विविधा
☆ मेंदू वापरा, नाहीतर विसरा…भाग 1 ☆ सुश्री मंगला जोगळेकर ☆
(इतर काही बारीकसारीककाम करतानाही असे व्यायाम करता येऊ शकतात.)पासून पुढे
या दोघांनी सुचवलेले काही व्यायाम –
– आज रात्री उजव्या हातानं दात घासण्याऐवजी ते डाव्या हातानं घासून बघा. त्यानंतर तुम्हाला असं जाणवेल, की मेंदूला या क्रियेकडे लक्ष द्यावं लागलं, कारण हे काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळं होतं, नवीन होतं.
– हातानं जेवण्याऐवजी कधी काट्यानं/चॉपस्टिक्स वापरून जेवा.
– जेवणात कधी न चाखलेल्या पदार्थाचा समावेश करा आणि त्यांचा आस्वाद घ्या.
– रोजच्या रस्त्यावर चालायला न जाता वेगळ्या मार्गानं जा.
– कुणाच्या घरी किंवा इतर कु ठे जाऊन आल्यावर त्या ठिकाणी जाण्याचा नकाशा कागदावर तयार करा.
– मनातल्या मनात छोटेमोठे गुणाकार, भागाकार करा. शक्यतो कॅल्क्युलेटर न वापरता हिशेब करा.
– टी.व्ही.वर बघत असलेल्या मालिके ची गोष्ट आपल्या शब्दात लिहा. गोष्टीचा पुढील भाग आपल्या शब्दात आधीच मांडा.
या सगळ्यातून मेंदू जागृत होऊन त्या क्रियेकडे लक्ष दिलं जाईल आणि त्यामुळे लक्षात राहाणंही आपोआप होईल. वर सांगितल्याप्रमाणे दर वेळी मेंदूचे व्यायाम आपल्याला न पचणारे, न रुचणारे करण्याची काहीच आवश्यकता नसते. ते आवडीचे असले तरच ते करावेसे वाटतील. जितक्या वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकत जाऊ तितका मेंदू आपल्याला साथ देत जाईल, याचाही तुम्हाला अनुभव येईल. अर्थातच शिकण्याचं महत्त्व आपल्याला पटून त्यामध्ये आपलं मन घालायला पाहिजे हे साहजिकच आहे. तरीही कुठल्याही व्यायामांमुळे मेंदू विचाराधीन राहिला का? ताजंतवानं वाटलं का? हे मात्र जाणीवपूर्वक बघायला हवं.
एकाच प्रकारचे व्यायाम सदोदित करणाऱ्यांच्या मेंदूला पुरेसा व्यायाम मिळेलच असं नाही. उदा. जे शब्दकोडं तुम्ही दहा, पंधरा मिनिटांत सहज सोडवू शकाल, जे सोडवणं तुमच्या हातचा मळ असेल, त्यातून तुम्हाला झालाच तर अत्यल्प फायदा होईल. त्यामुळे एकाच वर्तमानपत्रातील शब्दकोडं पुरेसं आव्हानात्मक नसेल, तर दुसऱ्या वर्तमानपत्रातील कोडं सोडवा. ‘कोडीमास्टरां’ना कोडी सोडवण्याऐवजी स्वत:ची कोडी तयार करून एक वेगळंच आव्हान मिळेल. एकाच प्रकारची कोडी सतत सोडवण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणं केव्हाही चांगलं. त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी आव्हानं मिळतील. ‘सुडोकू’तून मिळणारं आव्हान शब्दकोड्याहून वेगळं असेल, तर बुद्धिबळातून, ब्रिज खेळण्यातून मिळणारं आव्हान आणखी वेगळं असेल. हल्ली वेगवेगळ्या कोड्यांसाठीची अॅप्स मोफत उपलब्ध असतात. त्यांचाही उपयोग करता येईल.
मेंदूला वेगवेगळे व्यायाम देऊन स्मरणशक्तीवर्धन करणाऱ्या ‘वेब पोर्टल्स’ची सुरुवात होऊन अमेरिकेत आता एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. याची सुरुवात विविध रुग्णालयांनी केलेल्या स्मरणवर्धन कार्यक्रमांतून झाली असं म्हणता येईल. ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिम अशा विविध कार्यक्रमांमधून स्मरणशक्तीच्या विषयाबाबत जागृती वाढण्याचं मोठं काम तिथे झालं आहे. परंतु आपल्याकडे हा विषय नवीन होता. आपली पार्श्वभूमी लक्षात घेऊन सगळ्यांना आवडतील, रुचतील असे मेंदूचे व्यायाम घ्यावेत अशी कल्पना मनात रुजली. डिमेंशियाला शक्य तेवढं दूर ठेवायला हवं हे उद्दिष्ट त्यापाठीमागे होतं. या विचारानं पुणे येथे २०१४ मध्ये राज्यातील बहुधा पहिला ‘मेमरी क्लब’ चालू करण्याची संधी मिळाली. आज पुण्यात बऱ्याच ठिकाणी असे क्लब सुरू आहेत. नाशिकमध्येही ते सुरु झाले आहेत. मेमरी क्लब्समध्ये आठवड्यातून एकदा एकत्र जमून मेंदूसाठी आनंददायी व्यायाम (एक्सरसाइज) घेतले जातात.
टाळेबंदीच्या काळात या क्लब्सनी व्हॉट्सअॅपवरून आपलं काम चालू ठेवलं. त्यावरून स्फूर्ती घेऊन असे अनेक ‘व्हॉट्सअॅप मेमरी क्लब’ स्थापन झाले. आज महाराष्ट्राच्या विविध भागांतील जवळपास २,००० व्यक्ती अशा क्लब्सशी जोडल्या गेल्या आहेत. क्लबमुळे होणारे अनेक फायदे सभासद नमूद करतात. त्यामधील प्रमुख फायदे असे आहेत- आत्मविश्वास वाढतो, मनामधील नको ते विचार बंद होतात, मेंदूला सतत खाद्य मिळतं, नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचा आनंद मिळतो, नवीन शिकणं होतं, नवीन ओळखी होतात, इत्यादी. बरेच सदस्य आपल्या ऐंशी वर्षांवरील पालकांनाही हे एक्सरसाइज सोडवण्यात सहभागी करून घेताना दिसतात. यातील काही जण तब्येत बरी नसतानाही एक्सरसाइज सोडवण्याचा आनंद घेतात. सहलीला गेल्यावर, घरात जेवणाच्या टेबलावर एक्सरसाइजच्या चर्चा रंगतात, असंही दिसतं.
हे क्लब्स वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे ते चालवण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. केवळ त्यांच्याच सहकार्यावर क्लब्सचं काम चालू आहे. खरंतर मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी सुरू झालेली ही एक चळवळ आहे. या पुढाकारातून ‘एक्सरसाइजेस’चं तयार झालेलं वैविध्य केवळ अनोखं म्हणायला हवं. अर्थात हे काम पुढे जायचं तर उत्साही मंडळींची कार्यकर्ते आणि सदस्य म्हणून आवश्यकता आहेच. मेंदूला कायम ‘फॉर्मात’ ठेवण्यासाठी त्याला नियमित खाद्य देणं अतिशय महत्त्वाचं आहे. वर्षभरात महिनाभर व्यायाम केला तर जसा शरीराला व्यायामाचा फायदा होणार नाही, तसंच वर्षभरातून चार आठवडे मेंदूला व्यायाम देऊनही तो पुरेसा होणार नाही. चार-आठ दिवसांत मेंदूला ‘सुपर पॉवरफुल’ करणारी पुस्तकं, गोळ्या आणि इतर कार्यक्रमांचा फोलपणा यावरुन लक्षात यावा. मेंदूचं कुतूहल वाढवून त्याला जागृत ठेवणं हा नित्यक्रमाचाच भाग व्हायला हवा.
मग करायची का सुरुवात? आजच्या मेंदूच्या अभ्यासासाठी काही सोपे प्रश्न खाली देते आहे. ते जरूर सोडवून पाहा.
‘च’ आणि ‘क’ ही दोन्ही अक्षरं असलेले शब्द लिहा. (उदा. चूक, चकवा)
आकाश, आभाळ या शब्दांशी नातं सांगणारे किती शब्द तुम्ही सांगू शकाल?
‘प्यार’ हा शब्द असलेल्या किती हिंदी चित्रपटांची नावं तुम्हाला आठवतात?
तुमचा आवडता एक खेळ, गोष्ट, वस्तू यांपैकी कशाचीही तुमच्या परदेशातील नातीला तुम्ही कशी ओळख करून द्याल?
तुम्हाला आठवतेय का लहानपणी वापरात असलेली जुन्या कपड्यांमधून बेतलेली पिशवी? बाहेर जाताना ती पटकन खिशात कोंबली तर कधीही तिचा वापर करता यायचा. आता आधुनिक वातावरणात पिशवी हा शब्दही हद्दपार झाला आणि तिची ‘डिझाइनर बॅग’ झाली. या पिशवीचा पूर्वीपासून आतापर्यंतचा प्रवास शब्दांत टिपा; नाहीतर तिचं स्थित्यंतर चित्रांमध्ये पकडा. शाळेतल्या निबंधांचे विषय असायचे तसं ‘पिशवीचं आत्मवृत्त’चं जणू!
घरात वा मित्रमंडळींमध्ये असे प्रश्न तुम्हीच तयार करूनही एकमेकांना सोडवायला सांगू शकाल. अंतिमत: मेंदू तल्लख राहाणं हाच आपला उद्देश आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करणं तुमच्याच हातात आहे.
© सुश्री मंगला जोगळेकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈