आपण सापडणार नाही अशी काळजी ती घेऊ लागली.
क्रमशः….
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈