प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
🌸 जीवनरंग 🌸
☆ युगंधरा स्त्री शक्ती… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
अनादी, अनंत!
किती युगे, किती वर्षे लोटली! तरी मी आजतागायत आहे, तशीच आहे. कीती उन्हाळे, कीती पावसाळे, कीती ऋतु किती वर्षे, माझ्या पद स्पर्शाने तुडवली गेली, ते मलाच माहीत! पण मी आहे तशीच आहे, तिथंच आहे!
परिवर्तने बरीच झाली, किती तरी युगे, काळ रात्री शृंगारात गप्प झाली, पण माझ मूळ रूप हा स्थायी भाव झाला, आहे आणी तो तसाच राहणार ही काळ्या दगडावरची रेघ!
मी कुठे नाही ? जगात कुठल्याही प्रांतात जा मी असणारच. तिन्ही काळ अष्टौप्रहर माझं अस्तित्व आहेच की. माझ्या शिवाय ह्या जगाचे सुद्धा पान इकडचे तिकडे होणार नाही!
देवादिकांच्या काळापासून माझं अस्तित्व मी पुढे पुढे नेत आहे. संख्याच्या प्रकृती सिद्धांता पासूनच! त्यांच पण सदैव साकडं माझ्या पुढेच! मी त्यांचा बऱ्याच वेळा उद्धार केला. आज पण मी च सर्व मानवाचच नाहीतर, सर्व सृष्टीतील सर्व प्राणी पशु पक्षी जीवजंतु यांचं पण पोषण करतेय! किंबहुना मीच सृष्टी आहे. जगातील सर्व घटकावर माझीच नजर असते!
मला कोण आदिमाता म्हणतात, तर कोणी मोहमाया, तर कोणी आदिशक्ती, तर कोणी प्रकृती! माझं कार्य हे मी कधीच बदलेल नाही, बदलणार नाही, हे त्रिवार सत्य.
मी च ती “त्रिगुणात्मक” सृजनशील शक्ती. मी सृष्टी! मी धरा,
मी मेदिनी मी च पृथा! “मी माता,” मी अनेक प्रकारची “माती” मी स्त्री!, मी प्रजनन करणारी!. पालन,पोषण संगोपन, करणारी! मी जीवसृष्टीची निर्माती, मी
“माता ते मी माती” पुर्णस्वरूप जगत्रय जननी! विश्व दर्शन! देणारी. तमोगुणी असलेतरी, दीप, पणती उजळणारी ज्ञानाची ज्योत!
हो पण माझ्या काही सवयी आहेत, त्या मी पुर्ण करून घेण्यासाठी सर्व काही क्लुप्त्या वापरते. मी च हट्ट पुरवून घेणार ना ?
कोण नाही हो मी ? ऋतुनुसार माझे रूप पालटले जातात. मी प्रत्येक ऋतूत निराळीच असते. माझं सौंदर्य हेच माझं अस्त्र, माझ्या शिवाय तुमच्या जगण्यात पूर्णत्व येत नाही!
मी साज शृंगारा शिवाय राहू शकत नाही. मी च तर करणार ना साज शृंगार तो माझा निसर्गदत्त अधिकार! मी अवखळ कन्या, तरुणी, कल्याणी, प्रेमिका, अभिसरीका, मी भार्या, मी च ती, सर्व हट्ट पुरवुन घेणारी तो ही अगदी सहज पणे!
मी साज, मी दागिना, नटणे, लाजणे, मुरडणे, नखरा करणे. मनमुरादपणे हौस करून घेणारी. स्वर्गातील अप्सरा रंभा मेनका उर्वशी हे माझेच पूर्वज ना! माझेच रूप ना ?
मी च “सांख्य तत्वाची” प्रकृती! जड, अचेतन त्रिगुणात्मक, मोहमयी, गुढ, आगम्य, सर्वव्यापी, बीजस्वरूप कारण, मी सर्वत्र एकच आहे! स्वतंत्र स्वयंभु पण निष्क्रिय!
मी कोण! अस का वाटत तुम्हाला ? मी फुलात, पानात, फळात आहेच की. सुगंधच माझी ओळख.
विविध रंगाच्या आकाराची, फुले त्यांचं विविध गंध, वर्ण त्यांची झळाळी, हिरव्यागार झाडात वेलीत, त्यांचं मनमोहक रूप, तरीपण निष्क्रिय! माझे अस्तीत्व मृदुमुलायम स्पर्शात, कोकिळेच्या कंठात, पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात, गायीच्या हंबरण्यात, मयुर केकात!
आजचे माझे अस्तित्व, काळानुसार जरी सुधारले असले तरी, मी सगळीकडे आहेच की, माझा पोशाख माझं राहणीमान माझ्यातल परिवर्तनाचाच भाग आहे.
मुळात माझ्याकडे निसर्गाने जी दैवी शक्ती दिली आहे, तीच आदिशक्तीचे अधिष्ठान आहे. अधिक जबाबदारी निसर्गाने घालून दिली.
म्हणूनच देवादिकांच्या पासुन ते आजच्या मानवापर्यंत माझी स्तुती चालत आली आहे.
।। दुर्गे दुर्घटभरी तुझं वीण संसारी
अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी ।।
।। वारी वारी जन्म मरणा ते वारी
हरी पडलो आता संकट निवारी ।।
अशी आरती करून तुम्ही माझ्या स्त्रीत्वाचा सत्कार आक्ख जग अजुनी करतच की!
अनादी अनंत चार युगे उलटली! महिला आहे, म्हणुनच जग आहे, हे खरं! जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हा पासुन पूजनीय वाटु लागली ? पुर्वी ती पूजनीय नव्हती का ? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का! मग आजच नारीचा नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात, कुठला पुरुषार्थ आला बुवा ?
पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का ? पूर्वी इतकी स्त्री पुज्यनिय आता आहे असं वाटत नाही का ? बिलकुल नाही,पूर्वी जेवढी स्त्री पुजनिय होती, तेवढी आता नाही! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.
“यात्र नार्यस्तु पुज्यन्नते रमंते” ह्या विधानात सर्व काही आले, व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्ष्यात ठेवा. बस म्हटले की बसणारी उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे हातातील खेळणं आहे असं वाटत काय ?
हल्ली काळा नुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे, गरज शोधाची जननी! काळ बदलला नारी घरा बाहेर पडली कारण परिस्थितीच तशी चालुन आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणुन, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोरा गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषर्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागच चुल मुलं बाळंतपण पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच! त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य!
पुर्वीच्या काळात ही परिस्थितीला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला! आठवा त्या गोष्टी, पिठाची गिरणी नव्हती हाताने दळणकांडणच काय घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीच धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभत त्या विकुन घरार्थ चालवीत होत्या अजुनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती कामात पण स्त्रिया मागे नव्हत्याच! आता ही नाहीत.
मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की, नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना ? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषा बरोबरीने अंग मेहनत करत त्या अर्थार्जन करत होत्या!!!
लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा, असो वा कुलदैवत दर्शन, असो मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मानपानच होता. गौरवच सत्कार होता ना! प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना!
सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चांनाम्मा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीक च होती ना ?
काळ बदलला आस्थापना कार्यशैली बदलली. युग नवं परीवर्तन घेऊन आलं. नवं कार्याचा भाग पण बदलला तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार बलात्कार गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे! पूर्वी पेक्ष्या नारी सुरक्षित आहे का ?
कारण स्पष्टच, चित्रपट टेली व्हिजन येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे, पूर्वीही संघटीत होत्या, नाही असे नाही तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे!
तिच्या अस्मितेची लढाई अजून चालू आहे. प्रत्येक क्षेत्रांत स्त्री आहे, घर कुटुंबा पासून ते सैन्य भरती पर्यंत! मजल दरमजल करत ती पुढे पुढे जात आहे अलिकडेच खेडे गावात राहणारी राहीबाई पोपोरे पासून ते कल्पना चावला पर्यंत! अशी कित्येक उदाहरणे देता येतील. प्रत्येक क्षेत्रात स्वतःच्याअस्मितेवर तिने आघाडी घेतली आहेच. कोणतंही क्षेत्र तिने सोडलं नाही! तरीपण कैक पटीने ती तीच अस्तिव सिद्ध करत आहे. स्त्री जीन पॅन्ट घालो अगर नऊ वारी सहा वारी साडीत असो, मातृत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलीच ना ? गरीब असो वा श्रीमंत, घरात असो वा कार्यालयात तिला मुलाप्रति जिव्हाळा हा तसूभरही कमी झाला आहे का ?
साक्षात भगवान शंकरांनीही पर्वतीकडे भिक्षा मागितलीच ना.
।। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।।
ज्ञान वैराग्य सिद्धर्थम
भिक्ष्यां देही च पार्वती ।।
बघा हं गम्मत साक्षात भगवान शंकर, पार्वती कडे
भिक्षा मागतात!
काय म्हणतात हो ?
अन्नपूर्णे मला ज्ञान आणि वैराग्यासाठी भिक्षा घाल! भुकेसाठी ? हो भूक ही नुसती पोटाची नसते बर का! खर ज्ञान मिळण्यासाठी! भूक पण अनेक प्रकारची असतेच की! वैराग्य प्राप्तीसाठी पण! वैराग्य केव्हा प्राप्त होत ? तर विश्व दर्शन झाल्यावर. ही झाली देवादिकांची कथा त्यापुढे मानवाचे काय ? स्त्री शक्ती ही कालातीत आहे. असे असूनही तिच्यावरचे बलात्कार, स्त्रिभुण हत्या का थांबत नाहीत ?
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈