सौ. शशी नाईक-नाडकर्णी
☆ विविधा ☆ मन ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
मन उधाण वा-याचे गूज पावसाचे
शंकर महादेवनच्या ह्या गाण्याचे सूर कानावर पडले. किती छान गाणं, आवाज, आशय. आणि विचार आला, मन किती छोटा, सरळ शब्द. ज्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार, नाही. पण त्यात किती काहीही सामावण्याची शक्ती आहे.
खरंच त्याचा वेग किती आहे?क्षणात इकडे तर क्षणात आणि कुठे भरकटेल त्याचा नेम नाही. त्याला कुठलेच बंधन नाही. थोडाफार आपण लगाम घातला तरच.
बहिणाबाईच्या भाषेत सांगायचे तर आता होते भुईवर गेलं गेलं आभाळात. त्या मनाला फिरायला त्रिखंड पण कमीच.
त्याला फिरायला स्थळ, काळ, वेळ कसलं बंधन नसतं. कघी ते बालपणीच्या रम्य आठवणीत रमतं तर कधी ते तारुण्यातील स्वप्न पाहतं. सासुरवाशीण कधी मनाने माहेरी आईच्या कुशीत शिरेल. तर एखादी माऊली परदेशी असलेल्या आपल्या वासराकडे मनानेच फेरफटका मारून येईल. 5, 6वर्षाच्या मुलाला बॅट कशी धरायची ते शिकवताना एखादा बाबा आपला मुलगा सचिन झाल्याचे मनात चित्र रंगवेल. मनाच्या भरा-या मोठ्या असतात. जिवाला थोड्या वेळासाठी का होईना सुखावणा-या असतात.
मनांत काय सामावत नाही? राग लोभ प्रेम, इर्षा, द्वेष. सकारात्मक, नकारात्मक विचार. आणि एकदा का ह्या मधला कोणत्याही प्रकारचा विचार आला की मग ते त्याच्या पाठपुरावा करतच. अशावेळीच त्याला लगाम घालण्याची आवश्यकता असते.
मन असले तरी ते इतर अवयवां सारखे दिसत नाही. पण खूप नाजूक असते. म्हणून जपावे लागते. आपले आणि समोरच्या व्यक्तीचे. एकदा का ते दुखावले गेले तर कितीही फुंकर मारली तरी सुखावणं कठीण असतं म्हणून शब्द आणि कृती जपून विचारपूर्वक करावी. जो समोरच्याच मन जपतो, जिंकतो तो खरा माणूस.
आपलं स्वतःचे मन पण आपल्या शरीरासारखंच जपायचं असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. ‘ मी शरीर कमावलं, मेनटेन केलं’ तसच मानसिक संतुलन सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. बाहेरुन छान मेकअप केला आणिचेहरा ओढून ताणून हसरा ठेवला, पण मन दुःखी असले तर तो आनंद तात्पुरता. जीवनातील आनंद हा मनस्थितीत अवलंबून असतो. त्यात जास्त नकारात्मक भावनांना थारा द्यायचा नसतो. त्या साठवणं तर दूरच. मनाची पाटी ताबडतोब पुसून टाकायची. नाहीतर मानसिक, शारीरिक दोन्ही त्रास होतात. आपल्याला, स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना. परिणामी वातावरण बिघडवून सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. आठवणी पण चांगल्या गोष्टीच्या ठेवायच्या.
या मनांत एखादा काळजीचा, चिंतेचा किडा शिरला कि मग संपलचं. तो मन आणि त्याच्या बरोबर शरीर पण पोखरुन कमकुवत करतो. येणा-या प्रत्यक्ष संकटापेक्षा मन कल्पनेनेच भयानक चित्र रेखाटत आणि त्या विचाराच्या डोहात खोल खोल जाते. आणि त्रास करुन घेते. त्याला वेळीच लगाम घातला पाहिजे.
हे मन कधी, कुठे, कोणात, केवढे गुंतवायचे त्यावर प्रत्येकानी नियंत्रण ठेवायला पाहिजे. आपण आपल्या मुलांमध्ये गुंततो. कधीकधी जरुरीपेक्षा जास्त. मग त्यांच्याकडून अपेक्षा पण जास्त ठेवतो. त्याचा त्यांना पण त्रास होतो आणि अपेक्षा पूर्ण नाही झाल्या कि आपल्या मनाला त्रास होतो. आपण मनाने एखाद्याला आपले मानण्याआधीच त्याला पारखून घ्यायचे. नाहीतर त्याच्याकडून पण आपल्या भावनिक अपेक्षा पूर्ण न झाल्याने मानसिक त्रास होतो.
त्या मनाला कसे, कुठे, किती वळवायचे
काय मनांत ठेवायचे, काय सोडून द्यायचे
ह्याची सुंदर योग्य ती शिकवण आपल्याला समर्थानी मनाचे श्लोकाद्वारे दिली आहे.
आपण मनांने खूप स्वप्न रंगवतो ती योग्य वेळीच पूर्ण होतात. आंणि जर नाही झाली तर सोडून द्यायची असतात. ती नाही झाली कारण ती न होण्यातच आपलं हित आहे असा सकारात्मक विचार करायचा.
सुखी समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असावे समाधान!
© सौ. शशी नाईक-नाडकर्णी
फोन नं. 8425933533
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
आपलं ‘मन ‘ आवडलं. खूप चांगलं लिहिता. लिहीत रहा.