श्री मानसिंगराव कुमठेकर
☆ विविधा ☆ मिरजेतील एकमुखी दत्तमूर्तींची ऐतिहासिक परंपरा ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर ☆
मिरज आणि म्हैसाळमध्ये एकमुखी दत्तमूर्ती
निरंजन रघुनाथांनी सुरू केली परंपरा
मिरज तालुक्यात एकमुखी दत्तमूर्ती असलेली तीन ऐतिहासिक मंदिरे आहे. उत्तर पेशवाईत मिरजेत आलेल्या निरंजन रघुनाथ या थोर दत्तभक्तांनी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिरात एकमुखी दत्तांची मूर्ती स्थापना केली. त्यानंतर म्हैसाळ आणि मिरजेत अशाच पध्दतीच्या हुबेहुब मूर्ती अन्य दत्तभक्तांनी स्थापन केल्या. एकमुखी दत्तांच्या या मूर्ती दुर्मिळ असून, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मिरज आणि म्हैसाळ येथील एकमुखी दत्तमंदिरात दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात.
पेशवाईच्या उत्तर काळात निरंजन रघुनाथ नावाचे थोर दत्तभक्त होऊन गेले. त्यांनी गिरनार पर्वतावर कठोर तपश्चर्या केल्यानंतर साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले, असे सांगण्यात येते. हे दर्शन सहा हस्त आणि एकमुख अशा स्वरूपाचे होते. निरंजन रघुनाथांनी दत्तभक्तीपर काही ग्रंथ आणि काव्यात्मक रचना केल्या. पुढे रघुनाथ निरंजन हे मिरजेत आले. त्यावेळचे मिरज संस्थानचे अधिपती श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन (दुसरे) यांनी त्यांना आश्रय दिला. निरंजन रघुनाथांनी मिरजेत मठ स्थापना केली. सध्याच्या अंबाबाई तालीमसमोर शिराळकर (बेकरीवाले) यांच्या वाडय़ात आजही हा मठ आहे.
निरंजन रघुनाथांचा अनुग्रह श्रीमंत बाळासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी सन 1853-54 मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या माधवजी मंदिरात दत्त मंदिर बांधले. या मंदिरात निरंजन रघुनाथांच्या हस्ते काळ्या पाषाणातील एकमुखी दत्तांची सुंदर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली. ही मूर्ती त्याकाळी मिरजेच्या पंचक्रोशीत प्रसिध्द होती. निरंजनबावांनी सन 1855 मध्ये मिरजेत कृष्णानदीत जलसमाधी घेतली. त्यांचे पुत्र योगीराजबावा यांना श्रीमंत बाळासाहेबांनी जमिन इनाम दिल्या होत्या. मिरज किल्ल्यातील या दत्तमंदिर स्थापनेसंदर्भातील आणि निरंजनबावांच्या मुलांना दिलेल्या इनामाबाबतची कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.
निरंजबावांच्या हस्ते स्थापन झालेली किल्ल्यातील दत्तमूर्ती पाहून तत्कालीन अन्य दत्तभक्तांनीही त्याच कारागिराकडून हुबेहुब अशा मूर्ती तयार करवून घेतल्या. या तीनही दत्तमूर्तींना एक मुख असून, सहा हात आहेत. या सहाही हातांपैकी दोन हातात विष्णूंची शंख आणि चक्र ही आयुधे, शिवाची डमरू आणि त्रिशुल ही आयुधे आणि ब्रम्हाचे कमंडलू आणि माळ अशी रचना आहे. पायात खडावा आहेत. मूर्तीभोवती कोरीव नक्षीकाम असलेली सुंदर प्रभावळ असून, त्यावर मध्यभागी कीर्तिमूख आहे.
मिरजेतील भुईकोट किल्ल्याच्या बाहेर उत्तर बाजूला असणाऱया मोकळ्या मैदानात दत्तभक्त असणाऱ्या वेदमूर्ती सीतारामभट आपटे यांनी 1881 सालच्या माघ शुध्द पंचमीला एकमुखी दत्त मूर्तीची स्थापना केली. किल्ल्याच्या मैदानातील मंदिर म्हणून त्याला ‘मैदान दत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.
याच काळात मिरजेजवळच असणाऱ्या म्हैसाळ गावातील देवल नामक दत्तभक्ताने आपल्या घरालगत एकमुखी दत्तमूर्तीचे मंदिर बांधले. त्यामुळे मिरज तालुक्यात 19 व्या शतकात एकसारख्या दिसणाऱ्या तीन एकमूखी दत्तमूर्ती होत्या. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत. सन 1948 साली मिरज संस्थान हे स्वतंत्र भारतात विलीन झाले. त्यानंतर मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराच्या आवारात असणाऱ्या दत्तमंदिरातील एकमुखी मूर्ती स्थलांतरीत करण्यात आली. सध्या मैदान दत्त मंदिर आणि म्हैसाळ येथील दत्त मंदिरात या मूर्ती पहावयास मिळतात.
एकमुखी दत्तमूर्ती या महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळतात. मैदान दत्त मंदिरात नैमित्तिक कार्यक्रमांबरोबर कार्तिक महिन्यात होणारा दीपोत्सव प्रेक्षणीय असतो. दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा होतो. पूर्वी येथे राज्यातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकारांची प्रवचने होत असत. या मंदिराचे शतकमहोत्सव आणि शतकोत्तर रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले होते.
© श्री मानसिंगराव कुमठेकर
मिरज
मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈