सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर
कवितेचा उत्सव
☆ मोहोरला बहावा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆
चैत्रमहिना आला कि.. निसर्गाच्या रंगपंचमीला उधाण येतं.पळस, पांगारा, करंजा, सावरी, कुडा यांच्या जोडीला बहावा फुलतो.जसा गेले आठ-दहा महिने समाधिस्थ असलेला मुनी समाधी अवस्थेतून जागृत व्हावा तसा हा बहावा फुलतो.
सोनसळी लावण्याने हा सजतो.याची फुले म्हणजे स्वर्णफुलेच.अंगांगावर या कळ्याफुलांचे साज.लेवून हा राजवृक्षएखाद्या सम्राटा प्रमाणे आपल्या ऐश्वर्याने सर्वांचे मन मोहित करतो. हीस्वर्णलेणी इतकी झळाळत असतात कि सूर्याचे तेजच प्राशन करून उमलली आहेत असे वाटावे.यालाकर्णिकार म्हणतात. तसेच अमलतास असेही संस्कृत भाषेतम्हणतात.
बहावा हा वृक्ष आठ ते दहा मीटर पर्यंत वाढतो. पाने संयुक्त व समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.बहाव ही सदहरित असून वर्षावनात आढळणारी पानझडीची वनस्पती आहे.
बहावा पूर्णपणे भारतीय वनस्पती आहे.
बहाव्याच्या द्राक्षाच्या झुपक्यांसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘Golden shower tree’ म्हणून ओळखला जातो.
बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.
फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात बिया असतात.हा वृक्ष बहुपयोगी आहे.
उपयोग पुढील प्रमाणे
१ कर्णिकाराच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते.
२ बहाव्याची साल कातडे कमावण्यासाठी उपयुक्त आहे.
३ शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.
४ बहाव्याचे लाकूड अत्यंत टणक असून ते वजनाला जड असते. शेतीची अवजारे, चाके, टेबल, खुर्च्या तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आदिवासी स्त्रिया याच्या फुलांची आणि कळ्यांची भाजी करतात.
..Cassia Fistulal (कॅसिया फिस्टुला) हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. पिवळाधम्म एक सारखा फुललेला, नाजूक पाकळी, डोळ्यांना सुखावणारा सोनसळी पिवळा रंग, पोपटी रंगाची पाने आणि मध्ये झुलणाऱ्या करड्या रंगाच्या शेंगा एवढा मिलाफ क्वचितच इतरत्र पाहायला मिळेल.नवरीला नटवावे आणि हळद ल्यालेल्या अंगाने तिने अकृत्रिम लाजावे तसा दिसतो बहावा. बहावा फुललेला असताना त्याला नववधूच्या हळदीच्या हातांना हिरव्याकंच चुड्याची शोभा किती मोहक असते ना तशी शोभा येते बहाव्याला दांडीवर वर थोडे जास्त आणि खाली कमी कमी होत निमुळते होत गेलेले घोसच्या घोस लटकलेले असतात. जणूस्वर्गलोकीची झळकती स्वर्णझुंबरेच. शेवटच्या टोकावर न उमललेल्या चार पाच कळ्या.नाजूक पाकळी आणि मिटून बसलेली कळीही. विशेष म्हणजे या देठावर एकही पान नाही आणि असंख्य घोस उलटे टांगल्यागत झुलत असतात वार्याच्या झुळकीने सोबत जातात इकडून तिकडे. डोळ्यांना अत्यंत सुखद अनुभव येतो बहाव्याच्या दर्शनाने.भारतातल्या काही क्षेत्रात महावृक्ष रूपात दिसतो. याचेखोड पांढरट असते.एरवी हेझाड ओळखूही येणार नाही. पण वसंतराजाच्या जादूई किमयेने याच्या अंतरीचे सौंदर्य खुलून येते एप्रिल ते मे महिन्यात. मला हा फुललेला बहावा “लेकुरवाळा” वाटतो.
अगदी विठू माझा लेकुरवाळा असाच.कारण याच्या फुलां मधील मध चाखण्यासाठी कीटक, मुंग्यां, मधमाशां याच्या़ अवती भवती, अंगाखांद्यावर खेळतात.बहावा मात्र यांचा दंगा, रुंजी घालणं असा कौतुक सोहळा स्वतः शांत बसून बघतो. बहावा फुलल्यानंतर साधारण४०-४५ दिवसात पाऊस येतो, असे म्हणतात. भारतात बहुतेक सर्वत्र बहावा आढळतो. पिवळाधम्मक बहावा फुलल्यानंतर झाड गोलाकार पिवळ्या उघडलेल्या छत्री सारखा दिसतं. बहावा जणू थंडीत ध्यानस्थ होतो. बहाव्या ची पाने साधारणपणे एकमेकांसमोर असतात देठाला चिकटून, रंग नाजूक पोपटी असतो. पोपटी पानांआडून खळखळून हास्य करीत पिवळे घोस येतात एकामागून एक.फुलोरा साधारणपणे अर्धा हात लांब असतो. मे च्या शेवटच्या आठवड्यात शेंगा तयार होतात. शेंगा हातभर लांबीच्या असतात.खुळखुळा वाजतो तशा वाळल्यावर वाजतात.दक्षिण भारतात बहाव्याच्या फुलांना विशेष लोकप्रियता लाभली आहे. तिकडे या फुलांना सोन्याचे म्हणजेच वैभवाचे प्रतीक मानतात. त्याला ‘कणिपू’ असे म्हणतात. ‘विशूच्या’ सणाला घरातील ज्येष्ठ व्यक्ती सर्व सौभाग्य व संपत्तीच्या गोष्टींची आरास करतात त्यात बहाव्याची फुलेदेखील असतात. घरातील प्रत्येकाने झोपेतून उठताना डोळे उडताना ही आरास पाहिली की त्याचे संपूर्ण वर्ष सोन्यासारखे भरभराटीचे जाते अशी त्यामागे श्रद्धा आहे. केरळ या राज्याचे राज्यफूल ‘बहावा’ असून भारत सरकारच्या टपाल खात्याने बहाव्याच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीटदेखील काढले आहे.
वसंत राजानंमोठ्या कौशल्यानं आणि रसिकतेनं आपल्या लाडक्या वसंतलक्ष्मीला साजशृंगार करून नटवले आहे असेच या फुललेल्या बहाव्या कडे बघून वाटते.
निसर्ग आपला गुरु असतो.तसेच बहाव्याकडे पाहून मला वाटते, बहावा सांगतोय संकटाच्या काळातही हसत रहावे सर्व मानवांनी अगदी आनंदाने सामोरे जावे.कारण तीव्र उन्हाच्या झळा सोसून अग्नीत जसे सुवर्ण झळकते तसे या बहाव्याचे अंगांग सुवर्ण लेणी लेवून सजते.आनंदोत्सव साजरा करते या तीव्र उन्हातही!
☆ मोहोरला बहावा ☆
सोनवर्खी साज लेऊनी
बहावा मोहोरला वनी
कुसुम कळ्यांची कनकवर्णी
अंगांगावर लेऊनी लेणी
ऋतु रंगांची उधळण करुनी
राज वृक्ष हा शोभे वनी वनी
याचे फुलणे बहरुनी येणे
तप्त धरेवर सडे शिंपणे
अगांगातून तेज झळकणे
फुले बहावा अंतरंगातूनी
डोलती झुंबरे पुष्प कळ्यांची
पखरण जणू ही चांदण्यांची
वर्दळ येथे शत भुंग्यांची
हसे वसंत शत नेत्रांतूनी
तप्त उन्हाचा ताप साहतो
शीतल कौमुदी जणू पांघरतो
समाधानाचा मंत्रची देतो
वार्यासंगे हा दंग नर्तनी
फुललेला बहावा पाहून या काव्यपंक्ती सुचल्याशिवाय रहात नाहीत.
© वृंदा (चित्रा) करमरकर
सांगली
मो. 9405555728
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈