सौ. सुनिता गद्रे
☆ विविधा ☆ बिचारी आजी – भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे☆
पण कधीतरी अनवधानानं ती प्रश्नांच्या कात्रीत सापडायचीच. “गणपती बाप्पाचं डोकं हत्तीचं का असतं ?” प्रश्न ऐकून गणपती जन्माची गोष्ट सांगायला तिनं सुरुवात केली…. जशी तिला माहीत होती तशी… अन् धाकटं पिल्लू रडून लागलं, “आजी हत्तीच्या बाळाचं हेड कट् केलं?… त्याला किती दुखलं असेल. ते रडलं का ? ..आजी शंकर बाप्पाने स्वतः कट् केलेलं गणपती बाप्पाचं हेडंच पुन्हा का नाही बसवलं ? शंकर बाप्पा हे करू शकत होता ना .तो तर गॉड आहे…
निरुत्तर झालेल्या बिचाऱ्या आजीनं उगीच इकडचं तिकडचं सांगून वेळ मारून नेली.
अभ्यास करताना, गोष्टी ऐकताना, खेळताना, जेवताना त्यांच्या धनुष्यातून प्रश्नांचे बाण बाहेर निघायचेच.
समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे कामत आजोबा वारले .तेव्हा कोणाही लहान मुलाला तिकडे जाऊ दिले नव्हते .पण त्या लहानग्यांमध्ये काही चर्चा झाली असेलच. “आजी मेले म्हणजे काय? “..धाकटा. “अरे ही डाईड” मोठ्याने ॲक्शन सहित करून दाखवले. मग ते असेच पडून राहणार ?..” आजीनं जरा सौम्य भाषेत समजावलं, “ते देव बाप्पा कडे गेले.”….
“देव बाप्पा इथे येऊन त्यांना घेऊन गेला का?मग मी काल हनी- बिला चप्पलनं मारलं. का म्हणजे ती आपल्याला बाईट करते ना म्हणून… ती मेली पण ती अजून डस्टबिन जवळच पडून आहे. तिल बाप्पाने का नाही नेले ?”
निरुत्तर झालेल्या बिचाऱ्या आजीनं विषय बदलला.
प्रश्नांचा मारा झेलत झेलता दोन महिने झाले. परतीचं रिझर्वेशन झालं . पण निघायच्या आठ दिवस आधी सून सांगू लागली ,”आई ,मला पुढच्या महिन्यात यु. एस.ला जावे लागणार आहे… प्रोजेक्टसाठी… तेव्हा तुम्ही दोघं इथं याल ना.तशी मुलांसाठी मी गव्हर्नेसची व्यवस्था पण करणारच आहे. तेवढीच तुम्हाला मदत होईल.पण तुम्ही दोघं असलात म्हणजे मला कसलीच चिंता नाही .”
नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. “आजी-आजोबा तुम्ही का जाताय? परत केव्हा येणार?” सर्व जण स्टेशनवर उभे होते तेव्हा नातवंडांच्या प्रश्नाचा हल्ला त्यांच्यावर झाला. आजी म्हणाली,”तुम्ही लवकर या असं म्हणा.. प्रश्न नका बाबा विचारू” सगळ्यांनाच हसू फुटलं .गाडी सुटली .दुसऱ्या ट्रॅक वरून एक मालगाडी वेगात क्रॉस झाली. जणू काही क, का, कि, की..ची बाराखडीच डब्यात बसून आपल्यापासून दूर गेलीय
या विचारानंआजीला हायसं वाटलं.
गाडीत बसल्या बसल्या आजी विचार करत होती, ‘मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती असणे चांगलेच आहे .त्यातून ज्ञानवर्धन होते. न घाबरता विचारणं पण उत्तमच .नुसत्या घोकंपट्टीपेक्षा असे ज्ञान मिळवणे ही एक खूप चांगली बाब आहे .पण आपणच कुठेतरी त्यांना समाधानकारक योग्य उत्तर द्यायला कमी पडतोय .
पण आजी हार मानणा-यातली नाही. तिला बिच्चारी व्हायचं नाहीय.त्यामुळे ती विचार करतेय की’ गावी पोचल्यावर चाईल्ड सायकॉलॉजीची पुस्तके वाचावित की गुगल गुरु चा सल्ला बरोबर मानावा, का सरळ एखाद्या सायकॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेऊन दोन-चार सिटिंगमध्ये हा विषय हाताळावा…….
बघा तुम्हाला काही योग्य सल्ला सुचतोय का? सुचला तर आजीला जरूर कळवा. या फोन नंबर वर…
समाप्त
© सौ सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈