श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ राम का गुणगान करिये… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
पं भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायिलेले ‘ गुणगान करिये रामका ‘ हे अतिशय सुंदर गीत. हे गीत ऐकताना जणू समाधी लागते. तशी रामाची कुठलीही गाणी गोडच ! मग ते गीतरामायण असो वा अन्य कुठलीही गाणी. मुळात रामायणच गोड ! पेढ्याचा कुठलाही भाग खाल्ला तरी तो गोडच लागणार ना ! तशीच अवीट गोडीची ही रामकथा. या रामकथेने हजारो वर्षांपासून अनेकांना प्रेरणा दिली. शेकडो लेखक आणि हजारो कवी लिहिते झाले. पण रामकथेची थोरवी संपली का ? वर्णन करून झाली का ? ती कधीच संपणार नाही. रामकथा म्हणजे विविध डोळे दिपविणाऱ्या रत्नांनी भरलेला एक सागर आहे. जेवढी खोल बुडी माराल तेवढी रत्ने हाताला लागतील. समुद्राला आपण रत्नाकर म्हणतो. रामकथा सुद्धा या अर्थाने एक रत्नाकरच !
मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या गीताचे सुरुवातीचे शब्द आहेत ‘ रामका गुणगान करिये.’ रामाचं गुणगान कशाकरता करायचं ? आणि गुणगान केलं तरी कोणाचं जातं ? ज्याच्यात काही अलौकिक असे गुण आहेत, अशाच व्यक्तीचं आपण गुणगान करतो ना ! आपण रामाचं गुणगान करतो, कृष्णाचं गुणगान करतो, शिवाजी महाराजांचं गुणगान करतो, ते त्यांच्यात विशेष असे अलौकिक गुण आहेत म्हणून. आपण रावणाचं, कंसाचं, औरंगजेबाचं गुणगान करत नाही. आपण आपल्यासमोर असेच आदर्श ठेवतो की ज्यांच्यापासून आपल्याला काही शिकता येईल, प्रेरणा घेता येईल. आजच्या या लेखात प्रभू श्रीरामांचे असेच काही गुण आठवू या. त्या निमित्ताने त्यांचं गुणगान करू या.
सुरुवातीला मला डोळ्यासमोर दिसतो तो, वसिष्ठांच्या आश्रमात शिकणारा राम. राम राजपुत्र असला तरी, आश्रमात तो एक वसिष्ठ ऋषींचा आज्ञाधारक शिष्य म्हणूनच वावरतो. इतर शिष्यांबरोबरच आश्रमातील सगळी कामे करतो, नियम पाळतो. इतर विद्यार्थी जे काही अन्न ग्रहण करतील तेच अन्न तोही ग्रहण करतो. कुठेही राजपुत्र असल्याचा तोरा तो मिरवत नाही. आश्रमातील शिक्षण पूर्ण झाल्यावर निघताना वसिष्ठ ऋषींचा आणि गुरुमातेचा आशीर्वाद घेऊन तो निघतो. त्यावेळी गुरुमातेला तो म्हणतो, ‘ या आश्रमात तुम्ही आम्हाला मातेचे प्रेम दिले. मातेची आठवण येऊ दिली नाही. आमची पुत्रवत काळजी घेतली. या आश्रमातील वास्तव्यात माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर, आपण उदार मनाने मला क्षमा करावी. ‘ केवढा हा नम्रपणा !
आश्रमातील शिक्षण पूर्ण करून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आपल्या गृही परततात. आता खरे तर काही दिवस त्यांचे मौजमजेचे आणि विश्रांतीचे. पण अशातच विश्वामित्र ऋषी येतात. त्यांच्या यज्ञात राक्षस विघ्न आणतात म्हणून संरक्षणासाठी रामाला आपल्याबरोबर पाठवण्याची मागणी करतात. वसिष्ठ ऋषींच्या समजावण्यानंतर दशरथ राजा रामाला विश्वामित्रांसोबत पाठवतो. अशा वेळी राम आनंदाने त्यांच्याबरोबर जातो. सोबत लक्ष्मणही असतोच ! लक्ष्मण हा रामाची सावली आहे. सावली जशी आपली साथ सोडत नाही, तशीच लक्ष्मणही रामाची साथ कधीच सोडत नाही. विश्वामित्रांसोबत वनातून जात असताना राम आपल्या मधुर वाणीने आणि आज्ञाधारकतेने विश्वामित्रांचे मनही जिंकून घेतो. त्यांना म्हणतो, ‘ कदाचित माझ्या शिक्षणात काही अपूर्णता राहून गेली असावी. मला तुमच्याकडून काही नवीन शिकायला मिळावे म्हणूनच ही नियतीची योजना असावी. ‘ विश्वामित्र आपल्या या गोड आणि तेजस्वी शिष्यावर बेहद्द खुश होतात आणि राम लक्ष्मणाला काही दिव्य अस्त्रं बहाल करतात, जी त्यांना पुढील काळात उपयोगी पडतात. ‘
मग मला आठवतो तो राम की ज्याला राज्याभिषेक होणार असतो. खरं तर केवढा आनंदाचा हा प्रसंग ! आणि त्यानंतर लगेच कैकयी आपले दोन वर दशरथाकडून मागून घेते. एका वराने रामाला वनवासात पाठवावे आणि दुसऱ्या वराने भरताला राजा करावे. दोन्ही टोकाचे प्रसंग ! एक अति आनंदी होण्याचा, तर दुसरा अति दुःखी होण्याचा. पण या दोन्ही प्रसंगात रामाची स्थितप्रज्ञता आपल्याला दिसते. तो आनंदाने हुरळून जात नाही की वनात जावे लागेल म्हणून दुःखी होत नाही. कोणतीही परिस्थिती संयमाने कशी हाताळावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम. म्हणूनच तो ‘ मर्यादापुरुषोत्तम ‘ आहे. त्याच्या वागण्याबोलण्यात सागराचे गांभीर्य आहे.
दशरथ राजामध्ये रामाला वनवासात जा म्हणून सांगण्याची हिंमत राहिलेली नसते. पण आपल्या पित्याने दिलेले वचन खोटे ठरू नये म्हणून तो आनंदाने वनवासाला जायला निघतो. खरं तर प्रजा त्याच्या बाजूनं असते. त्याने उठाव केला तरी प्रजेने त्याची साथ दिली असती एवढा तो प्रजेला प्रिय होता. पण रामाचा निर्धार, रामाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यात कालत्रयीही बदल होणार नाही. सीतेसारखी तरुण आणि त्रिभुवनात जिच्या सौंदर्याची कोणी बरोबरी करू शकणार अशी पत्नी. नुकताच विवाह पार पडलेला. अशा वेळी आपल्या तरुण आणि सुंदर पत्नीचा मोहही त्याला अडवू शकत नाही. सीता नंतर त्याच्यासोबत जाते हा भाग वेगळा.
कैकयीमुळे आपल्या प्राणप्रिय असलेल्या बंधूला वनात जावे लागते हे लक्ष्मणाला कळते, तेव्हा तो कैकयीची निर्भत्सना करतो. अशा वेळी राम त्याला सुंदर शब्दात समजावतो. ‘ लक्ष्मणा, अरे जशी माता कौसल्या, माता सुमित्रा तशीच माता कैकयी. माता ही सदैव आदरणीय असते. ‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियासि ‘ हे त्याचे ब्रीद आहे. ‘ नाहीतरी मला काही ऋषीमुनींची भेट घ्यायची इच्छा आहे. वनात गेल्यानंतर अनायासे ही इच्छा पूर्ण होईल, ‘ असे अत्यंत समजूतदारपणा आणि त्याच्या मनाचे औदार्य दाखवणारे उद्गार तो काढतो.
वनात असतानाही भरत त्याला भेटायला येतो. अयोध्येला परत येण्यासाठी खूप विनवणी करतो. परंतु राम त्याला निर्धारपूर्वक नकार देतो. शेवटचे अस्त्र म्हणून तो वसिष्ठांची पण तशीच इच्छा आहे असे रामाला सांगतो. पण राम भरताला म्हणतो, ‘ एकदा आपण वडिलांना जे वचन दिले ते पाळले नाही तर रघुकुलाच्या कीर्तीला कलंक लागेल. ‘ ‘ रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई .’ हे ब्रीद कसोशीने पाळणारा राम आहे. या ठिकाणी दुसरा कोणीही असता तर भावाने विनंती केली, वसिष्ठांचीही तशीच इच्छा होती, असे सोयीस्कर उद्गार काढून अयोध्येला परत जाऊ शकला असता.
रामाने एकदा ज्याला आपले म्हटले, हृदयाशी धरले, त्याची साथ कधीच सोडली नाही. मग तो गुहक असेल, निषादराज असेल, सुग्रीव असेल किंवा बिभीषण असेल. शरणागताला आश्रय देणे, प्रसंगी आपल्या प्राणांचे मोल त्यासाठी द्यायला तयार होणे हे रामाचे ब्रीद होते. मित्र जोडताना जातपात, उच्चनीच, स्त्रीपुरुष असा भेद रामाने कधीच केला नाही. रामाने रावणावर विजय मिळवला, लंका जिंकली. ठरवले असते तर तो लंकेचा राजा होऊ शकला होता. पण तो मोह त्याला नव्हता. रावण जर रामाला शरण आला असता, तर रामाने त्याचेही मनपरिवर्तन केले असते. त्याचे राज्य त्याला परत दिले असते. पण तसे व्हायचे नव्हते. कोणी तरी रामाला विचारले, ‘ तुम्ही बिभीषणाला राज्य द्यायचे वचन दिले आणि ते त्याला दिले. पण जर रावण तुम्हाला शरण आला असता, आणि त्याने राज्याची मागणी केली असती तर काय ? ‘ अशा वेळी रामाने फार सुंदर उत्तर दिले आहे. तो म्हणतो, ‘ रावण माझ्याकडे आला असता तर, त्याला मी अयोध्येचे राज्य दिले असते आणि आम्ही चारही भाऊ अरण्यात निघून गेलो असतो. ‘ असे मनाचे औदार्य दाखवणारे उदगार फक्त रामच काढू शकतो. रावणाचा वध झाल्यानंतर त्याचा यथोचित अंत्यसंस्कार करावा असे तो बिभीषणाला सुचवतो. मृत्यूनंतर वैर संपते आणि त्याचा आदर्श रामाने घालून दिला.
रामाच्या चरित्रात असे त्याच्या गुणविशेष दर्शवणारे अनेक प्रसंग आहेत. महर्षी वाल्मिकींनी देखील श्रीरामाला देव म्हणून आपल्यासमोर ठेवले नाही. त्याच्या गुणांची पूजा आपण बांधावी, त्याचे अनुकरण करावे हाच त्यांचा उद्देश होता. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार काढले आहेत, तेच उद्गार तंतोतंत रामालाही लागू होतात. समर्थ म्हणतात
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी ।।
अशा या गुणनिधी असलेल्या रामाचे गुणगान करू या. त्याचे थोडे तरी गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या. जय श्रीराम !
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈