☆ विविधा ☆ माझे फराळ प्रयोग ☆ श्री विनय माधव गोखले ☆
यंदा दिवाळीत बायकोला for a change फ़राळ ‘खाण्यासाठी’ नव्हे तर ‘बनवण्यासाठी’ मदत करावी असे ठरवले होते. खार्या शंकरपाळ्याला मदत कर असे बायकोने सुचवले. ह्याचे कारण असे सांगण्यात आले की ह्या पदार्थाला शक्ती जास्त आणि कौशल्य कमी लागते. ह्या निकषावर माझी निवड होणे थोडे मानहानिकारक असले तरी त्यामुळे हिरमुसून न जाता अब्राहम लिंकनने एका रस्ता झाडणार्या कर्मचार्याला सांगितलेले वाक्य मी मनामध्ये स्मरले. लिंकन साहेब त्याला म्हणाले होते की “रस्ता पण असा स्वच्छ कर की पाहणार्याने म्हणावे, “वा, रस्ता काय छान झाडलाय!”
उत्साहाने पोळपाट-लाटणे घेऊन अस्मादिक फ़रशीवर ठाण मांडून बसले. मैदा मळून त्याचा गोळा मला सुपूर्द करण्यात आला. पहिल्यांदाच मैदा लाटत असल्याने एक छोटा गोळा बाजूला काढून दोन्ही हाताने मळून चकती करून लाटायला घेतला. कणकेपेक्षा मैद्याला थोडा जास्त जोर लागतोय असे जाणवले. एकदम परफ़ेक्ट गोल लाटून बायकोला चकित करावे असा माझा प्लान होता. त्यामुळे थोडा हलक्या हात वापरत होतो. पण गोल हा एकमेव आकार सोडून इतरच भलतेसलते आकार त्यामधून उदयास येऊ लागले, उदा. अमीबा, पॅरॅमॅशियम, हत्ती, डायनासॉर, भारताचा नकाशा इ.इ. एकदा तर चीनी ड्रॅगन मला वाकुल्या दाखवू लागला. ह्यावर मात्र माझे देशप्रेम उफ़ाळून आले आणि मी ताबडतोब ती पोळी त्वेषाने गोळामोळा करून पुन्हा लाटायला घेतली. पहिली पोळी लाटून बायकोला दाखवल्यावर ती म्हणाली “अरे किती जाड लाटलीस, जास्तीत जास्त पातळ लाट ना!” असे म्हणून थांबली नाही तर तीच पोळी स्वत: ५० टक्क्याने वाढवून दाखवली. “तुला शिकवण्यापेक्षा ना, मीच लाटले तर काम लवकर होईल!” असे कुणीतरी पुटपुटले परंतु हे वाक्य मी ऐकून न ऐकल्यासारखे केले.
नंतर कातण्याने त्यावर पटापट उभ्या-आडव्या रेषा मारायला शिकलो. हे मात्र काम सोपे आणि मजेशीर वाटले. पण इथे उलटी समज मिळाली की हलक्या हाताने कातण फ़िरवावे म्हणजे पोळपाटापासून विलग करायला त्रास पडत नाही. बायकोने मी काढून दिलेले शंकरपाळे तळायला घेतले. आसमंतात छान सुवास दरवळायला लागला. सुरवातीच्या चुकांनंतर जरा वेग पकडता आला आणि साधारण दीड तासानंतर सर्व शंकरपाळे तयार झाले.
दिवाळीत पाहुण्यांना फ़राळ देताना बायकोने माझ्या नावाचा कवतिकाने उल्लेख केल्यामुळे अस्मादिक धन्य-धन्य जाहले!!?
© श्री विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈