श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ भाऊबीज: आठवणी दाटतात….. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
आज भाऊबीज. आज बहिणीने भावाला ओवाळायचं आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची. ओवाळणीच्या तबकातील दिवा हे सूर्याचे प्रतीक. सूर्य हा जीवनदाता. ’तू अनेक सूर्य पहा’ असा अर्थ त्या ओवाळण्यात आहे. भाऊ-बहीण यांच्या नात्यात एक अनोखे माधुर्य आहे. या नात्याचे कौतुक करताना लोकसाहित्याने खूप खूप ओव्या रचल्या आहेत. बहिणींना आपला लाडका भाऊ अगदी जवळचा वाटतो. जणू भाऊ म्हणजे गळ्यातला ताईत. एका ओवीत एकीनं म्हंटलयं, ‘दुबळा पाबळा का होईना, पण एक तरी भाऊ बहिणीला असावाच. का? भाऊबीजेला एक पावलीची चोळी आणि कधीतरी, थकल्या भागल्या देह-मनाला एका रात्रीचा विसावा.’
भाऊ मोठा असला, तर तो बहीण आणि वडील यांच्यामधला दुवा असतो.तो मित्र असतो. सल्लागार असतो. रक्षणकर्ता असतो. धाकटा असला, तर त्याच्या खोड्याही बहिणीला आनंद देतात. तो बहिणीला आपल्या मुलासारखाच वाटतो. असेच काही-बाही विचार मनात येत होते. विचार करता करता त्यांची वावटळच झाली. या वावटळीने मला एकदम उचललं आणि बालपणीच्या अंगणात नेऊन उतरवलं. तिथे आठवणी झिम्मा खेळत होत्या.
एक जण लगबगीने पुढे आली, ‘मी आठवते तुला?’
‘हो ग, तुला कशी विसरेन? ‘बालपणीच्या त्या निरागस वयातली, तितकीच निरागस आठवण. … आठ वर्षाची असेन मी तेव्हा. आजोळी होते मी तेव्हा. माझे मुंबईचे मामा-मामी, लता दिलीप सगळे आले होते. दिलीप माझ्या बरोबरीचा. लता आमच्यापेक्षा चार वर्षाने मोठी. तो भाऊबीजेचा दिवस होता. दिलीपने आमच्या दोघींकडून छान चोळून मोळून घेतले. आदल्या दिवशी तिळाचे वाटण केलेले होते. ते लावायला लागताच तो म्हणाला, तो चिखल मला लावू नकोस!’ त्यावर आजी म्हणाली, ‘अरे त्यामुळे शरीरावरची छिद्रे मोकळी होतात. अंग मऊ होतं.’ मगं तो काही बोलला नाही. मी वाटण जरा जास्तच खसखसून त्याला लावलं. आज महाराजांना पाण्याची बदली आयती द्यायची होती. विसण घालायचं होतं. उटणं लावायचं होतं. त्यावेळेपर्यंत मोती साबण आला नव्हता. निदान आमच्या घरात तरी. दोन बादल्या पाणी त्याला घालून झालं, तरी त्याचं ‘अजून घाल’ संपेना. एव्हाना बंबातलं गरम पाणी संपून नुकतच वरून घातलेलं गार पाणी येऊ लागलं होतं. मी म्हंटलं, ‘घालू गार पाणी?’ तशी महाराजांनी एकदाचा टॉवेल गुंडाळला. अंग पुसून नवे कपडे घातले. दादामामांनी त्याला दहा रूपयाच्या दोन नोटा दिल्या. एक मला घालायला आणि एक लताला घालायला.
मी पण आंघोळ करून जरीचं परकर –पोलकं घातलं. तशी त्याने सुरू केलं, ’सुंदर ते ध्यान । समोर उभे राही। जरी परकर घालूनिया ।। ‘आहा, काय ध्यान दिसतय?’ माझ्यावरून हात ओवाळत तो म्हणाला. मी काही चिडले नाही. त्याच्या खिशातल्या नोटेकडे बघत होते ना मी!. मग ओवाळण्याचा कार्यक्रम झाला. लताताईच्या तबकात त्याने नोट टाकली. नंतर मी ओवाळलं. मी आपली ओवाळतेय … ओवाळतेय… ओवाळतेय. नोट काही खिशातून बाहेर येईना. मी म्हंटलं ,’टाक की लवकर. माझा हात दुखायला लागलाय.’
त्याने खिशावर आपला हात ठेवत म्हंटलं , ‘घे बघू घे.’ आणि तो पाटावरून उठून चक्क पळायलाच लागला. ‘म्हणाला, ‘हे पैसे माझे आहेत.’ मी म्हंटलं , ‘दादामामांनी मला ओवाळणी घालण्यासाठी तुला दिलेत.’ ‘असं? मग मला पकड आणि घे.’ मी जवळ गेले की तो पळायचा. आमची शिवाशिवीच सुरू झाली. पण मी काही त्याच्याइतकी चपळ नव्हते. शेवटी रडत रडत आजीकडे गेले. आजीची आणि त्याची काही तरी नेत्रपल्लवी झाली. आजी खोटं खोटं त्याला रागावली. मी म्हंटलं, ‘दादांनी दिलेले पैसे द्यायचेत, तर इतका कंजूषपणा करतोयस, स्वत:चे द्यायचे झाले, तर काय करशील? बहुतेक माझ्याकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाहीस.
‘घ्या. रडूबाई… रडूबाई रडली… आजीपुढे जाऊन रडली….’ त्याने नोट माझ्या परकराच्या झोळात फेकून दिली. त्या दहा रुपयाचे मी काय केले हे आता आठवत नाही. मोठे छान दिवस होते ते. पुन्हा किती तरी वर्षं आम्ही भाऊबेजेला भेटलो नाही.आणि पुन्हा भेटलो, तेव्हा खूप सुजाण झालो होतो. तेव्हा, जुन्या भाऊबीजेची आठवण काढायची आणि लोट-पोट होत हसायचो. आता हेही आठवतय, की तो मिळवायला लागला आणि आता भाऊबीजेला आम्ही प्रत्यक्ष भेटत नसलो, तरी माझ्यासाठी कधी साडी, कधी ऊंची पर्स, कधी नेकलेस, कधी भारी अत्तराच्या किंवा सेंटच्या बाटल्या असं काही ना काही भाऊबीज म्हणून येत रहातं.
इतक्यात एक जण लाजत… संकोचत माझ्याकडे आली. ‘ मी… मी आठवते तुला.’
‘तुला कशी विसरेन? दुसर्याच्या कष्टाचा कळवळा येणार्या माझ्या भावाची आठवण तू…त्या वर्षी दिवाळीला मी माझ्या काकांकडे होते. माझी चुलत बहीण नलिनी. ती आणि मी एकाच वयाच्या. तिने खूप आग्रह केला की आमच्याकडे ये म्हणून. त्यावर्षीची माझी दिवाळी काकांकडे झाली. मला चार मोठे चुलत भाऊ. नर्कचतुर्दशीला आणि भाऊबीजेला सगळ्यांनी आम्हा दोघींकडून छान अंगमर्दन करून घेतलं. माझा दोन नंबरचा चुलतभाऊ बाबू म्हणाला , ’सगळ्यांना तेल लावून तुमचे दोघींचे हात चांगले भरून आले असतील. चला! आता तुम्ही पाटावर बसा. मी तुमच्या हाता-पायांना तेल लावतो. आम्ही म्हंटलं, ‘तू म्हणालास ना, पुष्कळ झालं, आमचं हात दुखणं कमी झालं. नाही म्हंटलं तरी दुसर्याच्या कष्टाचा विचार करणारा भाऊ आपल्या घरात आहे याचा मला आनंद झाला. अभिमान वाटला. ‘ऐसी कळवळ्याची जाती। लाभावीण करी प्रीति।‘ दुसर्याचा विचार करणारं त्याचं हरीण –काळीज त्या दिवशी प्रथम लक्षात आलं. मग त्याने आम्हा सर्वांना ‘सुवासिनी’ सिनेमा दाखवला.
एवढ्यात आणखी एक जण इतरांना मागे सारत धिटाईने पुढे आली. म्हणाली, ‘तुला ‘गणेश नगरचे’ महादेवराव आठवतात की नाही?’ मी म्हटलं, ‘त्यांना कशी विसरेन? ते तर माझ्या ‘मर्मबंधातली ठेव’ आहेत.
पुण्यात एका लग्नाच्या वेळी दादा आणि वसुधाताई यांची भेट झाली. सहज गप्पा मारता मारता तेही सांगलीचेच आहेत, असं कळलं. त्यांचं नाव महादेव आपटे. मी एकदम म्हणाले, ’मीही माहेरची आपटे.’ त्यावर ते म्हणाले, ‘अरे वा! मग तू आमची माहेरवाशीणच झालीस की! आता यायचं आमच्याकडे. गणेशनगरला. ’ मी मान डोलावली. अशा लग्नकार्यात किंवा प्रवासात झालेल्या ओळखी आणि त्यावेळी दिलेली आश्वासनं तिथल्या तिथे विरून जातात. पण यावेळी तसं झालं नाही. ती दोघं एक दिवस फोन करून आमच्या घरी आली आणि जाताना ‘आता तुमची पाळी’ असं बजावून गेली. दोघंही पती-पत्नी अतिथ्यशील. लाघवी. भेटेल त्याच्याशी मैत्री जोडण्याची अनावर हौस. हळूहळू मी खरोखरच त्यांच्या घरच्यासारखी झाले. त्या वर्षी त्यांनी मला भाऊबीजेला बोलावले. मी संध्याकाळी गेले. त्यानंतर राखी पौर्णिमेला काही मी गेले नाही. संकोच वाटला, की दरवेळी आपण त्यांच्याकडून ओवाळणी घेत राह्यचं, हे काही बरं नाही. दुसर्या दिवशी सकाळी फोन …. ‘काल वाट पहिली. तू आली नाहीस. असं चालणार नाही…’ वगैरे… वगैरे… मला माझ्या कोत्या विचारांची लाज वाटू लागली. प्रेमाचं रागवणं. त्यानंतर ही चूक मी पुन्हा केली नाही. बरं त्यांना बहीण नाही, म्हणून त्यांनी हे नातं जोडलं असंही नाही. त्यांना सख्ख्या, चुलत, मावस अशा अनेक बहिणी होत्या. शिवाय वसुधाताईंच्या बहिणीही ओवाळायला यायच्या. वसुधाताई स्वत:च ओवळणीची छान तयारी करून ठेवत. भेटलेल्या प्रत्येकाशी नातं जोडणं आणि निभावणं हा दादांचा स्वभावधर्म होता. आता दादा नाहीत. वहिनीही नाहीत. पण त्यांनी होते तोवर अगदी निरपेक्ष असं प्रेम आमच्यावर केलं.
असंच निरपेक्ष प्रेम आमच्या दादांनी म्हणजे माझ्या मोठ्या भाऊजींनी माझ्यावर केलं. अगदी लग्न झाल्यापासून. ते माझ्या वडलांसारखेच होते. माझे सल्लागार होते. मित्र होते. दुसर्यांच्या उपयोगी पडायचा त्यांचा स्वभावच होता. माझे लग्न झाल्यावर माझा भाऊ काही वर्ष भाऊबीजेला यायचा. पण पुढे दरवर्षी ते शक्य होत नसे. असंच एका वर्षी कुणीच नव्हतं ओवाळायला. आमच्या वाहिनी (माझ्या जाऊबाई) म्हणाल्या, ‘आज कुणाला तरी ओवाळल्याशिवाय राह्यचं नसतं. तू यांना ओवाळ. मग तेव्हापासून, माझे भाऊ आलेले असले, नसले, तरी आमच्या दादांना ( माझ्या मोठ्या भाऊजींना ) मी ओवाळू लागले. राखी पौर्णिमेला राखी बांधून ओवाळू लागले आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांना ओवाळून औक्षण करू लागले, ते अगदी परवा परवापर्यंत. गेल्या दोन वर्षांपूर्वी धनत्रयोदशीलाच ते गेले. तेव्हा ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यात मी माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक, संरक्षक आणि सल्लागार पाहिला.
आज अशा सगळ्या भावांच्या आठवणी काढता काढता, मनात एक हुरहूर दाटून आलीय. कालप्रवाहात सगळे वाहून गेले. मी या प्रवाहाच्या काठाशी उभी राहून म्हणते आहे, ‘गेले ते दिन गेले….’
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈