सौ ज्योती विलास जोशी
विविधा
☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
एक रंगसंवेदना असते.आवडत्या रंगाला त्याच्या मनःपटलावर एक स्थान असतं. रंगीबेरंगी दुनियेतला तोच एक रंग त्या व्यक्तीला भावतो आणि आनंदही देतो.
‘रंग रंग के फुल खिले है भाए कोई रंग ना’ ह्या प्रेमिकेच्या ओळीतून तोच अर्थ प्रतीत होतो.’प्रेमरंगा’चा शोध घेत तिचे डोळे भिरभिरत असतात. नेमक्या परावर्तित होणाऱ्या किरणांच्या (प्रेमिकाच्या) शोधात ते असतात.आणि तसे एकदा झालं की मग,’ मुझे रंग दे, मुझे रंग दे’ असं म्हणत हर्षोल्हासात ती रंगून जाते.
लहानपणी इंद्रधनुष्यातले रंग ‘जातानाहीपानीपी’ असा ठेका धरून पाठ केलेले…..तेव्हाच मनांत आलं की या इंद्रधनुष्यात गोरा रंग कुठे आहे?धाडसानं तसं बाईंना विचारलं देखील होतं. विज्ञानाची शिडी धरून बाईंनी ‘सात रंग मिळून जो होतो तो गोरा म्हणजे पांढरा रंग.’ असही सांगितल्याचं आठवतंय. माझ्या बाल मनानं सोयिस्कर अर्थ असा लावला होता की सगळे रंग नसले की ‘अंधार’ म्हणजे काळा रंग…. मग या अंधाराला पारंब्या फुट्याव्यात तसा काळा रंग मला दिसू लागला आणि आठवली ती संत नामदेवांची गवळण… ‘रात्र काळी घागर काळी जमुना जळे ही काळी ओ माय’. … ‘देव माझा विठू सावळा’ या गाण्यातील सावळ्या रंगाचं सौख्यही विठूला पाहिल्यावर डोळ्यात भरलं. डोळे आणि मन सावळ्या रंगाचा शोध घेत घेत श्यामलसुंदर अजिंठा-वेरूळची लेण्या पर्यंत पोहोचलं. या स्त्रियांचं सौंदर्य सावळ्या रंगा व्यतिरिक्त आणखी कोणत्याही रंगानं खुललं नसतं हे मनोमन पटलं.
लोकसाहित्यात चंद्रकलेचा उल्लेख पैठणी पेक्षाही जास्त आढळतो. त्यातही तांबड्या चन्द्रकळेपेक्षाही काळी चंद्रकळा जास्ती रूढ…. त्या काळ्या चंद्रकळेतील नारी काळे मणी आणि काजळ यांनी खुलून दिसते. त्यात तिने काळी गरसोळ घातलेली असेल तर मग त्या श्यामलेचे वर्णन ते काय करावे?
विठ्ठलाला माउली म्हणत ज्ञानोबांनी’ रंगा येई वो’ अशी हाक मारली आहे. रंगांच्या यादीत काळ्यासावळ्या रंगाला अव्वल स्थान मिळालं ते त्यांच्या या हाकेनं…
‘निळा सावळा नाथ’ असे आपल्या पतीचे वर्णन करताना निळ्या रंगाच्या आडून सावळेपण दाखवताना नारीच्या भावनेतील शीतलता, घनता आणि गारवा जाणवतो. कृष्ण आणि विष्णू यांच्या सावळ्या रंगात निळसर रंगाची झाक आहे. निळ्या सावळ्या रंगांसोबतच पांढऱ्या रंगाच अप्रूपही तितकंच आहे. लेखक कवी साहित्यिक यांनी आपल्या साहित्यातून या रंगीबेरंगी दुनियेतील सर्व रंगांची उधळण केली आहे.
पद्मजा फेणाणी यांचं ‘शुभ्र ज्वाला’ या अल्बम मधील ‘पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हे गीत पांढऱ्या रंगाचं सौंदर्य खुलवतं. ‘पुस्तकातली खूण कराया दिले पण एकदा पीस पांढरे’ या त्यांच्याच गाण्यात त्यांच्या आवाजातून शुभ्र पांढऱ्या पिसार्याचं सौंदर्य झाकोळतं.
लावणीतील रंग बरसातही अनुभवण्यासारखी आहे. होळीच्या सणातली रंगांची उधळण करताना ‘खेळताना रंग बाई होळीचा म्हणत… तर ‘कळीदार कपूरी पान केशरी चुना रंगला कात’ म्हणत सुलोचना बाईंनी खाऊ घातलेलं पान लावणीचा ठसका देतं.’पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा’म्हणत हिरव्याकंच शालूतील लावणीसम्राज्ञी मन जिंकते. ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना. हिरव्या मोराची थुईथुई थांबेना’ अशी लडिवाळ तक्रार करत लावणीसम्राज्ञी रंगात येते तेव्हा मन लावणीत रंगून जातं.
इंद्रधनुष्यातले रंग, काळा पांढरा रंग यांच्यासोबतच लिंबू, पारवा, श्रीखंडी, चिंतामणी गुलबक्षी पोपटी, आकाशी, डाळिंबी, तपकिरी, शेवाळी, मोतिया, राखाडी, केतकी, आमसुली याआ णखीन अशा अनेक रंगानी माझं आयुष्य रंगीबेरंगी करून टाकलं. लहानपणी एका रंगानं मात्र मला कोडयात टाकलं होतं. ‘गणराज रंगी नाचतो’ हा रंग कोणता? तो कलेचा रंग होता हे मोठे झाल्यावर लक्षात आलं.’अवघा रंग एक झाला’ असं म्हणत सोयराबाईंनी मानव जातीतील सारे भेद मिटवले. हा रंग देखील समजायला मोठं व्हावं लागलं….
अशा अनेकविध गाण्यांच्या लोलकातून गीतकारांच्या प्रतिभेचे किरण जाऊन माझ्या मनःपटलावर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य उमटलं. या इंद्रधनुष्यात अगणित रंग होते. त्या रंगात मनानं रंगून जायचं ठरवलं.रंग उडलेल्या मनाच्या पापुद्र्यांवर आता आगळे वेगळे रंग चढू लागले. आयुष्याचं चित्र रंगीबेरंगी रंगांनी रंगवून टाकायचं त्यानं ठरवलं…..
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈