सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
विविधा
☆ माझा श्रावण.. ! ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
आषाढातल्या ‘नभ मेघांनी आक्रमिले ‘ झालं की, श्रावणातलं देखणं रूप घेऊन पाऊस येतो त्याच्या म्हणजे श्रावणांच्या स्वागताची दिव्याच्या अमावस्येला दीप पूजनाने सुरुवात होते अन आषाढाची सांगताही सगळ्यां घराला प्रकाशमान करून मनंही प्रकाशमान झालेलं असतं या प्रकाशातच वाळ्यांचा रुणुझुणु नाद करीत श्रावण नाचत, लाजत, बागडत, असा प्रथम आपल्या मनात घरात रिमझिमत येतो श्रावणंधारांनी!… मनं प्रसन्न होऊन जात. जाई जुईचे झेले सुवासाने दरवळतात आणि तसा तो एकटा येत नाही तर, प्रत्येक दिवसाचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या सणावारांची संगत -पंगत घेऊन या ढगाळ ओल्या दिवसांना उत्साहाची रंगत देत असतो. मग सुरू होतो ऊन -पावसाचा खेळ लप्पा छप्पीच ती जणू !
— हळदुल्या उन्हाच्या या
पावसात येरझारा |..
ऊन पावसाचा खेळ
असा श्रावण साजरा |..
या खेळातच आजही मंगळागौरीचे रंगलेले खेळ, दारातल्या निंबोणीला टांगलेल्या दोरखंडाच्या झोक्यांवर मैत्रिणींबरोबर घेतलेले झोके – मनाचा झुला उंच उंच नेतात. नागपंचमीला माईच्या म्हणजे आईच्या हातची, गरम-गरम पुरणाची दिंडी, वर घरी कढवलेल्या तुपाची धार, जेवताना आम्ही भावंडांनी लावलेली जास्तीत जास्त दिंडी खाण्याची लावलेली पैज, मेहंदीने रंगलेले हात, मोरपंखी रंगाच्या सोनेरी वरखाच्या बांगड्यांची किणकिण, नवकोर जरीच परकर पोलक, अन् नंतर साडी, हाताने बनवलेले गोविंद विडे, रात्री जागून माई बरोबर केलेल्या केवड्याच्या वेण्यां केसात माळल्यावर घरभर पसरलेला केवड्याचा सुगंधी दरवळ, नागपंचमीचे गाणे म्हणत धरलेला फेर, फुगडी, झिम्मा असे मनसोक्त खेळलेले खेळ !
माझ्या माहेरी वालचंदनगरला फार मोठी बाग म्हणजे फुलझाडे दारात लावलेली नव्हती. रंगीबेरंगी तेरडा, आघाडा, दुर्वा, गणेश वेल, जाई ही मात्र श्रावणांत असायची. निळ्या, पांढऱ्या गोकर्णाचे वेल, प्राजक्त अंगणात होता. श्रावणी सोमवारी श्री महादेवाला लक्ष-फुले वाहण्यासाठी मग लवकर उठून फुलं वेचायची आणि सगळ्या भावंडांनी आपापल्या भांड्यातला फुलांचा वाटा मोजून माईला द्यायचा. मग बाकीच्या फुलांचे हार, गजरे करायचे. थोडी फुले शेजारी द्यायची आणि त्यांच्याकडून कर्दळीची, सोनचाफ्याची फुलं आणायची. श्रावणांत उपवासाची पण एक मालिकाच असते. सोमवारचा शंकराचा, शुक्रवारचा जिवतीचा उपवास आम्ही माईबरोबर सगळेच करायचो. दादांबरोबर शनिवार आणि गुरुवार. ! हे उपास तसे आमचे जेवण करून फक्त खिचडी, भगर, शेंगादाण्याची आमटी आवडते म्हणून खाण्यासाठीच बरेच वेळा असायचे. वालचंदनगरला गोकुळाष्टमीला देवळात श्रीकृष्ण जन्म साजरा व्हायचा. भजन, कीर्तन, प्रसाद असायचा. तसं तर श्रावणात रोज कुठल्या ना कुठल्या गल्लीमध्ये भजन कीर्तन असायचं. पहायला ऐकायला आम्हाला आवडायचं. देवळाच्या प्रांगणात दहीहंडी व्हायची.
सकाळी सकाळी पत्री गोळा करून आणताना मैत्रिणींचा ग्रुप असायचा. शाळेत जाण्यापूर्वी हे एक महत्त्वाचं काम असायचं. नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, असे एकामागून एक येणारे सण खाण्याची अन् श्रावणांची रंगत वाढवायचे.
– डोंगरावर वसलेलं शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळगाव. तेथील महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. माझी आत्या शिंगणापूरला असायची. एकदा नागपंचमीला मी तिथे होते. डोंगर माळावर असंख्य वारुळे आहेत. तिथे पूजेला घरातील स्त्रिया व मैत्रिणींबरोबर मी गेले होते. नागचौकिला म्हणजे नागोबाच्या उपवासाच्या दिवशी तिथे गिरीला जाण्याची पद्धत आहे. म्हणजे-महादेवाच्या डोंगराला सबंध प्रदक्षिणा घालून कडे कपारीत असलेल्या शिवपार्वतीच्या पिंडींच- शाळुंकांचं दर्शन घेतलं होतं.. तिथून निघालेल्या झऱ्यासारख्या झुळूझुळू वाहणाऱ्या भागीरथीचं दर्शन घेतलं होतं. तिथेच बसून फराळ केला होता. उपवासाच्या फराळाची ती अंगतपंगत मस्त जमली होती.
या गिरी भ्रमणाचा रस्ता म्हणजे एक खडतर मार्ग आहे. तरी बरोबरीच्या मैत्रिणी, काही बायका, मुले यांच्यामुळे, शंकर पार्वती, राम सीता यांची गाणी म्हणत पायाखालची डोंगरवाट ऊनं उताराला लागल्यावर संपली. पाय दुखतात हे जाणवलेच नाही. श्रावणांतला तो एक खूप सुंदर दिवस किंवा योग पुन्हा आला नाही याचे मात्र वाईट वाटते. अन् – – आता तर तो दिवस स्वप्नवत वाटतो. नातवंडांना सांगायला ही छानशी गोष्ट आहे एवढंच !
असा – – आठवांच्या शिंपल्यात..
झुले माहेरचा झुला..
त्या आनंद क्षणांचा..
असे श्रावणं आगळा||
श्रावण म्हटलं की श्री सत्यनारायण पूजा, फुले, पत्री, दूर्वा, बेल अन् सुगंधी केवड्याशी नकळत छानसे बंध जुळून गेलेले आहेत. आज कुंडीतली थोडीशी फुले असली तरी फुलपुडा पत्री घेताना आठवते, लग्नानंतर दौंडला आमच्या रेल्वे कॉर्टरच्या प्रशस्त अंगणात आम्ही दोघांनी दारासमोर फुलवलेली बाग !
जाई, जुई, कृष्ण कमळाचे वेल विविध रंगी तेरडा आणि विविध रंगांची गंधांची फुलंझाडे ही सगळी हिरवाई श्रावणांत अगदी फुलून यायची. मग मंगळागौर, सत्यनारायण पूजेला दोन ओंजळी भरून फुलं, पत्री कर्दळीचे खुंट, शेजारीपाजारी देताना एक आगळाच आनंद असायचा. दारी फुललेल्या फुलांचे भरगच्च गजरे, लांब सडक केसांच्या दोन वेण्यांवर माळून, फुलराणीच्या दिमाखात मिरवणारे आमची सोनुली लेक.. !
असा माझ्या मनातला श्रावण पिंगा घालू लागला की, आठवांच्या सरीवर सरी डोळ्यांतल्या श्रावणसरीं बरोबर गालांवर रिमझिमतात.
-गावाकडचा रानातला श्रावण तर खूप विलोभनीय. सोनेरी किरणांनी चमचमणारी हिरवाई, पावसाच्या सरींची नादबद्ध रिमझिम, निसर्गाने आभाळभर कोरलेलं इंद्रधनुष्य, आनंदाने कलकलाट करत येणारी सूर्याची किरणे, पाऊस अंगावर घेत स्वैरपणे उडणारी पाखरं …. ही सगळी अपूर्वाई रम्य काव्यमयच. ! दिवसभर रानात कष्ट करून दमलेल्या बायका रात्रीच्या वेळी नागोबाची, राम सीतेची गाणी म्हणून खूप छान फेर धरतात, उखाणे घेतात. ते पाहताना ऐकताना व अनुभवतांना मला आमच्या गावचा निसर्गाच्या सान्निध्यातला श्रावणही मनाला खूप आनंद देऊन जायचा.
आपलं वयं वाढत जातं तसं पावसात भिजणं आपण कमी करतो. तरी श्रावणातल्या रेशीमधारात, एक तरी गिरकी घ्यावी… वयाबरोबर आपल्या वाढलेल्या मनाला पुन्हा टवटवीत करण्यासाठी… जगण्यातला आनंद पुन्हा पुन्हा घेण्यासाठी…
अशा माझ्या श्रावणांत…
चाफा सुगंध उधळे..
मोर फुलवी पिसारा
ओल्या श्रावणाचा झुले
माझ्या मनी फुलोरा.. !
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈