विविधा
☆ मॅटिनीचे दिवस ☆ श्री प्रकाश लावंड ☆
मॅटिनीला लागलेले चित्रपट बघणे, हा त्या काळात एक अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता. त्यात एक कैफ असायचा. तो आम्ही पुरेपूर अनुभवला. त्याचे पडसाद आणि आठवणी, वयाच्या साठीतही निश्चित उर्जा देणाऱ्या आहेत.
साधारण ४०-५० वर्षांपूर्वीचा हा कैफ आज आठवताना एक जाणवते की, केवळ चित्रपट, नट नट्या इतकेच मर्यादित नव्हते. ते तर असायचेच; पण त्याही सोबत इतर अनेक गोष्टी होत्या. आज मॅटिनीचा काळ इतिहास जमा झाला आहे. पण गोठवलेले ते क्षण अजूनही ताजे आहेत.
तसे कुणाचेही चित्रपट चालत; पण खरा सम्राट होता देव आनंद. शिवाय राज कपूर, दिलीप कुमार, राजेंद्र कुमारही अनेकदा भेटत,,,शम्मी कपूर हा तर एक्का होता. सी.आय.डी, नौ दो ग्यारह, उजाला, तुमसा नही देखा, हमराही, ससुराल इत्यादी अनेक चित्रपट मॅटिनीला पाहिले.
त्या स्वप्नभारल्या शाली अंगावर घेऊन दिवस फुलपाखरासारखा जायचा. हा तो मॅटिनीचा काळ!
हा सगळा काळ भन्नाट गाण्यांचा होता. भगवान दादांचा ‘अलबेला ‘ देव आनंद चा’ असली नकली’ राजकपूरचा ‘श्री420’ दिलीप कुमार चा ‘कोहिनूर ‘ या चित्रपटांच्या गाण्यांवर पडद्यावर पैसे उधळले जात. प्रेक्षक पडद्यासमोर डान्स करीत, एक “”बघणेबल सीन” असायचा.
मुळात थिएटर मधील चित्रपट ही संस्कृतीच आता संपली आहे. प्रेक्षकांचा सहभाग, दाद देण्याची पद्धत हे जवळपास नाहीच.इंटरव्हल झाल्यावर येणारा थंड पेयांच्या बाटल्यावर ओपनर फिरवल्यावर येणारा आवाज आता नाही, गरम शेंगांचे कोन नाहीत. इंटरव्हल संपल्यावर वाजणारी घंटा,,, आतला मायावी काळोख, पडदा सरकल्यावर येणारा आवाज, सगळे अजून कानात साठवलेले आहेत. हा कैफ मल्टीप्लेक्स मध्ये नाही, का नाही सांगता येत नाही. मॅटिनीचं एक वेगळेपण होतं, अगदी प्रांजळपणे सांगायचं तर चित्रपट साक्षरता वगैरे प्रकार त्याकाळी नव्हते. होते फक्त “एक वेडेपण”,,
आज सगळे बदलले आहे, टीव्ही, मोबाईल वर चित्रपट आहेत. एकपडदा थिएटर जाऊन मल्टीप्लेक्स आले, आणखी एक संस्था संपली,, काळाबाजारवाले हा देखील एक अविभाज्य भाग होता. या सगळ्या संस्कृतीचा!! खरं तर मॅटिनीला काळाबाजार नसायचा. त्यामुळे सिनेमा बजेट मध्ये साजरा व्हायचा ;;
डोअरकीपर इतका स्थितप्रज्ञ माणूस सापडणे अवघड. उशीरा येणाऱ्या प्रेक्षकांना बॅटरीचा प्रकाश पाडून सीट दाखवली जायची. आपल्या सीटचा वेध घेत बसल्यावर उशीरा आलेल्या प्रेक्षकाचा एक प्रश्न ठरलेला, “‘किती वेळ झाला सुरू होऊन?”” या प्रश्नाला काही अर्थ नसायचा. शेजारचे उत्तर देखील तेच असायचे “”आत्ताच टायटल संपली”” या सगळ्या उपाशी पोटीचे (अनेक वेळा ) हे आख्यान म्हणजे “मॅटिनी”.
सिनेमाच्या आठवणी अनेकरंगी आहेत, मॅटिनी त्यातील एक छटा, केवळ माझ्याच नव्हे तर अनेक रसिकांच्या आणि विविध गावांच्या छटा आहेत. उद्या सिनेमा चा इतिहास लिहिला तर “मॅटिनीचा ” उल्लेख नक्की असेल.
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.
मोबा 9021497977
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈