श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
😅 रामाची निर्मल सीता व लक्ष्मी! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“काय पंत आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून नेहमी सारखा.”
“अरे वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी!”
“काय केबल गेली की काय तुमची?”
“अरे केबलला काय धाड भरल्ये? व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स.”
“मग तुमचा सखा सोबती आज मुका कसा?”
“अरे काय सांगू तुला, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट! दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्या चॅनेलवाल्यांनी.”
“पंत, बजेट हाच सध्याचा गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय?”
“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे मोरू, पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा शब्द सुद्धा नीट उच्चारता देखील येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार? “
“पंत, सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार?”
“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी दिल्लीवरून चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला t. v. बंद!”
“पण पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”
“त्यात कसले बुवा माझे नुकसान? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय?”
“पण पंत सरकारने कर सवलत किती दिली? काय काय स्वस्त होणार? काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल?”
“कसं म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी तूच लंपास करून वाचतोस!”
“काय पंत मी…. “
“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते?”
“नाही खरच माहीत नाही पंत, मला कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे!”
“तुला सांगतो ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’ शब्दा पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करीत असत आणि या पिशवीला ते तेंव्हा ‘बुजेत’ असे म्हणत. पण अर्थशंकल्पला बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे बघ मोरू!”
“कोणता किस्सा पंत?”
“अरे १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले होते. येताना त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला. मग काय, तेव्हापासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला.”
“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास. बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे, पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “
“अरे इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून?”
“तसच काही नाही, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “
“होतात, होतात पण तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या. नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते! You know, public memory is very short.”
“हो, पण पंत आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि……”
“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना? अरे मोरू म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे तोंड कडवट होतेच, त्याचे काय? “
“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पण…… “
“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट सांभाळतांना घरच्या फायनान्स मिनिस्टरची काय हालत होते हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का?”
“हो बरोबर, या बाबतीत सगळ्याच आपल्या घरातल्या फायनान्स कम होम मिनिस्टरनां माझा सलाम! महागाईचा कितीही भडका उडाला तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच जाणोत! पंत पटल बुवा तुमच म्हणण.”
“पटल ना, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती!”
“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला काही पटत नाही.”
“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे. सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या दहा मार्गानी दोन हातांनी काढून घ्यायच! आता तो आकडयांचा खेळ खरंच नकोसा वाटायला लागलाय रे! अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे! मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”
“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना!”
“तू तसा ऐकण्यातला नाहीस माहित आहे मला. मोरू आता तुला शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांवच ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसाच करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियमच आहे! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम!”
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈