सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ बदलती दिवाळी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
दिवाळीची चाहूल तर लागली! मनात असंख्य दिव्यांची आरास तयार झाली! आठवणींच्या पणत्या तेल,वात घालून प्रज्वलित होऊ लागल्या!या पणत्यांच्या ज्योतींनी मन उजळून निघाले. त्याचा प्रकाश मनभर पसरला! पुन्हा पुन्हा आठवू लागल्या त्या सोनसळी दिवाळ्या!
आमच्या लहानपणी आत्ता सारखा लखलखाट नसला तरी मांगल्याने, पवित्र्याने भारलेली दिवाळी असे. पहाटेच्या वेळी मंदिरात काकड आरतीचे प्रसन्न वातावरण अनुभवता येई! कोजागिरी पौर्णिमा आली की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होत असे. पहाटेचा गारवा सुखद वाटत असे. घराघरातून स्वच्छता होऊन नवरात्र पार पडले की बायका दिवाळीच्या तयारीला लागायच्या!
डबे घासणे, अनारसा पीठ तयार करणे, चकली कडबोळी ची भाजणी भाजणे ही कामे सुरू होत असत! दिवाळीची खरेदी फार मोठी नसे. तरीही खिशाच्या परवानगीनुसार प्रत्येकी एखादा तरी नवीन कपडा आणि थोडे फटाके आणले जात. कधीकधी घरासाठी म्हणून काही खरेदी असे! दिवाळीची वाट पाहिली जायची ती मुख्यतः फराळासाठी! लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, करंजी सगळे कसे आतुरतेने वाट पाहत असायचे!
दिवाळी अगदी उद्यावर आली की पहिला फटाका कोण, किती वाजता वाजवणार याची चुरस असे. फटाके अंगणात उन्हात टाकलेले असत. कारण जेवढे सुके असतील तितके ते जोरात वाजत! दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील बहुदा घरीच बनवले जात. अंगणाच्या कोपर्यात मुलांची दगड, माती गोळा करून किल्ला करायची गडबड असे.त्यावर शिवाजी महाराज आणि मावळे कसे लावायचे यावर जोरदार चर्चा होत असे. सगळं वातावरण कसं चैतन्याने भारलेले असे. नवलाईने आणलेले सुगंधी तेल, उटणे, साबण यांचे वास दरवळत असायचे. अशी ही दिवाळी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली!
आमच्या मुलांनाही अशीच दिवाळी अनुभवायला मिळाली!
पण गेल्या पंधरा वीस वर्षात दिवाळीचे स्वरूप थोडे बदलले आहे असे म्हणायला हरकत नाही. घरी फराळाचे पदार्थ करणे कमी झाले. त्यामुळे फराळाची ताटं शेजारी देण्याची पद्धत कमी झाली. त्याच बरोबर काही चांगले बदल आता झाले आहेत. दिवाळी निमित्ताने काही सेवाभावी संस्था सुवासिक तेल, साबण, फराळाचे पदार्थ ,मुलांसाठी खाऊ, फटाके अशा गोष्टींचे वाटप करतात. अनाथाश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी फराळ देणे, कपडे देणे यासारख्या गोष्टी केल्या जातात. दिवाळी पहाट गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच घरी दिवाळी न करता ट्रीपला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवाळी अंकांची मेजवानी या सुट्टीत अनुभवयाला मिळत असते. एकूण काय तर दिवाळीचे स्वरूप बदलले असले तरी दिवाळी आनंदमय आहे! रूटीन मध्ये बदल म्हणून आपण दिवाळीचा आनंद घेतो. दिव्यांच्या माळा आणि लायटिंग यामुळे पणत्यांची शोभा कमी झाली असली तरी अजूनही तुळशी वृंदावना पुढे पणती लावणारी एक पिढी शिल्लक आहे, ती या बाहेरच्या झगमगाटापासून लांब शांतपणे तेवत असते.
बदलत्या दिवाळीचे अनुभव आठवता आठवता या सगळ्या दिवाळींपेक्षा वेगळी दिवाळी यंदा येत आहे. गेले सात-आठ महिने कोरोनामुळे वातावरणात एक प्रकारची मरगळ आली. अजूनही कोरोनाची भीती माणसाच्या मनात आहेच पण कोरोनाबद्दल बऱ्याच गोष्टी आता कळल्यामुळे सावधगिरी बाळगून का होईना माणूस उत्साह दाखवत वावरत आहे! मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग ही त्रिसूत्री वापरून लोक बाजारात गर्दी करत आहेत. बाजारात नव्या साड्या बरोबर नवीन नवीन मॅचिंग मास्क ही मिळू लागले आहेत. माणूस हा समूह प्रिय प्राणी आहे त्यामुळे कोणत्या तरी कारणाने एकत्र जमणे हे माणसाला आवडते! तरी अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या कार्यबाहुल्यामुळे एकमेकांकडे असलेले येणे जाणे कमी झाले आणि कोरोनामुळे तर आणखीनच कमी झाले आहे. व्यवसाय, नोकरीतील मंदीमुळे लोकांच्या हातात पैसाही कमी झाला आहे. या सर्वांचा बाजारपेठेवर थोडा परिणाम होणारच असला तरी आहे त्या परिस्थितीत माणसं दिवाळीचा सण साजरा करणारच! दिवाळी सारखा वर्षातून एकदा येणारा मोठा सण सुना जावा असं वाटत नाही ना!
लोक आहे त्या परिस्थितीत जमेल तेवढा आनंद साजरा करतील. लवकरच कोरोना वर लस येईल आणि आपण कोरोनामुक्त होऊ! तोच दिवस आपल्यासाठी खरतर दिवाळीचा असणार आहे एवढे मात्र नक्की!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈