सुश्री सुलभा तेरणीकर
विविधा
☆ रत्नमंजुषा – – ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆
लहानपणीच्या आठवणींत वडिलांच्या बदल्या, सामानसुमानाची त्यांची आवराआवर, मित्रमैत्रिणींची ताटातूट, परिसराचं हरवणं यांनी फार मोठा भावबंध निर्माण केलेला आहे. तेरेखोल ते दाभोळपर्यंतचा समुद्रकिनारा, कोल्हापूरजवळचं वडगाव, पंढरपूरजवळचं मंगळवेढा या सर्वांवर स्मृती-विस्मृतीची छाया धरते आणि फक्त आठवते ती बदलीच्या सामानात पुस्तकांसाठी झालेली वडिलांची कासाविशी आणि संसारातल्या वस्तूंसाठी आईची घालमेल.
काचसामान फुटेल म्हणून वडील कुणातरी शिपायाकडे ते सुपूर्द करीत. सुंदरसा पाळणा गरजूकडे रवाना होई. भांडीकुंडी ओझं होतं म्हणून भेटीदाखल दिली जात. त्यांची भाराभर पुस्तकं मात्र ट्रंकेत रचली जात. मोठा ग्रामोफोन बडे गुलाम अली खाॅंसाहेबांच्या ‘याद पियाकी आये’ सह आम्हाला जागवणाऱ्या-झोपवणाऱ्या लता मंगेशकरांच्या ‘रघुनंदन आले आले’ किंवा ‘दिलसे भुला दो तुम हमें’ सह काळजीपूर्वक बांधला जात असे आणि पुढची मजल गाठण्यासाठी आमचा प्रवास सुरु होत असे. कालांतराने रेकॉर्ड्सची जागा रेडिओनं घेतली; पण पुस्तकांचं ओझं मात्र वाढत गेलं.
प्रपंचाचे तडाखे झेलत त्यांनी पुस्तकाचा लहानसा संसार उराशी जपला; सरकारी व्हिक्टोरियन बंगल्यातून भाड्याच्या घरात आत्मीयतेनं सांभाळला. दर वर्षी चैत्रात गच्चीत पसरून ऊन देणं, झटकणं, नवीन कव्हर घालणं, खळ लावून नीटनेटकी करणं, नाव घालणं, त्यांची सूची करणं, त्यांना बांधून ठेवणं आणि त्याचा मनमुराद वापर करणं, देखभाल करणं- हा त्यांचा नित्यक्रम असे.
पुढे कळत्या वयात मला संग्रहाच्या अंतरंगाची थोडी ओळख झाली. त्याचं आकर्षण वाचनाबरोबर वाढत गेलं. मग मला त्यांच्याजवळचं थॉमस केम्पीचं ‘द इमिटेशन ऑफ ख्राइस्ट’, जे. कृष्णमूर्तींचं ‘नोटबुक’ ‘बृहद्स्तोत्ररत्नाकर’ ‘नवनीत’, ‘महाराष्ट्र सारस्वत’, दाते-कर्वे यांचे कोश, लाला हरदयालांचं चरित्र नेहमी हवं असे. शब्दार्थकोश, सुवचनांचे कोश, औषधी बाड; वाग्भट, सुश्रुत यांचे ग्रंथ -अशी सूची संपत नसे. आपले व्यक्तिगत खर्चाचे कोणतेही आडंबर न माजवता त्यांनी हळूहळू जमवलेली ग्रंथसंपदा… मी मात्र त्यावर डोळा ठेऊन असे. त्यांच्या पुस्तकांची मालकी मीच मिरवीत असे. मग ते पुस्तक कुठे गेलं म्हणून शोधत राहत असत. हा पुस्तकांचा लपाछपीचा खेळ त्यांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे थांबला. आता ती सारी पुस्तकं मूकपणे माझ्या स्वाधीन झालेली आहेत. हारीनं कपाटात उभी आहेत आणि विखरून गेलेल्या मलाच सावरीत आहेत. माझीच देखभाल करीत आहेत.
त्यांच्या संग्रहातलं एक पुस्तक मी विशेषकरून वाचते, चाळते, नेहमी जवळ ठेवते. श्रीधर श्यामराव हणमंते यांनी संपादित केलेला अभिनव असा ‘संख्या संकेतकोश’ मला प्रिय झालेला आहे. ‘संख्या संकेत’ कोशात संख्येत सांगितलेलं ज्ञान आहे. या लेखकाने प्रयत्नपूर्वक कणाकणानं टिपून मिळवलेली माहिती आणि त्याचं संकलन म्हणजे अद्भुत, रोमांचकारी असा ठेवा आहे. शून्यापासून अब्जापर्यंत संख्येशी संकेतानं जोडलेल्या माहितीचा हा साठा म्हणजे जिज्ञासू, ज्ञानार्थींना अनमोल खजिना वाटेल. सामान्यांना हवाहवासा वाटेल, असा आहे. बहात्तर यक्षप्रश्न, नव्वद रामायणं, बावीस श्रुती, सोळा शृंगार, चौसष्ट योगिनी, एकोणपन्नास मरूदगण, अष्टनायिका, अठरा पुराणं, महाभारताची पंच्याण्णव उपपर्व, एकशेआठ उपनिषद, अठरा अक्षौहिणी दळभार, चंद्राच्या षोडषकला, चौदा विद्या, मराठ्यांची शहाण्णव कुळं, शंभर कौरवपुत्र… असे कितीतरी तपशील त्यात आहेत. वेद, पुराणं, योगवसिष्ठ, भगवद्गीता, यांच्यासारखे धर्मग्रंथ, महाकाव्यं, चरित्रग्रंथ यांमधून; तसेच नियतकालिकांमधून संग्रहित केलेला हा प्रचंड लेखाजोखा विस्मयकारक आहे. त्यात ज्ञानाचे, संस्कृतीचे, परंपरेचे, शास्त्रांचे, तंत्राचे, मानवी स्वभावाचे, प्रपंच आणि परमार्थाचे, व्यवहारज्ञानाचे किती तरी प्रवाह वाहताना दिसतात. त्यातलं कुतूहल संपतच नाही. प्रत्येक पानागणिक नाविन्याचं नवं दालन उघडत राहतं आणि संख्या संकेतांकोशाशी मैत्र जुळते. त्यात मला खूप नवीन शब्द मिळाले, संज्ञा कळल्या, अर्थ लाभले. त्याबद्दल किती सांगावं?…….
… “चार गोष्टी एकत्र असणं नवरदेवाच्या भाग्याचं – वधू ज्येष्ठ कन्या असणं, अल्पवयीन मेहुणा असणं, सासूबाई स्वतंत्र बाण्याच्या आणि सासरे सदैव प्रवासावर. या सर्व गोष्टी एकत्र असणं जावयाच्या भाग्याच्या होत. ”
… ” दहा गोष्टी व्यवहारात वर्ज्य- चाकर – गर्विष्ठ, मुलगा- अति लाडका, शत्रू- कपटी, विद्वान-स्तुतिपाठक, रोगी-पथ्य न करणारा, गायक – मानी ”
… “त्रयोदशगुणी विडा – पान, सुपारी, चुना, कात, लवंग, वेलदोडा, जायफळ, जायपत्री, कंकोळ, केशर, खोबरं, बदाम आणि कापूर या तेरा जिनसा मिळून केलेला विडा.”
… ” आठ प्रमुख कारागीर ताजमहालाचे – अमानत खाॅं शिराजी -कंदाहार, इसा गवंडी -आग्रा, पिरा सुतार-दिल्ली, बन्नुहार, जातमल्ल, जोरावर (नक्षीकाम करणारा), इस्माईल खान रुमी (घुमत बनवणारा), रामलाल- काश्मिरी बाग करणारा… ”
… “आठ शब्दांमागे ‘महा’ हे विशेषण निषिद्ध. जसे- शंख, तैल, मांस, वैद्य, ज्योतिषी, ब्राह्मण, यात्रा व निद्रा या आठ शब्दांमागे; ‘महा’ विशेषण उपयोगात आणू नये. त्याचा विपरीत अर्थ होतो. उदा. महानिद्रा म्हणजे चिरनिद्रा. “
असं कितीतरी मनोरंजक, माहितीपर ज्ञानवर्धक असं पानोपानी विखुरलेलं आहे. वाचता-वाचता दोन पुराणकालीन बल्लवाचार्यांची नावं मिळाली- नल राजा व भीम यांची. आणि गोड, स्वादिष्ट उंची पक्वान्नांना नळपाक आणि तिखट, तामसी पदार्थांसाठी भीमपाक अशा संज्ञा आहेत, ही देखील माहिती मिळाली. वसतिस्थानांच्या देवतांबद्दल- अष्टवसूंबद्दल संख्या संकेतकोश सांगतो- ‘आप-निर्मल जल, अनिल-मोकळी हवा, प्रभास-भरपूर प्रकाश, प्रत्यूष -उषेचं दर्शन, ध्रुव-दिशासूचन, सोम-चंद्रभोगी अंगण, धरा-टणक जमीन आणि पावक म्हणजे अग्निहोत्राची सोय- या आठांविना वसतिस्थानाला शोभा नाही… ‘
आपल्या पूर्वजांच्या वास्तूच्या संकल्पनेचं अष्टदल माझ्यासमोर तर उलगडलंच ; पण त्यातील एका संकल्पनेपाशी मन क्षणभर थांबलं… ‘चंद्रभोगी अंगण… ‘ अन मग मी हरखले. थांबलेलं मन कल्पनेच्या अवकाशात भरारी घेऊ लागलं. चंद्रभोगी अंगण… गुजगप्पा, साईसुटयोचा खेळ, रातराणी किंवा पारिजातकाच्या गंधाने अडवलेला छोटासा कोपरा… जमिनीच्या तुकड्यानं बहाल केलेल्या अंगणाच्या संकल्पनेवर चंद्रभोगी शब्दानं धरलेली चंद्रप्रकाशाची किमया पाहून मन थरारलं. पुस्तकातल्या ज्ञानाच्या, माहितीच्या खजिन्याला- रुक्मिणीच्या तुळशीदळानं जसं तुळियेलं, तसं त्या खजिन्याला या एका शब्दानं पारडं जड करून अक्षरश: तोलून धरलं… अंगणात विहार केलेल्या बालपणानं – तारुण्यानं, संध्याछायेनं चंद्रभोगी अंगणापाशी थबकून चांदण्याचं लेणं ल्यालं. देता आलं, तर पुढच्या पिढीला चंद्रभोगी अंगणाचं आंदण द्यावं…
… या कोशानं मला दिलेला हा शब्द- ‘चंद्रभोगी अंगण’ मी आपलासा केलेला आहे. जपलेला आहे. मिरवलेला आहे. त्यानं दिलेला दिलासा, सांत्वन मी अनुभवते. ही माझी रत्नमंजुषा आहे. खूप-खूप रहस्यमय गोष्टींची सुरसकथा आहे. जगाच्या अगाध ज्ञानाची छोटीशी खिडकी आहे. पानोपानी विखुरलेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वेबसाइट्स आहेत. मजसारख्या संगणक- निरक्षर व्यक्तीसाठी उघडलेल्या अक्षय्य ज्ञानदालनासाठी या ग्रंथातलं पान न पान सज्ज आहे. मूकपणे माझ्यासाठी कधीही तत्पर असलेल्या पुस्तकानं एकाकी वाटचालीतल्या खाचखळग्यातून मला सावरलेलं आहे. क्वचित चंद्रभोगी अंगणाची बिछायत माझ्यासमोर उलगडते. चांदण्यांची ओढणी अस्तित्वावर लहरते.
…वडिलांच्या चंद्रमौळी घरात छत पाझरत असताना वडिलांचे भिजलेले डोळे आठवतात. आमच्यावर आणि पुस्तकांवर पांघरूण घातलेलं स्मरतं. त्या सर्वांचा खोल अर्थ सांगण्यासाठी ‘चंद्रभोगी अंगण’ धावून येतं…
© सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈