सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ रेंगाळलेली उन्हं… थांबलेल्या छाया… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

तप्त झळांच्या दुपारीपासून, हुरहूर लावणाऱ्या तिन्हीसांजेपासून आमच्यावर सुखाची सावली धरणाऱ्या मे महिन्याचे दिवस कधी पसार झाले ते कळलंच नाही. मातीच्या भिंतींमधला सुखद थंडावा, रसाच्या आंब्यांचा अस्सल देशी गंध यामुळं हवाहवासा वाटणारा पुण्याच्या विपुल पाण्याचा मे महिना हरवलाच. व्यक्तिमत्त्व विकास शिबिरं घरातून, वाड्यांमधून चालत. कुटुंबातली, समाजातली माणसं स्वयंस्फूर्तीनं मुलांशी संवाद करीत, हसत- खेळत काही शिकवित राहत. मे महिन्यात पहिल्यांदा पोळी करायला, मण्यांची पर्स करायला, गच्चीवर कुरडया घालायला किंवा बुद्धिबळाचा डाव मांडायला कधी शिकलो ते आता आठवावं लागेल. पुण्याजवळच्या परिसरातल्या छोट्या छोट्या सहली, अंगतपंगत, उसाचा रस, आइस्क्रीम घरी करण्याचा कार्यक्रम अशा घटनांनी मे महिन्याचे दिवस गजबजलेले असत. 

रस्त्यांवरून मोकाट फिरण्यासाठी काही जण उत्सुक, तर बैठ्या खेळांच्या प्रदीर्घ डावांसाठी काही उतावीळ असत. बदाम सातच्या डावाचे जल्लोष चालत,  कॅरमच्या क्वीन घेण्याच्या स्पर्धा चालत असत. या अविस्मरणीय महिन्यात जरा लवकरच उगवणारी पहाट, आळसावलेली दुपार यापेक्षा मला रेंगाळलेली संध्याकाळ फार आवडत असे. सैलावलेल्या दिवसाच्या मोकळ्या संध्याकाळी तर जणू आपल्यासाठी उन्हं थोडी रेंगाळत असत. सावल्या थोड्या थांबलेल्या असत असं वाटे. वर्षभरातल्या संध्याकाळी किती लवकर संपत. किती कुंद, उदासवाण्या वाटत; पण एप्रिल -मेच्या सोनेरी संध्याकाळी आमच्या प्रियसख्यांशी गप्पा होई तोवर जणू थांबत. दुपारी अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर यांच्या रसदार कथांमधून वाचलेलं पुनःपुन्हा आठवायला, मैत्रिणींशी ते बोलायला या संध्याकाळी फार मधुर वाटत असत. पुढे हे सारं संपलं. फार लवकरच संपलं. आणि मुग्ध संध्याकाळी अकाली प्रौढ झाल्या… 

त्यांनी बरोबर आणलेल्या कातरपणानं, उदासवाणेपणानं घेरून टाकलं , हेदेखील कळलं नाही. गाण्यातून, कवितेतून भेटणाऱ्या संध्याकाळी अर्थपूर्ण व्हायला लागल्या. ‘सहज सख्या एकटाच येई सांजवेळी’, ‘हुई शाम उनका खायला आ गया’, ‘शाम ए गम की कसम …’ – – मनःस्थितीशी एकरूप होणाऱ्या या ओळींसाठी जीव आसुसलेला होई. ‘दिल शाम से डुबा जाता है, जब रात आई तो क्या होगा’ , ‘शाम के दीपक जले, मन का दिया बुझने लगा…’ ही गीतं माझ्या मनातली हुरहूर अधिक गडद करून जात. पुढे दुःखरंजनाचं हे पर्वदेखील संपलं. जीवनाशी सामना करायला उभं राहावं लागलं… 

आयुष्यातल्या निखळ सत्यानं, प्रत्यक्ष अनुभवानं संध्याकाळ एक वेगळा चेहरा घेऊन आली… 

एप्रिल महिन्यातल्या एका संध्याकाळी लतादीदींकडून त्यांच्या वडिलांच्या आठवणी ऐकल्या. मोजक्या शब्दांत अर्थपूर्ण मुलाखत देणाऱ्या लतादीदींचं घर सोडलं तरी त्यांचे शब्द निनादत राहिले. अर्थ झेपावत राहिला. परतीच्या वाटेवर हाजी अलीच्या दर्ग्यापाशी सूर्यास्त होताना दिसला तेव्हा तो पाहताना दीदींची मुलाखत एकेक शब्दासह मनात उतरली. ‘जाहला सूर्यास्त राणी, खोल पाणी जातसे…’ आरती प्रभूंच्या ओळींसरशी पाहता पाहता भोवतीचे समुद्रमहाल झगमगू लागले… मला ते शब्द फक्त कागदावर उतरवायचे होते… 

आज देखील ही संध्याकाळ माझ्या दारात उभी राहते. खूपशी बेचैनी, तणाव- आणि खूपसा उल्हास यांचं रसायन घेऊन येते आणि त्याचा आनंद मला लाख दुःखं झेलायला पुरून उरतो… 

लतादीदींच्या स्मृतीतले रात्रीच्या वेळी हरिविजय, रामविजय असे ग्रंथ वाचताना गहिवरणारे त्यांचे वडील, पहाटेची गाण्याची शिकवणी, ‘ही माझी मुलगी सर्वांना सांभाळेल’ हे त्यांनी पत्नीशी बोलताना काढलेले उद्गार, ‘खजांची’च्या गाण्याच्या स्पर्धेतील एक स्पर्धक म्हणून ‘मी लता दीनानाथ मंगेशकर’ अशी ओळख करून देताच टाळ्यांनी निनादलेले सभागृह… हे सारं माझं होतं. खुद्द लतादीदींनी सांगितलेल्या आठवणी माझ्या होतात… 

मे महिन्यातल्या अकरा तारखेला आपटे रोडवरच्या ‘स्वरवंदना’ मध्ये ज्योत्स्ना भोळे यांच्या वाढदिवसाच्या संध्याकाळी खास मैफल रंगत असे. सुहास, वंदना, अनिल तसेच नंदा, मीना या त्यांच्या मुलांसुनांसह मीदेखील सहभागी होत असे. दिल्लीहून आशाताई व भगवानराव जोशी येत. कलकत्त्याहून विश्वजित बॅनर्जी क्वचित येत आणि मग वार्धक्य- व्याधींना झुगारून देऊन ज्योत्स्नाबाई काव्यशास्त्रविनोदाची मैफल रंगवीत असत. गोव्यात माडाच्या झाडावर सरसर चढणारे, कोंकणी पोर्तुगीज भाषेत उत्स्फूर्त कविता गात. ज्योत्स्नाबाईंना त्या आठवत. राधामाई नाटकातले संवाद ‘तू माझा अन तुझीच मी ही खातर ना जोवरी…’, ‘खेळेल का देव माझिया अंगणी’ , ‘अमृत बोला…’ टागोरांची बंगाली कविता… .. अशी संध्याकाळ थोडी लांबत असे. देखणी होऊन जात असे. 

रोज मुंबईहून पुण्याला परतताना उन्हाळ्यात घाटात संध्याकाळ भेटत असे. संधीप्रकाशानं गुलाबी, सोनेरी, केशरी रंगाची उधळण केलेली असे. एरवी वाकुल्या दाखवणारे, भीती घालणारे अंधारातले वृक्ष कसे उजेडात न्हाऊन निघत. माझ्या संध्याकाळच्या आठवणी घाटातल्या संधिप्रकाशासारख्या उजळतात. गोव्यातल्या समुद्रात बुडणाऱ्या सूर्यापाठोपाठ क्षणभर दिसणाऱ्या प्रतिपदेच्या चंद्ररेखेसारख्या झिलमिलतात. सांजदिवा लावून मलादेखील खूप आठवायचं असतं… रेंगाळलेल्या उन्हांनी ..  थांबलेल्या सावल्यांनी मला दिलेलं सांभाळायचं असतं… 

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments