श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
बातमीचा समाचार ! श्री प्रमोद वामन वर्तक
पहाटे पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रेडियोवर सुरु होणाऱ्या, “मंगल प्रभात” या कार्यक्रमात, बिस्मिल्लाखान यांच्या शहनाईवादना नंतर, सहा वाजता दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून एक, एक मिनिटाचे, प्रथम हिंदी व नंतर इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होत असे ! तसेच, संध्याकाळी सात वाजता,
“नमस्कार, आकाशवाणीच हे पुणे केंद्र आहे ! सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत. आजच्या ठळक…..”
मंडळी, टीव्ही नामक इडियट बॉक्स आजच्या सारखा झोपडपट्टी पासून बंगल्या, बंगल्यात आणि आता तर मोबाईलमधे सुद्धा घुसायच्या आधीची ही गोष्ट ! त्या काळी या दोन “ऑथेँटिक बातमी पत्रावर” अवलंबून असणारी आमची पिढी, रेडियोवरची ही दोन बातमी पत्र ऐकत, ऐकत मोठी झाली ! त्या काळी रेडियो घरात असणं, हे थोडं श्रीमंतीचच लक्षण मानलं जात होतं ! सगळ्याच मध्यमावर्गी्यांना परवडण्या सारखी ती गोष्ट नव्हती ! आमच्या चाळीच्या पंचेचाळीस बिऱ्हाडात जेमतेम दोन ते तीन “मरफीचे” रेडियो होते, यावरून त्याची कल्पना यावी ! या रेडियोच्या बाबतीतल्या गमती जमती सांगण्यासाठी वेगळा लेख, पुढे मागे लिहायचा विचार आहे ! आजचा विषय “बातमी” असल्यामुळे, माझ्या पुढील लेखाच्या विषयाची आगाऊ बातमी देणं, हे मी माझं कर्तव्य समजतो !
पुराण काळात राजाचा एखादा हुकूम अथवा फर्मान रयतेला (तेव्हा सामान्य लोकं रयत म्हणून ओळखले जात, त्यांची जनता नंतरच्या काळात झाली ! ) कळण्यासाठी वेगळी सोय होती ! एक दवंडीवाला, त्याच्या ढोल वाजवणाऱ्या साथीदारासह गांवभर फिरून, तो राजाचा नवीन हुकूम अथवा फर्मान सर्वात शेवटी प्रत्येक गावच्या चावडीवर मोठ्याने वाचून दाखवत असे !
काही राजांनी त्या काळी विशिष्ट पक्षांचा उपयोग, अतिदूर असलेल्या कोणासाठी संदेश (बातमी) देण्यासाठी वापरल्याच, आपल्या वाचनात आलं असेलच ! नसेल तर, “कबुतर जां जां जां” हे गाणं आठवून बघा, म्हणजे मी काय म्हणतो ते लगेच आठवेल ! हल्ली सगळ्यांनाच स्पून फिडींग करायला लागतं, त्याला तुम्ही तरी कसे अवपाद असणार म्हणा ! असो !
काही आफ्रीकन देशात लोकं फार पूर्वी ड्रम सारखे वाद्य विशिष्ट तालात मोठयाने वाजवून एखादी बातमी पुढच्या गावात पोहचवत असत ! नंतर नंतर त्याच काळात “रनर” ची परंपरा सुरु झाली ! रनर म्हणजे गावातला एखादा सगळ्यात जलद धावणारा तरुण, स्वतः दुसऱ्या गावात जाऊन एखादी बातमी तिथल्या प्रमुखाला सांगत असे ! मग त्या गावातला “रनर” तीच बातमी पुढच्या गावात पोहचवत असे !
मराठी वृतपत्रांचा उदय सर्वप्रथम मुंबईत झाला ! मराठीतील पहिले वृतपत्र “दर्पण” या नावाने बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरु केले ! हे वृतपत्र मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते जे जेमतेम ८ वर्ष चालून १८४० मधे बंद पडले ! मराठीतील ही दोन्ही वृतपत्रे सुरु करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकरांना जातो, त्यामुळेच त्यांना ‘मराठी वृतपत्राचे जनक’ मानले जाते !
आता वृत्तपत्राचा उल्लेख आलाच आहे, तर पुढे जाता जाता, मी मागे वाचलेल्या एका इंग्रजी कादंबरीची आठवण झाली ! स्वतः मालक, संपादक असलेला माणूस, “बातमी सम्राट” होण्यासाठी आणि आपल्या पेपरचा खप सगळ्यात जास्त होण्यासाठी कोणत्या थराला जातो, हे आयरविंग वॉल्लास या लेखकाने आपल्या “Almighty” (1982) या कादंबरीत कथन केले आहे ! सध्याच्या पत्रकारितेतली, “आपण सर्व प्रथम ही exclusive बातमी आमच्याच चॅनेलवर बघत आहात” अशी खरी, खोटी फुशारकी, त्या काळी त्याने आपल्या वर्तवलेल्या त्याच्या कादंबरीच्या, वेगळ्या अर्थाने जवळ जाणारी आहे, असं आता हल्लीचं पत्रकारितेच रूप बघता मला वाटायला लागलं आहे !
पुढे जसं जसा मानव प्रगत होतं गेला तसं तशी, संपर्काची नव नवीन साधन त्याने आपल्या बुद्धीने विकसित केली ! उदाहरणं द्यायच झालं तर पोस्ट कार्ड अथवा अंतर्देशीय पत्र, जी त्या काळी आपल्या ख्याली खुशालीची बातमी आपल्या दूरच्या नातेवाईकांना कळवण्यासाठी वापरात येवू लागली ! पण नंतर नंतर त्यातील उणीवा कळल्यावर आणि “तार” नामक बातमी पोचवण्याचा जलद उपाय उपलब्ध झाल्यावर(१८५०), त्या दोघांचा वापर कमी कमी होत गेला ! मग टेलिफोनचा शोध लागल्यावर तर जगाच्या एका कोपऱ्यातली बातमी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात क्षणार्धात पोहचू लागली !
नंतर “दूरदर्शनने” घरात प्रवेश केल्यावर त्यावरील त्या काळात असलेल्या एकाच चॅनेलवर, वेगवेगळ्या बहारदार कार्यक्रमा बरोबरच दिल्या जाणाऱ्या बातम्या लोकं बघायला लागले आणि त्यावर खात्रीने विश्वास ठेवू लागले ! बातम्या कशा द्याव्यात आणि कशा देवू नयेत याच आज सुद्धा उत्तम उदाहरण म्हणजे, दूरदर्शनच्या बातम्या आणि सध्या इतर कुठल्याही पेव फुटलेल्या न्यूज चॅनेलवरील बातम्या ! या बाबतीत जास्त न बोललेच बरं ! आणि आता तर काय मोबाईल नामक यंत्राने सारे जगच, सगळे लोकं आपापल्या खिशात घेऊनच आज काल वावरत असतात ! त्यामुळे जगाच्या एखाद्या टोकाला घडतं असणाऱ्या घटनेची बातमी आपण बसल्या जागी नुसती ऐकूच नाही, तर प्रत्यक्ष पाहूही शकतो !
पण विज्ञानाच्या कुठल्याही शोधाला, एक चांगली आणि एक वाईट बाजू असतेच असते ! जसं ऍटोमिक एनर्जीचा शोध लागल्यावर काहींनी त्या पासून सर्वनाश करणारा ऍटोम बॉम्ब बनवला तर काहींनी त्याचाच उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला ! आता मोबाईल मध्ये वेगवेगळे ऍपस, अल्लाउदिनच्या जादूच्या दिव्या सारखे शिरल्यावर, त्याच्या कडून चांगली काम करून घेणाऱ्या लोकां पेक्षा त्याच्या कडून वाईट कामंच लोकं जास्त करून घेवू लागलेत ! काही जण स्वतःच एखादी बातमी क्रिएट करून ती पोस्ट करू लागलेत ! आणि त्या बातमीची कुठलीच शहानिशा न करता त्यांचे मित्र ती आपापल्या मित्रांना पुढे पाठवून मोकळे होऊ लागलेत ! असो, व्यक्ती तितक्या प्रकृती !
मंडळी, आपल्याला एखादी बातमी कुणाकडूनही (अगदी माझ्याकडून देखील!) कळली तरी ती पुढे ढकलतांना, कृपया त्याची शहानिशा करूनच पुढे ढकला ही विनंती !
शुभं भवतु !
© श्री प्रमोद वामन वर्तक
ता. क. – वर उल्लेख केलेल्या बातमी पत्राच्या निवेदिका, श्रीमती सुधा नरवणे या, ज्यांची नुकतीच CDS म्हणून नेमणूक झाली त्या मनोज मुकुंद नरवणे यांच्या मातोश्री !
संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈