सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ मकर संक्रांत… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
हिंदू संस्कृतीतील इंग्रजी तारखे प्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे ‘ मकर संक्रांत ‘. पौष महिन्यातला हा महत्त्वाचा सण. संक्रमण याचा अर्थ ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे. संक्रांतीच्या सण म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे असे म्हणायला हरकत नाही. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने, निसर्गाशी, शेतीशी, पर्यावरणाशी, आयुर्वेदाशी निगडित असणारा असा हा उत्सव आहे. 22 डिसेंबर पासून सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात झाली तरी, सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, संक्रमण करतो तो दिवस 14 जानेवारी. मकर संक्रांत ही सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी दर आठ वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. आणि 15 जानेवारीला तो सण उत्सव साजरा केला जातो. मकर राशीतील प्रवेशानंतर सूर्याचे तेज वाढत जाते. दिवसाचा काळ मोठा आणि रात्रीचा काळ लहान व्हायला सुरुवात होते. संपूर्ण देशभर हा उत्सव किंवा सण साजरा केला जातो. पौराणिक, भौगोलिक, अध्यात्मिक, संस्कृतिक, ऐतिहासिक अशा सर्व दृष्टीने या सणाचे महत्त्व आहे. पुढे येणाऱ्या रथसप्तमी पर्यंत तो साजरा केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशानुसार या सणाची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात ‘संक्रांत, ‘ तामिळनाडूमध्ये ‘पोंगल’, कर्नाटक आणि केरळ मध्ये ‘संक्रांति’, उडपी भागात ‘संक्रमण, ‘ तर काही ठिकाणी या दिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली म्हणून त्यास ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. तसेच शेतात धान्याची कापणी चालू असते म्हणून ‘कापणीचा सण’ असेही म्हणतात. तेलुगु लोक त्याला ‘बेंडा पाडुंगा ‘, तसेच बुंदेलखंडात ‘सकृत ‘, उत्तर प्रदेश बिहारमध्ये खिचडी करून ती सूर्यदेवाला अर्पण करून दानही दिले जाते, त्यामुळे या दिवसाला ते ‘खिचडी ‘असेच म्हणतात. हिमाचल आणि हरियाणा मध्ये ‘मगही ‘ आणि पंजाब मध्ये ‘लोव्ही, ‘ मध्यप्रदेशात ‘सक्रास, ‘ जम्मूमध्ये ‘उत्तरैन ‘, काश्मीरमध्ये ‘ शिशुर सेन्क्रांत ‘, आसाम मध्ये ‘ ‘भोगाली बिहू ‘असे म्हणतात. ओरिसामध्ये आदिवासी लोक या दिवसापासून नवीन वर्ष सुरू करतात. केरळमध्ये तर हा उत्सव ७, १४ २१ किंवा ४० दिवसांचाही करून, संक्रांती दिवशी त्याची सांगता करतात. गुजरात मध्ये आजही तिळाच्या लाडू मध्ये दान घालून, गुप्त दान देण्याची प्रथा आहे. तसेच तेथे पतंग उडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामागील शास्त्र म्हणजे पतंग उडविण्यासाठी मैदानात जावे लागते. आणि आपोआप सौरस्नान घडते. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. त्या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या ही खूप महत्त्व आहे. संपूर्ण देशभर हा सण साजरा होत असल्याने विविधतेत एकता (युनिटी इन डायव्हर्सिटी )आणणारा असा हा सण आहे असे म्हणायला हरकत नाही. केवळ भारतातच नाही
तर थायलंड, लाओस, म्यानमार येथेही हा सण साजरा करतात. या दिवसानंतर हळूहळू ऋतूतही बदल होतो.
सूर्याचा (पृथ्वीचा) धनु रास ते मकर रास या प्रवासाच्या काळाला ‘धनुर्मास ‘ किंवा ‘धुंधुरमास ‘ म्हणतात. (१३ डिसेंबर ते १३ जानेवारी). मकर संक्रांतीचा आदला दिवस ‘भोगी’ हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस. या काळात एक दिवस पहाटे स्वयंपाक करून उगवत्या सूर्याला नैवेद्य दाखविला जातो. संक्रांतीचा तीन दिवसांचा उत्सव असतो. भोगी, संक्रांत, आणि किंक्रांत.
भोगी दिवशी सुगडाच्या (मातीचा घट) पूजेला महत्त्व असते. मातीचे नवीन घट (दोन किंवा पाच) आणून त्यामध्ये छोटी बोळकी (ज्याला चिल्लीपिल्ली म्हणतात.) ठेवून, या ऋतूत आलेले घेवडा, सोलाणा, गाजर, ऊस, बोरं, गहू, तिळगुळ असे जिन्नस त्यात भरून ते देवापुढे ठेवून त्याची पूजा करतात. एका सुपामध्ये बाजरीचे पीठ, कांदा, शेंगा, मुंगडाळ, वांग, वस्त्र, विड्याची पानं, दक्षिणा, सुपारी, इतकच नाही तर स्नानासाठी, खोबरेल तेल, शीकेकाई, असे सर्व ठेवून ते स्नानापूर्वी सुवासिनीला वाण (भोगी) देण्याची पद्धत आहे. त्या दिवशीच्या स्वयंपाकात तीळ लावून बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, खिचडी, सर्व भाज्या एकत्र करून मिक्स भाजी, (त्या भाजीला लेकुरवाळ म्हणतात) भरपूर लोणी, दही असा आरोग्यदायी थाट असतो.
यानंतरचा मुख्य दिवस ‘संक्रांत’. या दिवसाची एक पौराणिक कथाही सांगतात. संक्रांत देवीने शंकरासुर दैत्याचा वध केला. तो हा आनंदाचा दिवस मानला जातो. संक्रांति म्हणजे ‘ सम्यक क्रांती’. क्रांती मध्ये हिंसेला महत्त्व असेल, पण सं – क्रांतीमध्ये, मानवी मनाचे संकल्प बदलण्याचा विचार असतो. संक्रांती म्हणजे ‘संघक्रांती ‘. प्रत्येकाने मुक्त, आनंदी जीवन जगणाऱ्या लोकांशी संघयुक्त होऊन षड्रिपूं पासून दूर राहण्याचा संकल्प करायला हवा, असा एक विचार आहे. संक्रांती म्हणजे ‘संघक्रांती, ‘संघे शक्ति कलौयुगे’. संघामध्ये शक्ती विपुल प्रमाणात एकत्र आल्याने कठीण कार्यही सहजगत्या पार पडते. हा सण- उत्सव लोकांना जोडण्याचे काम करतो. म्हणून आनंद, सुसंवाद आणि ऐक्य तसेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग (तमसोमा ज्योतिर्गमय ) असा मानला जातो. या दिवशी रात्र आणि दिवस समसमान असतात. हळूहळू नंतर दिवस मोठा व्हायला लागतो आणि रात्र लहान व्हायला लागते.
संक्रांतीला तीळ (स्नेह ) गुळ (गोडी) याला महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसात रुक्ष झालेल्या शरीराला स्निग्धतेची आणि उष्णतेची गरज असते. ती गरज भागवणारे तीळ आणि गूळ हे सर्वोत्तम खाद्य आहे. या दिवशी तीळयुक्त पाण्याने स्नान करतात. अध्यात्मानुसार तिळामध्ये इतर तेलांपेक्षा सत्व लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने, सूर्याच्या संक्रमण काळात साधना चांगले होते. तिळाचे तेल पुष्टीप्रदही असते. या दिवशी ब्राह्मणांना तीळ दान, आणि शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे लावतात. पितृश्राद्ध करून, तिलांजली देऊन, तर्पण करतात. तिळामुळे असुर श्राद्धात विघ्न आणत नाहीत अशी समजूत आहे. जेवणात गुळाच्या किंवा पुरणाच्या पोळ्या हे मुख्य पक्वान्न असते. आप्तेष्टांना तीळ- गुळाची वडी- लाडू देऊन, ” “तिळगुळ घ्या गोड बोला” असे शब्द उच्चारले जातात. तिलवत वद स, स्नेह गुडवत मधुरं वद/ उभयस्य प्रदानेन स्नेहवृद्धी: चिरंभवेत “अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. काही जण पुण्यकाळाच्या मुहूर्तावर सूर्य देवाला आर्घ्य देऊन, आरती करून, सूर्य मंत्र (चांगल्या भविष्यासाठी २१ किंवा १०८ वेळा पठण करतात. पूजेच्या वेळी काही भाविक १२ मुखी रुद्राक्ष धारण करतात. त्यामुळे चेतना व वैश्विक बुद्धिमत्ता बऱ्याच पातळ्यांपर्यंत वाढून कामे यशस्वी होतात, असा समज आहे. शनिदेव मकर राशीचे स्वामी असल्याने जप, तप, ध्यान अशा धार्मिक क्रियां नाही महत्त्व आहे.
नवीन लग्न झालेल्या मुलीला सासरचे लोक काळी साडी, हलव्याचे दागिने आणि तिळगुळ आणतात. तसेच जावयाला हार. गुच्छ वाटीत ( चांदी किंवा स्टील ऐपतीप्रमाणे) तिळगुळ घालून देतात. त्याचप्रमाणे लहान बाळालाही, काळे कपडे व हलव्याचे दागिने घालून बोरन्हाण घालण्याची प्रथा आहे. कोणी कोणी बाळ पाच वर्षाचा होईपर्यंत दरवर्षी बोरन्हाण घालतात. दिवस थंडीचे असल्याने, काळ्या रंगाने उब येत असल्याने काळे कपडे घालण्याची प्रथा असावी. तसेच काळ्या रंगाची वस्त्रे नेसून काळोख्या मोठ्या रात्रीला निरोप दिला जातो.
भगवान विष्णूनी राक्षसांचा वध करून, त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरून टाकली. त्यामुळे नकारात्मकता दूर झाली. त्याचे प्रतीक म्हणून, “तिळगुळ घ्या गोड बोला” असं म्हणून अबोला, नकारात्मकता, राग, द्वेश दूर व्हावेत असे विचार केले जातात. या दिवशी गंगा, गोदावरी, प्रयाग, अशा नदीस्नानाचे महत्त्व जास्त आहे. तरी त्यातही, अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ यासारखे पुण्य संक्रांतीला गंगासागराच्या स्नानाने प्राप्त होते असे समजतात. या दिवशी गंगा स्नान करून दानधर्म केल्यास चांगले फळ मिळते.
वैदिक पंचांगानुसार यावर्षी १४ जानेवारी मंगळवार रोजी ९ वा ३ मी. यावेळी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे. गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त ९ वा. ३ मि. ते ५ वा ४६ मी. पर्यंतचा आहे. यावर्षीचा शुभकाळ ८ तास ४२ मिनिटे तर पवित्रकाळ १ तास ४५ मिनिटे आहे. या काळात सूर्यदेवाची पूजा करावी. यावर्षीचे संक्रांत देवतेचे वर्णन असे केलेले आहे की, तिचे वाहन वाघ, आणि उपवाहान घोडा असून, तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. तिच्या हातात गदा हे शस्त्र असून, कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारी व बसलेली स्थिती आणि वासासाठी जाईचे फुल घेतलेले आहे. ती पायस प्राशन करत आहे. सर्प जातीची असून तिचे भूषण – अलंकार मोत्याचे आहेत. वार आणि नक्षत्र नाम ‘महोदरी’ असे आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असून वायव्य कडे पाहत आहे. संक्रांतीच्या पर्वकाळात खोटं, कठोर बोलू नये. गवत, वृक्ष तोडू नये. गाई म्हशींची धार काढू नये. दान करताना नवीने भांड, गोग्रास, अन्न, तिळगुळ घालून पात्र, भूमी, सोन, वस्त्र यथाशक्ती दान करावे. सूर्याच्या उत्तरायाणात मृत्यू आल्यास मोक्ष मिळतो, अशा समजुतीने भीष्मानीही बाणाच्या शैयेवर पडून उत्तरायणाची वाट पाहिली. आणि नंतर संक्रांतीच्या दिवशी देवांना आपला देह दान केला. म्हणून दानाला महत्त्व जास्त आहे. संक्रांतीची सर्व माहिती काल महात्म्यानुसार होणाऱ्या बदलाला अनुसरून असते. हा दिवस भूगोल दिन असून कुंभमेळा प्रथम शाही स्नान दिवस असा आहे.
संक्रांतीच्या दुसरा दिवस किंक्रांत. या दिवशी देवीने किंकरासुर राक्षसाला
ठार मारले. या दिवसाला ‘करी दिन ‘असेही म्हणतात. भोगी दिवशी पूजा केलेली सुगडी या दिवशी हळदीकुंकू देऊन दान देतात. तसेच भोगीला केलेली बाजरीची भाकरी झाकून ठेवून यादिवशी खाण्याची पद्धत आहे.
संक्रांतीच्या अशा शुभ, पवित्र आणि गोड दिवशी सर्वांना शाब्दिक तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणूया.
“भास्करस्य यथा तेजो/ मकरस्थस्य वर्धते/
तथैव भवतां तेजो वर्धतामिती कामये/
मकर संक्रांती पर्वण: सर्वेभ्य: शुभाशया://
ज्याप्रमाणे मकर राशीतील प्रवेशाने सूर्याचे तेज वाढते, त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, आरोग्य, धनधान्य रुपी तेज वाढविणारी ठरो.
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈