सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ लाखेचे उपयोग (भाग ४) ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

लाखेचे उपयोग एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत की थक्क व्हायला होतं. हैद्राबादच्या प्रसिद्ध लाखेच्या बांगड्या या समस्त स्त्री वर्गाच्या आकर्षणाचा विषय आहेत. याच बरोबर दागिने, पेन, खेळणी बनवण्याकरता लाख वापरतात.

परंतु, लाखेचा उपयोग मुख्यत्वे सील करण्यासाठी होतो. मोठं मोठ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सीलबंद करुन परीक्षाकेंद्रांवर पाठवल्या जातात. सरकारी कागदपत्रं, तिजोर्‍या या ही सीलबंद केलेल्या असतात. सरकारी लखोट्यांवर जो लाल शेंदरी रंगाचा मोठा ठिपक्या सारखा आकार दिसतो, तो दुसरं तिसरं काही नसून लाखच असते.

लाख विद्युत निरोधक म्हणूनही वापरतात.

मुद्रणाची शाई तयार करण्यासाठी लाखेचा उपयोग होतो.

लाकडाचं पॉलिश, व्हार्निश करण्यासाठी लाख उपयोगी आहे.

चामडे आणि जोडे यांच्यावरील  संस्करण लाखेनं केलं जाते.

लाकूड, धातू, आणि अन्य पृष्ठभागावरील नक्षीकाम  करण्यासाठी हिचा वापर तर सर्वपरिचित आहे.

इ.स.१९५० पर्यंत शेलॅकचा वापर ग्रामोफोनच्या तबकड्या बनवण्याकरता होत असे.

पातळ व टिकाऊ थर बनू शकेल अशी  जलीय व्हार्निशे तयार करण्यासाठी लाख वापरली जाते.

फर्निचर, वाद्यं, क्रिडासाहित्य आणि खेळणी यांच्या पृष्ठभागावर लावण्यासाठी तसेच धातूच्या आणि लाकडाच्या पृष्ठभागावरील चिरा आणि फटी बुजवण्यासाठी स्पिरिट व्हार्निशांचा उपयोग करतात.

कागद आणि धातूंची भांडी, पोटात घ्यायच्या औषधी गोळ्या यांच्यावर थर देण्यासाठी देखील स्पिरीट व्हार्निश वापरतात.

मानवशास्त्रीय तसेच प्राणीवैज्ञानिक नमुने यांना संरक्षक लेप देण्यासाठीही स्पिरीट व्हार्निश वापरलं जातं.

रबरी कापड, मेण कापड इतकच नाही तर आपल्या घरातील फ्लोअर आकर्षक करण्यासाठी अंथरले जाणारं लिनोनियम यांच्या अंत्यरुपणासाठी स्पिरीट व्हार्निशच वापरतात.

डोक्यावर ठेवण्यात येणारी साहेबी थाटाची हॅट कडक बनवणं, मातीच्या भांड्यांना ती

भाजण्यापूर्वी लेप देणं यासाठी लाखच लागते .

रुपांतरीत शेलॅकवर आधारित, चांगली लवचिकता आणि रसायनांना प्रतिरोधक असलेले पॉलियुरेथिन लेपही विकसित करण्यांत आले आहेत.

तुमच्या घरातील शिशवी पलंगाचे पाय, आजोबांची काठी, दिव्यांचे स्टॅंड लाखेच्या करामती  मुळेच आकर्षक बनतात.

सील तयार करण्यासाठी राळ, केओलिन, रंगद्रव्य इत्यादींचे शेलॅक( झाडांच्या फांद्यांवरील लाख गोळा करून धुतल्या नंतर मिळणाऱ्या लाखेला शेलॅक म्हणतात.) बरोबर  मिश्रण  करतात.

उच्च विद्युत रोध, उच्च विद्युत दाबाचे विसर्जन झाल्यास संवाहक मार्गाचे प्रसारण होणे, इतर पदार्थांना चिकटणे या गुणधर्मांमुळे शेलॅकचे विद्युत उद्योगात अनेक  उपयोग आहेत.

विद्युत निरोधक, लाइटचे स्वीचेस, त्यांचे फलक, मुठी, विद्युत ठिणगी संरक्षक आवरणे ही यादी मारुतीच्या शेपटी सारखीच लांबलचक आहे.

रेडिओतील निर्वात नलिका, विद्युत दिव्यांच्या टोप्या यासाठी सुद्धा लाखच लाखमोलाची.

याशिवाय  धातू आणि  काच परस्परांना चिकटवण्यास बंधक द्रव्य म्हणून  लाखेचीच बात.

भारतात  सोन्या चांदीच्या  पोकळ दागिने भरण्यासाठी, बांगड्या बनवण्याकरता लाखच भरली जाते आणि तो  दागिना शब्दशः  लाखमोलाचा  बनतो.

आयुर्वेद म्हणजे  सध्या  लोकमान्यता  मिळालेले देशी वैद्यक शास्त्रात काडी लाख  पोटात घेण्याचं  औषध  म्हणून  देतात.

आहे  ना लाख मोलाची गोष्ट ! पण बरं का, समस्त  भारतीयांसाठी ही लाख केवळ लाख मोलाची नाही तर;  अत्यंत  अभिमानाची लाखातील बात अशी  की ;  या बहुउपयोगी लाखेचे जगाच्या  ऐंशी टक्के  उत्पादन  आपल्या  भारतात  होते . त्यामुळं  भारताला परदेशी  चलन मिळते. काय, झाली ना मान ताठ? मग करा बरं प्रतिज्ञा  भारतातील वनसंपदा टिकवण्याची, वृद्धिंगत  करण्याची!!

जय हिंद!!

संकलन व लेखन

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments