श्री उदय गोपीनाथ पोवळे

? विविधा ?

☆ रावण – दहन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

रावणाचे  मनोगत 

दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळताना हजारोंनी माणसं जमली होती. त्यामध्ये कितीतरी रावणच होते. एक दोघे राम होते पण हतबलतेने ते गप्प होते. लढवय्या राम मात्र एकही नव्हता. तो रामराज्यात फक्त सीतेच्या वाटेला आला होता. 

जळताना रावणाने मोठयाने ओरडून सांगितले—-” बघा तुमच्याच आतमध्ये डोकावून आणि करा हिशोब स्वतःच्या चारित्र्याचा.” 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच मर्यादेच्या सीमा नाही ओलांडल्या. कायम विचार केला तिच्या मानाचा. 

तुम्हीतर दिवसाढवळ्या नुसत्या वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडता, वर दिमाखाने मिरवत, सभ्यपणाचा बुरखा लावून मलाच जाळता. 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच विचार नाही केला तिच्या अत्याचाराचा.– निर्भयासारख्या कितीजणींना भक्ष्य केलय तू मानवा, कळस झाला आहे तुझ्या अविचाराचा.– विचार कर तुझ्यातल्या राक्षसाला जाळायचा. 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला जबरदस्तीचा. 

तुझ्यासारखा तूच नीच, जो जोर दाखवितो अबलांवरती आपल्या बळाचा. जरा तरी विचार कर त्यांच्या नाजूक मनाचा. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला आक्रमकतेचा. 

तू तर मान नाही राखत कुठच्याच स्त्रीचा, मानवा कधीतरी तूच खून कर तुझ्यातल्या दानवाचा. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा—-पण कधीच  नाही विचार केला तिच्या अपमानाचा. 

अरे मला जाळण्याआधी मानवा जरा स्वतःला विचार, हुंड्याच्या मोहापायी तू किती सीता जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात किती कळ्या मारल्या. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा— पण कधीच नाही विचार केला बीभत्सपणाचा.– 

तुम्ही तर करता चुराडा, न उमललेल्या फुलांचा आणि त्यांच्या भावी स्वप्नांचा. 

मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.

मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.—

कधी न कधी तुलाही भोगायला लागेल फळ आपल्या कर्माचे.

हो.. हो..शंभरदा सांगेन, हो.. हो.. हो. शंभरदा सांगेन,– केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा —-कारण मला रामाकडूनच पाहिजे होता मोक्ष मानाचा. 

मानवा तूच प्रयत्न कर स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा, मला जाळताना विचार कर–

स्वतःतला मी जाळण्याचा. 

स्वतःतला मी जाळण्याचा. 

स्वतःतला मी जाळण्याचा. 

रावणाच्या मनोगताला दिलेले मानवाचे उत्तर 

(दसऱ्याच्या दिवशी जळताना रावणाने मोठयाने ओरडून दिले स्पष्टीकरण आपल्या गुन्ह्याचे,  आणि मानवाला विचार करायला लावत  सांगितले-’ स्वतःतला मी जाळायला ‘-) 

त्यावर मानवाचे उत्तर ——–

हो.. हो, आहेत रावणा आमच्यामध्ये, वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडणारे,—-

पण त्याहूनही जास्त जण आहेत आपल्या जरबी नजरेनेच,  त्या समाजकंटकांना वठणीवर आणणारे.—- 

हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही निर्भयासारख्याना भक्ष्य करणारे—- 

पण त्याहूनही कितीतरी जण आहेत त्यांच्यासारख्या राक्षसांना लक्ष्य करणारे.—-  

हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही जण अबलांवरती जबरदस्ती करणारे—–

पण अनेक जण आहेत स्वतःच्या बळावरती, त्यांना फाशी देऊन जमीनदोस्त करणारे—- 

हो. हो, आहेत रावणा आमच्यात, काहीजण स्त्रीचा अपमान करणारे,—-

पण अनेक भारतपुत्र आहेत, सीमेवर आमच्याच माय लेकींची रक्षा करणारे—-

रावणा तू नको विचार करूस, 

रावणा…… तू नको विचार करुस—-  

आमच्यात राहून तुझ्या नातलगांनी हुंडयापायी किती सीता जाळल्या आणि गर्भात किती कळ्या मारल्या—–

त्याही पेक्षा जास्त आम्ही कितीतरी सीता वाचवल्या आणि उमलत्या कळ्यांना लक्ष्मी मानल्या.—-

रावणा,२६/११ च्या हल्ल्यात तुझ्यासारख्याच नराधमानी निरागसांचा नरसंहार केला—- 

तेव्हा आमच्यातल्याच असंख्य रामांनी सामोरे जाऊन त्यांचाच खात्मा केला—– 

रावणा लाज बाळग, 

रावणा लाज बाळग—-

स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देऊन, वर गमज्या मारतोस—

सीतेच्या अपहरणाचा गुन्हा करून–

मोक्ष रामाकडून मानाचा मागतोस—- 

तुझ्यासारख्या असंख्य रावणांना मारायला आता नाही गरज आमच्यातल्या रामाची,

तुझ्यासारख्या असंख्य दानवांना जाळायला आता—-

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments