श्री उमेश सूर्यवंशी
विविधा
☆ भाषा…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆
!! शब्दजाणीव !!
जगात मनुष्याने अधिकाधिक घातक अशी शस्त्रे निर्माण करून दाखवलीत. एकापेक्षा एक धारदार , हिंसक आणि थरारक अशी शस्त्रे जगाने आजवर पाहिली आहेत. मानवी समुदायाची मोठी कत्तल या घातकी शस्त्रे चालवूनच झाली. कुणी न्यायासाठी शस्त्र उचलले तर कुणी अन्याय करण्यासाठी शस्त्र पारजले. एकाहून एक अशी ही शस्त्रे बाळगणारी मानवी जमातीकडे आणखी एक महत्त्वाचे शस्त्र उपलब्ध आहे याची फारशी दखल घेतली जात नाही . या शस्त्राची एकच बाजू मोठ्या गौरवाने सांगितली गेली आणि त्याची दुसरी धारदार बाजू दुर्लक्षीत होत गेली. भलेभले चांगले लोक या शब्दाला शस्त्र देखील मानतील का ? माझ्यापुढे प्रश्न आहे.
भाषा ….हे मानवी समाजाकडे उपलब्ध असे शस्त्र आहे. भाषा मनुष्याला जोडण्याचे काम करते, योग्यपणे व्यक्त होण्याचे भाषा हे माध्यम आहे , भाषा मनुष्याच्या विकासात सर्वाधिक महत्त्वाची भुमिका बजावते ही सत्ये कुणीही नाकारणार नाहीच. मात्र भाषा शस्त्र म्हणून जेव्हा वार करते तेव्हा त्या जखमा वर्षानुवर्षे फक्त चिघळत राहतात , राज्य व राष्ट्रे यांचे अवयव कुरतडत राहतात , बहुतांशी वेळा दोन माणसांमध्ये , राज्यांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये देखील जोडण्याऐवजी तोडपाणीचे काम करते ती भाषाच. मानवी समाजात अनेक वेगवेगळ्या विविधतेने भरलेल्या भाषा आहेत. प्रत्येक भाषेला एक गोडवा आहे .इतर काही बलस्थाने आहेत. प्रत्येक मानवी जीवाला त्याची मातृभाषा अत्यंत प्रिय असते हे देखील निखालस नैसर्गिक सत्य आहे. तरीही भाषा शस्त्र म्हणूनच नव्हे तर घातक शस्त्र म्हणून काम करते हे देखील कटूपणाने नोंद करावे लागतेच. भाषेचा वापर ( गैर ? ) करून वर्चस्ववादी वृत्ती आपल्या धारणा शोषीतांवर लादतात. आपलीच भाषा ” प्रमाण ” व शोषीतांची भाषा ” तुच्छ ” अशी घातकी भाषीक मांडणी करून शोषीतांची गुलामगिरी कायदेशीर बनवू पाहतात. जगभर ही अवस्था भूतकाळात होती , वर्तमानात आहे आणि भविष्यात देखील दिर्घकाळ जिवंत असेल हे कटू वास्तव आहे. मग भाषेची नेमकी कोणती जाणीव आपल्याला कळली पाहिजे ? मुद्दा हा आहे. कोणत्याही भाषेला दुधारी धार असते .यापैकी एक विधायक असते आणि दुसरी विघातक. विधायक बाजू वाढवत नेणे हे योग्य .याचवेळी विघातक बाजू संपवत नेणे हे अधिक योग्य असते. स्वभाषेचा रास्त अभिमान जितका योग्य असतो त्याचबरोबर इतर भाषांविषयी आणि त्या भाषा बोलणारे समूहांविषयी देखील रास्त आदरभाव असावा.भाषेचे शुद्ध रुप आणि तथाकथित अशुद्ध रुप ही विभागणी टाळली पाहिजे .
भाषा…बोलण्यात सौम्य पण स्पष्ट , वर्तनात स्वच्छ पण आदरभावी , लिहिण्यात नेमकेपणा पण सच्चेपणा जपणारी असावी. खरा दोष भाषेचा नसतोच…तो असतो भाषावाद्यांचा. हे भाषावादी लोक अत्यंत संकुचित मात्रेने भाषा हाताळतात आणि भाषेची विघातक धार तेज करु पाहतात. अशावेळी जबाबदारी असते ती भाषेच्या संवादाकर्त्यांची. जे संवादकर्ते भाषेची विधायक बाजू अधिकाधिक उजळवीत राहतील आणि मानवी समूहात संवादप्रियता वाढवत राहतील. भाषेचे हे सामर्थ्य जपले पाहिजे .
© श्री उमेश सूर्यवंशी
मो 9922784065
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈