श्री सुहास रघुनाथ पंडित
विविधा
☆ महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
श्रावणातील इंद्रधनुच्या कमानीखालून पुढे सरकत सृष्टीने भाद्रपदाच्या अंगणात पाऊल टाकलेले असते. कॅलेंडरवरील ऑगस्ट चे पान बाजूला सारून सप्टेंबरचे पान झळकू लागते. एकीकडे ऑगस्ट महिन्याला टा टा बाय बाय करत असताना दुसरीकडे ‘कम सप्टेंबर’ चे स्वर ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असतात. हे स्वर हवेत विरतात ना विरतात तोच लेझिम, झांज पथके सरावासाठी बाहेर पडतात आणि अवघा परिसर दुमदुमवून टाकतात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सक्रीय होतात आणि पावती पुस्तकाना पाय फुटून घराघरांचे उंबरे झिजवू लागतात. गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवणा-या मूर्तीकारांची लगबग चालू असते. इकडे गौरी बरोबर घरात प्रवेश मिळावा म्हणून गौरीची रोपे दाटीवाटीने उभी असतात. प्रत्येक फुलझाडाला बहर आलेला असतो. जरा बाहेर नजर टाकली तर पांढ-या, पिवळ्या, तांबड्या, निळ्या, गुलाबी अशा विविध रंगांनी बागा, माळरान नटलेले दिसतात. श्रावणातील उरलेल्या जलधारा अंगावर ऊन घेण्यासाठी अधूनमधून येत असतात. अशा या मंगल वातावरणात श्रीं चे आगमन होते. आरत्या आणि भक्तीगीतांचीचढाओढ सुरू होते. अकरा दिवसांचा मुक्काम आटोपून, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्विकारून, गणराय लाटांवर आरूढ होऊन बघता बघता दृष्टीआड होतात. सजावटीची टेबले आणि भिंती रिकाम्या करताना मन उदास होत असते.
या भाद्रपद म्हणजेच सप्टेंबर महिन्यात असे काही दिवस असतात ज्यांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्व आहे. आपण पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाळतो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची पुण्यतिथि असते. 14 सप्टेंबर 1949 ला हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून आपल्या संसदेने मान्यता दिली. तेव्हापासून 14 सप्टेंबर हा हिंदी दिन आहे. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करून भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे स्मरण आपण करत असतो. शिवाय 17 सप्टेंबरला पारंपारिक पद्धतीने विश्वकर्मा दिनही साजरा होतो. मराठी माणसासाठी महत्वाची घटना म्हणजे मराठवाड्याची निजामशाहीतून मुक्तता. तो दिवस ही 17 सप्टेंबर हाच आहे. याशिवाय शेगावचे संत गजानन महाराज यांची पुण्यतिथि व संत मुक्ताबाई यांची जयंती भाद्रपद महिन्यातच असते.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सप्टेंबर महिन्यात काही दिवस विशेष म्हणून साजरे केले जातात. चांगल्या उत्पन्नाद्वारे गरीबी कमी करणा-या नारळाच्या पिकाचे महत्व जाणून 2 सप्टेंबर हा नारळदिन म्हणून साजरा केला जातो. सप्टेंबर 12 हा पालक दिन, 15 हा लोकशाही दिन, 16 हा ओझोन दिवस, 18हा बांबू दिवस असे साजरे होत असतात. उद्देश एकच, त्या त्या विषयाचे महत्व सर्वांना समजावे व तिकडे लक्ष वेधून घ्यावे. याप्रमाणेच सप्टेंबर 22 हा कॅन्सर पेशंट कल्याण दिन, 23 सप्टेंबर विषुव दिन, 26 हा कर्णबधीर दिन व पर्यावरण रक्षण दिन तर 27 सप्टेंबर हा पर्यटन दिन म्हणून ओळखला जातो. अशा विविध कारणांसाठी दिवस साजरे करून समस्या, वैशिष्ट्ये, आठवणी यांकडे विशेषत्वाने पाहिले जाते.
सणासुदीचे दोन महिने यथेच्छ ताव मारून श्रावण, भाद्रपद… ऑगस्ट-सप्टेंबर… आता जरा सुस्तावलेले असतात. आनंदाचे एक पर्व काही काळासाठी थांबलेले असते. त्यातून बाहेर पडताच स्मरण होते ते पूर्वजांचे. पितरांचे पुण्य स्मरण करून त्यांच्या शांती मिळावी साठी प्रार्थना आणि त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा व्यक्त करण्याचा पितृपंधरवडा श्रद्धेने पाळला जातो. सर्वपित्री अमावस्येची रात्र संपून नवरात्रीचा जागर करण्यासाठी मन पुन्हा उभारी घेते आणि सर्व अनिष्टांचे उल्लंघन करण्यासाठी दस-याच्या सोनेरी सणाची वाट पहात असते.
© सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈