☆ विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.कारण तो परावलंबी आहे. आपल्या गरजा भागविण्यासाठी बुध्दिचा वापर करून तो कोणत्या ही थराला जावू शकतो.तो स्वार्थी आहे. गरजे पेक्षा जास्त घेण्याची आणि साठवण्याची त्याला सवय लागली आहे.ही सवय निसर्गातील कोणत्यांच सजीवात दिसत नाही. खरं तर वनस्पती सोडल्या तर कोणच स्वत:चे अन्न स्वत:करू शकत नाही.निसर्गात प्रत्येकाच्या अन्नाची सोय आहे.”जीवो जीवस्य जीवनम्”या साखळीत सजीव जगत आहे.आपले अन्न तो शोधतो मिळवण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रत्यय निसर्गात पावलो पावली दिसतो.

पाखरांच्या किलकिलाटाने मी बाहेर आले.रस्त्यावर चिमण्या आनंदाने दाणे टिपत होत्या, उडत होत्या.इकडून तिकडे जात होत्या. त्या स्वछंदी होत्या.हलचाली मोहक होत्या.सकाळी सकाळी तो चिवचिवाट प्रसन्न वाटत होता.आपल्या नादात होत्या. एवढ्यात… गल्लीतली दोन तीन कुत्री तिथे आली.चिमण्यांना बघून ती हरकून गेली.त्यांच्या जिभेला पाणी सुटले.आज आपली चांगली मेजवानी होणार, या आविर्भावात ते होते. दबा धरून राहीले. हळूहळू पुढे झाले. आता ते चिमण्यावर  झडप घालणार..त्या बळी पडणार. असे मला वाटले,. त्यांना मी हाताने  उसकवणार… तेवढ्यात सगळ्या चिमण्या भूर्र…कन्…उडाल्या. कुत्री… भुंकली चरफडली.मागे फिरली.चला चिमण्या वाचल्या… म्हणून मी खुश झाले, मागे फिरले ,तो पुन्हा चिमण्यांचा थवा दाणे टिपायला  आला.चिमण्यांची चाहूल लागताच कुत्र्यांची झुंड पुन्हा मागे फिरली. पुन्हा आशा पालवल्या.पुन्हा दबा धरून राहिले. चिमण्या वर  झडप टाकणार… तेवढ्यात चिमण्या उडाल्या.आता मात्र कुत्रे मुक झाले.त्याच्या डोळ्यात आता भूक  दिसू लागली.मला त्याची कीव आली.मी पडले शाकाहारी. घरातल्या पावाचे तुकडे कुत्र्यांना टाकले.चिमण्याना  दाणे टाकले.

दोघे ही भूक भागवण्याचा आपला मार्ग सोडत नव्हते.रोजच हे हेच दृश्य बघत होते.

निसर्गत: आपलं रक्षण करण्याचे ,भूक भागवण्याचे सामर्थ्य सर्वाना बहाल केले आहे.तरी मझ्या मनात आले या कुत्र्यांना माणसांसारखी  बुध्दी असती तर….भूक भागविण्यासाठी, त्यांनी या चिमण्यांनसाठी जाळे टाकले असते.त्यात दाणे पेरले असते.अगतिक चिमण्या फसल्या असत्या,तडफडल्या असत्या.कुत्र्याची भूक भागली असती.पण एवढी बुध्दी निसर्गाने कुत्र्याला दिली नाही,हे बरेच झाले, नाही का?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments