श्री मानसिंगराव कुमठेकर
☆ विविधा ☆ मिरजेत मुद्रीत झाली जगातील पहिली भगवद्गीता ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर ☆
२१५ वर्षांपूर्वी झाले मुद्रण,
एकमेव प्रत मिरजेत,
अमूल्य राष्ट्रीय ठेवा
जगभरात ज्या भगवद्गीतेतील विचारांचा अभ्यास केला जातो, ती भगवद्गीता पहिल्यांदा मिरजेत 1805 साली मुद्रीत झाली. 215 वर्षांपूर्वी देशात मुद्रीत झालेल्या पहिल्या भगवद्गीतेची एकमेव प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाचे संस्थापक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात आहे. भारतीय मुद्रण कलेचा तो एक अमूल्य ठेवा आहे.
शेकडो वर्षांपासून भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांच्या दृष्टीने भगवद्गीता हा महत्त्वाचा ग्रंथ मानला गेला आहे. कुरूक्षेत्रावर कौरव-पांडवांमध्ये झालेल्या युध्दावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं तत्त्वज्ञान या गीतेमध्ये आहे. त्यामुळे शेकडो वर्षे भगवद्गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग बनला आहे.
मुद्रणपूर्व काळात याच्या अनेक हस्तलिखीत प्रती तयार झाल्या. मात्र, ही गीता सर्वसामान्यांना सहजप्राप्य नव्हती.
पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय राजकर्त्यांच्या आगमनानंतर देशात मुद्रणकलेला प्रारंभ झाला. सुरूवातीला हे मुद्रण मराठी भाषेत पण, रोमन लिपीत असे. 1805 च्या सुमारास बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देशातील पहिले देवनागरी मुद्रण करीत ‘ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज’ प्रसिध्द केले. त्यानंतर काही वर्षातच अनेक देवनागरी ग्रंथ मुद्रीत झाले. पण, त्यामध्ये भगवद्गीतेचा समावेश नव्हता.
याच काळात पूणे येथे सवाई माधवरावाच्या दरबारात असणाऱ्या इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने नाना फडणवीसाचे सहकार्य घेऊन देवनागरी छपाईचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, नाना फडणवीसाच्या मृत्यूनंतर तो प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, मॅलेट याने ज्या तांबट करागीराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले होते. त्याला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीता कोरून घेतली. आणि तिच्या काही प्रती मुद्रीत करून घेतल्या. त्या ब्राम्हणांना दान देण्यात आल्या. सन 1805 साली मिरजेत भगवद्गीतेचे हे पहिले मुद्रण झाले. तोपर्यंत जगात कुठेही भगवद्गीता छापील स्वरूपात उपलब्ध नव्हती. त्यामुळे भगवद्गीतेच्या छपाईबरोबरच देवनागरी मुद्रणाचा हा प्रयोग देशाच्या मुद्रण क्षेत्रात क्रांती घडविणारा ठरला.
मिरजेत 215 वर्षांपूर्वी मुद्रीत झालेल्या देशातील या पहिल्या भगवद्गीता ग्रंथाची एकमेव प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या मानसिंगराव कुमठेकर संग्रहात आहे. एकूण 166 पृष्ठांच्या या गीतेच्या शेवटी मुद्रणाच्या स्थळ काळाला उल्लेख केला आहे. मिरजेचा उल्लेख ‘मार्कंडेय मुनीक्षेत्रे’ असा केला असून ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा कालोल्लेख आहे. शके १७२७ म्हणजे इसवी सन १८०५ होते. देशातील पहिले देवनागरी मुद्रण असलेली ही प्रत पाहण्यासाठी देश-विदेशातून काही अभ्यासकांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाला भेट देऊन त्याची माहिती घेतली आहे.
215 वर्षांपूर्वी मिरजेत मुद्रीत झालेल्या देशातील पहिल्या भगवद्गीतेची माहिती रोचक आहे. देशात मुद्रीत झालेल्या या पहिल्या भगवद्गीतेची एकमेव प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात असून तो अमूल्य असा राष्ट्रीय ठेवा आहे.
© मानसिंगराव कुमठेकर, ( मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५)
© श्री मानसिंगराव कुमठेकर
मिरज
मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈