मराठी साहित्य – विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग १ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे

☆ विविधा ☆ माळी पौर्णिमा – भाग १ ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

कोजागिरी पौर्णिमेला विदर्भ आणि मध्यप्रदेशातील काही आदिवासी भागात माळी पौर्णिमा म्हणतात.  यावेळी पावसाळी पीक तयार झालेले असते.

नवरात्र ते कोजागिरीचा हा काळ सुगीचा हंगाम साजरा करण्याचा आणि रब्बी हंगामासाठी बियाणे निवडण्याचा आणि तयार करण्याचा असतो.  लोकांच्या घरी आनंद असतो आणि कामाची धांदलही असते.

दस-यापासून कोजागिरीपर्यन्त झाबुआ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात शंकर आणि पार्वती रात्री वस्तीला येतात अशी समजूत आहे.  त्यांच्यासाठी अंगणात ऊसाची, धानाची किंवा  ज्वारीची मंडपी तयार करतात.  त्या मंडपात  मऊ गवताची बिछायत घातलेली असते.  गवताची उशी,  लोड,  तक्के केलेले असतात,  काही घरी झूलाही बनवलेला असतो. त्यामध्ये शंकर पार्वती,  गणपती, कार्तिकेय, नंदी असा सर्व परिवार बनवलेला असतो.  एक भाग शेण आणि चार भाग माती हे प्रमाण घेऊन हा परिवार तयार केला जातो.

या मंडपी रोज नाना प्रकारच्या फळा फूलांनी सजवतात.  विशेष म्हणजे त्या मंडपीवर छोट्या छोट्या पणत्याही मांडलेल्या असतात.  त्या पणत्यांना दिवणाल म्हणतात. दस-यापासून पौर्णिमेपर्यन्त रोजच त्या सूर्योदयाच्या वेळी  ताज्या ताज्या बनवल्या जातात.

दस-याच्या म्हणजे पहिल्या   दिवशी 5, त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी कमीत कमी 4 दिवणाल.. असे पौर्णिमेपर्यन्त करतात.  नवसाच्या असल्या तर जास्तीही बनवतात. त्या दिवसभर वाळवून रात्री त्यात दिवे लावून आरास करतात.  त्यासाठी करंजीचे तेल वर्षभर साठवलेले असते.

अगदी 2000 साली सुध्दा तिथल्या कितीतरी पाड्यात वीज घेतलेली नव्हती पण माळी मंडपी आणि त्यावरच्या दिव्यांची आरास मात्र प्रत्येक घरात सजलेली असे.

घरातली आणि शेजारची  सर्वजण त्याच्यासमोर बसून गातात आणि फेर धरतात.  ही गाणी साधारण भूलाबाईच्या गाण्यासारखीच असतात.

मंडपीचा रोजचा नैवेद्य  म्हणजे रोटया आणि भाजी. ही भाजी मुख्यतः पालेभाजी किंवा कंदभाजी,  पण ही पाचही दिवस वेगळया ठिकाणावरून गोळा करुन आणायची असते.  म्हणजे कधी अंगणात उगवलेली,  शेतातली,  पाण्यातली,  रानातली, अशा प्रकारची.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी,  आपापल्या घरच्या मंडपी घेऊन सर्व लहानथोर जवळपास असलेल्या नदीकाठच्या देवळात  जमतात.

तिथे सगळे जण मिळून स्वैपाक करतात.  स्वैपाक म्हणजे भात, आमट, बरा म्हणजे डाळीचे वडे,  मक्याच्या रोट्या,  गोड पदार्थ  म्हणजे कणकेचा लचका. लचका म्हणजे गव्हाची रवाळ कणिक दळून ती भरपूर तूपात खमंग भाजतात आणि घोटून घोटून अगदी मऊ थुलथुलीत शिरा करतात.

बायका आणि मुली रानफूलांच्या माळांनी सजलेल्या असतात. लहान मुले गणपती आणि कार्तिकेयाच्या रुपात असतात.   एखादे नवसाचे मूल नंदीसारखेही सजवलेले असते.  मोठी म्हणजे टिनेजर मूले भूतगण बनतात.  सगळीकडे नुसती धमाल असते.

फूलांची  आकर्षक सजावट केलेल्या मंडपी मध्यभागी ठेवून त्याच्या वर सर्व दिवे लावतात.   उरलेले दिवे मंडपींच्या भोवतीने वर्तुळाकार 2-3 ओळीत लावलेले असतात.

सर्वप्रथम शंकर पार्वतीला त्यावर्षीच्या पाऊस पाणी आणि शेतातल्या पिकांबद्दल निवेदन केले जाते.  त्या वर्षभरात समाजात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी  देवाला सांगितल्या जातात.

त्यानंतर जमलेल्या स्त्रिया आणि पुरूष .. यांच्या गटांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करत गाणी म्हटली जातात.  ही गाणी खूपच गंमतीदार असतात,  त्यामध्ये शंकर पार्वतीच्या भांडणाच्या आणि रुसण्याच्या आणि  चंद्र,  गंगा,  गणपती आणि कार्तिकेयाच्या यांच्या खोड्यांच्या… अशा कथा असतात.

त्यातली एक कथा तर मला फारच आवडली.

(ही कथा उद्याच्या भागात वाचूया)

क्रमशः ….

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈